हल्ली माझे चालणे खूप कमी झालेय. पहिल्यासारखे नियमित जाणे होत नाही व त्यामुळे ह्या ऋतूत पारसिक हिलवर फुलणारी फुले पाहिली गेली नाही. असेच एकदा चुकून चालायला गेले होते. आदल्या दिवशी जिप्सीने अडुळश्याची फुले व्हाट्सअप्प ग्रुपवर टाकली होती. टेकडीवर अडुळसा कुठे आहे हे मला माहित आहे म्हणून विचार केला की आपणही एक फेरी मारून फोटो काढावेत. अडुळश्याचे फोटो काढून परत रस्त्यावर येत असताना एका लहान झाडाने लक्ष वेधून घेतले. झाडाची उंची साधारण सहा ते सात फूट होती व अगदीच बाळ झाड वाटत होते. लक्ष गेले ते त्याच्या फुलांमुळे. अगदी पिटुकली, माचीस काडीच्या डोक्याएव्हढी फुले बघून लगेच फोटो घ्यायला सुरुवात केली. घरी गेल्यावर थोडी शोधाशोध केली तेव्हा कळले की हा लघु अजान. बोटॅनिकल नाव इहरेटिया लेविस. Ehretia Laevis. ह्या बोटॅनिकल नावांची एक गंमत आहे. झाडाचे नाव व झाडाची पहिल्यांदा नोंद करणारी व्यक्ती या दोघांचीही गुंफण नावात घातलेली असते. जॉर्ज डायनिसिअस एऱ्हेट या बोटॅनिकल कलाकाराने पहिली नोंद केली म्हणून एर्हेटिया व लेविस म्हणजे गुळगुळीत. हे
आज अकस्मात गारंबीची बी पहावयास मिळाली. हिला गायरी असेही म्हणतात. ह्याची जी वेल असते ती साधीसुधी नसते तर महावेल असते. शास्त्रीय भाषेत Liana म्हणतात त्या प्रकारची प्रचंड वेल, जी साधारण जंगलात उंच वृक्षांवर चढलेली आढळते. ह्याची शेंगही काही फूट लांब असते. अजून ही वेल प्रत्यक्ष पहायचे भाग्य मला लाभलेले नाही. शास्त्रीय नाव Entanda rheedii किंवा Entanda Puesartha. एप्रिल २०२२चा अपडेट : मी वर लिहिलेय कि हा वेल मला अजून पाहायला मिळाला नाहीय. तेव्हा पाहिला नव्हता पण आता पाहिलेला आहे. आंबोलीत कायमच्या मुक्कामाला आल्यावर आंबोली घाटातून सावंतवाडी फेऱ्या वाढल्या. अशाच एका फेरीत मला एका १० मजली झाडावर काहीतरी टांगलेले दिसले. इतक्या उंचीवर दिसतेय म्हणजे कुठल्यातरी मोठ्या पक्ष्याने घरट्यासाठी म्हणून मोठे फडके नेऊन तिथे टाकले असणार असे मला वाटले. पण तरी खात्री करण्यासाठी म्हणून पुढच्या वेळेस दुर्बीण घेऊन गेले व बघते तर ते फडके नव्हते तर एक मोठी काळी शेंग झाडावर लटकलेली दिसली. शेंग पाहिल्यावर ती गारंबीची शेंग याची खात्री पटली. गारंबीचा महावेल त्या झाडावर च
ऑफिसात फिरताना ही झाडे अनेकदा पाहिली. प्रथमदर्शनी समुद्रफुलांची झाडे वाटली, Barringtonia Asiatica. म्हणून फारसे लक्ष दिले नाही. पण पाने जवळून पाहताना फरक लक्षात येऊ लागले. पानांचा पुंजका व रंग जरी समुद्रफुलासारखा असला तरी याची पाने वेगळी होती. समुद्रफुलांची पाने टोकाला निमुळती होतात. याची पाने टोकाला चक्क चौकोनी आकाराची होती. टोक असे नाहीच. मग शोधाशोध सुरू केली. इंडियन फ्लोरा ह्या फेसबुक ग्रुपवर माहितीगार भरपूर आहेत. तिथे नाव कळले, फाईकस लाईराटा Ficus lyrata. याच्या पानांचा आकार लायर नावाच्या एका ग्रीक वाद्यासारखा आहे म्हणून लाईराटा व फाईकस हे त्याचे कूळ. पाने तशी बऱ्यापैकी मोठी आहेत, आपला दीड पंजा मावेल इतकी. काल सहज फिरायला गेल्यावर झाडे परत दिसली. एक दोन झाडांवर हिरवी फळे लागलेली दिसली. म्हटले फळे लागली म्हणजे फुले येऊन गेली असणार आणि तरीही मला दिसली नाहीत..... पण फाईकस कुळातले झाड आहे हे समजल्यावर फुले पहावयास न मिळाल्याची चुटपुट कमी झाली. फाईकस कुटुंबात दर्शनी फुले अशी नसतात. फांद्यांवर, पानांच्या बेचक्यात हिरव्या गाठी येतात ज्याच्या आत फुले असत
बालपणीचा काळ सुखाचा.. माझ्या बालपणातलाच काय आजवरच्या एकुण आयुष्यातला सुखाचा काळ कोणता असा प्रश्न कोणी विचारला तर उत्तर लगेच येईल, सावंतवाडीतील वास्तव्याचा. (अर्थात मला असले प्रश्न विचारतंय कोण म्हणा... :) माझा जन्म नगरचा. मी साताठ महिन्याची असताना आईबाबा आंबोलीला परतले. आणि मग मी तीन वर्षांची असताना आईबाबा सावंतवाडीला राहायला आले. तोपर्यंत कुटुंबात एका भावाची भर पडली होती. आधी सालईवाड्यात होतो राहायला. तिथे आमचे स्वतंत्र एकमजली घर होते. इतर घरे एकमेकांना जोडलेली होती. तळमजल्यावर बाबा हार्मोनियम पेट्या बनवायचे, तिथेच छोटे स्वयंपाकघर होते आणि वरच्या मजल्यावर झोपायची खोली. दोघांना जोडणारा एक जिना. एकदा त्या वरच्या खोलीतुन खाली येताना पहिल्याच पायरीवर माझा पाय घसरला आणि मी पाय-या मोजत थेट खाली. महिनाभर हात प्लास्टरमध्ये होता. त्या काळात मी जेवढे शक्य होते तेवढे लाड करवुन घेतले, धाकट्या भावाला शक्य तितके धपाटे मारुन घेतले. कारण त्या दरम्यान मला कोणीच ओरडत नव्हते. प्लास्टर निघाले त्या दिवशी मी खुप रडले. कारण मी परत सामान्य मुलगी झाले होते. घरासमोर मोठे सगळ्यांना सामायिक
अडुळसा हे आपल्या अवतीभोवती आढळणारे झुडूप आहे. बहुतेक ठिकाणी ह्याचा कुंपण म्हणून उपयोग केलेला दिसतो. अडुळश्याला संस्कृतात वसाका हे नाव आहे. याचे शास्त्रीय नाव Justicia Adhatoda. अडुळसाच्या मुळा, पाने, फुले आयुर्वेदिक औषधात वापरतात. सर्दी, खोकला दमा, इत्यादींवर अडुळसा खूप गुणकारी आहे.
बोरिवली राष्ट्रीय उद्यानात शेवटचे गेल्याला 10 वर्षे तरी नक्कीच झाली असावीत. तिथे जायला हवे असे अधून मधून वाटत असले तरी बेलापूर ते बोरिवली अंतर लक्षात घेता ते वाटणे कायम मागे पडत गेले. यावर्षी सुट्टीत मावसबहिण राखी तिच्या कुटुंबासोबत माझ्याकडे राहायला आली. मग शनिवार रविवार मुंबई दर्शन चुकवायचे नाही असे ठरवून शनिवारी संध्याकाळी तिच्या नवऱ्याला विमानतळावर सोडायच्या निमित्ताने आम्ही पश्चिम उपनगरात आगमन करते झालो. (कसे भारी वाटते ना वाचायला? नाहीतर पहिला अर्धा तास नव्या मुंबईत झुर्रर्रर्रर्रकन व नंतरचा एक तास कुर्ल्याच्या ट्रॅफिकमध्ये क्लच ब्रेक करत गाडी चालवत, रस्त्यावरच्या लोकांना शिव्या घालत पारल्याला पोचलो हे किती बोरिंग वाटते वाचायला). दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आज नॅशनल पार्कात जायचे हे घोषित केल्यावर लग्गेच 'तिकडे कशाला एवढ्या उन्हात? त्यापेक्षा इकडे अमुक्तमुक जागी जाऊ' वगैरे काथ्याकूट सुरू झाला. आमच्याकडे असला काथ्याकूट एकदा सुरू झाला की फक्त मऊ कुटलेला काथ्या हाती लागतो, आमचे बुड घराबाहेर पडत नाही. त्यामुळे त्या काथ्याकूटाकडे दुर्लक्ष केले. भराभर आवरून महत्वाच्या
टिप्पण्या