फुलोनकी घाटी - ऋषिकेश.

दिल्ली सोडल्यानंतर गाडी जरी थांबत थांबत, इतर गाड्यांना खो देत निघाली तरी हरिद्वारला मात्र वेळेत म्हणजे   1 वाजता पोचली.  हरिद्वारला उतरल्यावर गर्मीने नको जीव झाला. स्टेशनबाहेर पडताच नेहमीप्रमाणे रिक्षावाल्यानी घेराव घातला.  ऋषिकेशच्या आमच्या पत्त्यावर पोचवायचे एकाने 600 सांगितले. मी 400 वर सौदा करायचा प्रयत्न केला पण तो 500 वर हटून बसला.  तसे बघितले तर एसटी स्टँड समोरच होता पण गाड्या त्या दिवशी जरा उशिराने धावताहेत ही माहिती एका पोलिसाने दिली. आधीच एसटी लेट, म्हणजे तौबा गर्दी असणार, त्यात इतके सामान घेऊन एसटीने जरी गेलो तरी ऋषीकेश एसटी स्टँडवरून इच्छित स्थळी परत रिक्षानेच जावे लागले असते.  त्यामुळे उगीच कुठे पैशांचे तोंड बघत बसणार असा विचार करून एका रिक्षावाल्यासोबत 450 रु फिक्स केले व निघालो. हरिद्वार ते ऋषिकेश शेअर रिक्षाने गेल्यास माणशी 35 रुपये पडतात म्हणे. पण 35 रुपयात प्रवास करायचा असेल तर 6 माणसांची क्षमता असलेल्या जागेत 10 जणांना बसावे लागते. आम्ही तिघी आणि आमचे सामान यानेच रिक्षा भरून गेलेली ☺.  अजून कोणी सवारी घेणार नाही रिक्षावाल्याने सांगितले, त्यावर भरोसा ठेवत भयाण जोरदार फटफट आवाज करत साधारण 30 च्या वेगाने डिझेल की अजून कुठल्या भेसळमिश्रित इंधनावर  चालणाऱ्या, रस्त्यातल्या कुठल्याही लहानश्या खड्डयाच्या धक्क्याने   रिक्षातून उडून बाहेर आदळायची भीती असलेल्या रिक्षात देवावर हवाला ठेऊन बसलो. पुढे वारंवार असेच देवावर हवाला ठेऊन प्रवास करायचे प्रसंग येतील याची ही केवळ पूर्वसूचना होती हे नंतर कळले. देवभूमीत देवाची लीला अगाध आहे.  हरिद्वार ते ऋषिकेश अंतर 25 किलोमीटर आहे पण वाटेतील रस्ता इतका खराब आहे की या प्रवासाला 2 तास लागले. हरिद्वार ऋषिकेश जोडणारे एक जंगल आहे. जंगलातला रस्ता बराच बरा आहे पण जंगल संपल्यावर लगेच भयानक तुटका रस्ता. असल्या रस्त्यावर चाक पंचर झाले नाही तरच नवल. 15-20 मिनिटे त्यात गेली. शेवटी 3 च्या सुमारास बेस कॅम्पवर पोचलो.


ऋषीकेशच्या वाटेवरचे एक शिल्प

हरिद्वारच्या असंख्य घाटांपैकी एक!

पंक्चर झालेले चाक बदलायची वाट पाहताना दिसलेले एक सुंदर पान

एक असेच मंदिर.


मी पेमेंट केलेलं त्याचा बँक अडवाईस जोडलेला फॉर्मसोबत  पण बँकेने त्यावर तारीख घातली नव्हती.  माझ्या अडवाईस वर बँक पेमेंट नंबर वेगळा व yhai च्या बँक स्टेटमेंटवरचा युटीआर नम्बर वेगळा. त्यामुळे आमचे पेमेंट नक्की कधी झाले हे त्यांना कळत नव्हते.  आमचा फॉर्म त्यासाठी त्यांनी आधीच वेगळा काढून ठेवलेला. आम्हाला बघताच, नावही न विचारता,  आमचे फॉर्म्स इतके फटकन कसे काढले ह्याचे मला कोडे पडलेले, त्याचे लगेच निराकरण झाले. मग माझ्या एसबीआय  अकोन्टला लॉगिन करून तारीख मिळवली, ती त्याला दिली तेव्हा कुठे आमची रिसीट बनली.

Yhaiने भारत मंदिर धर्मशाळेत सोय केलेली.  गेल्या गेल्या अंघोळ केली व बाहेर पडलो.  4 वाजता चहा मिळणार तेव्हा जास्त लांब जाऊ नका, 5 वाजता ओरिइंटेशन आहे त्याला हजर हवेच वगैरे वगैरे सूचना मिळालेल्या असल्याने जवळच असलेली नदी बघू हा विचार करून नदीच्या दिशेने निघालो. वाटेत इटकुलीशी कचराकुंडी व कुंडीच्या 1 मीटर परिसरात कचऱ्याचे भव्य साम्राज्य, त्याच्यात काही खायला मिळतेय का शोधणारी गुरे व कुत्रे असा नेहमीचा थाट होता. रिक्षा, दुचाक्या, चारचाक्या चालवणाऱ्या मंडळीना माणसे रस्त्यावर  उतरली कीे बहिरी व आंधळी होतात याची जाणीव असल्यामुळे त्यांनी बहिऱ्यांचेही कान फाटतील इतके कर्कश हॉर्न बसवून घेतलेले आणि एक बोट कायम हॉर्नवरच ठेवून गाडी चालवायची सवय लावून घेतलेली.   अर्थात बहिऱ्यांना ऐकू येत नसल्याने व आंधळ्यांना दिसत नसल्याने या हुषारीचा काहीही उपयोग होत नाही ही गोष्ट वेगळी.  रस्त्यात माणसे हवी तशी फिरत होती.  वाहने त्या गर्दीतून कर्कश आवाजात जमेल तिथून जमेल तशी वाट काढत होती. एकूण  भारतातील कुठल्याही शहरात  जसा सिन असतो तसाच ऋषिकेशला होता.

त्या गोंधळातून वाट काढत नदीकिनारी म्हणजेच त्रिवेणी घाटावर पोचलो.  घाट खूप सुंदर बांधलाय. गंगामैया प्रचंड वेगाने धावत होती. आंबोलीतली 1 व कोकणातल्या 1-2 नद्या बघत आयुष्य गेलेल्या माझ्यासारख्या व्यक्तीला उत्तरेतल्या नद्या बघितल्या की धक्का बसतो.  इतक्या वेगात धावणारी व पलीकडचा तट इतका दूर असलेली नदी बघून मला नेहमी आश्चर्य वाटते. ब्रह्मपुत्र नदी पहिल्यांदा बघितली तेव्हा हा कुठला समुद्र हा प्रश्न मी विचारलेला.  तिचा तर पलीकडचा तट दिसलाच नाही. अगदी समुद्रच वाटते. ब्रम्हपुत्र हा नद आहे, नदी नाही हे बहुतेक त्याचा अवाढव्य आकार पाहून ठरवले असणार.



















घाटावर पायऱ्या बांधलेल्या त्यातली फक्त 1 च पायरी दिसत होती. 2 नंबरच्या पायरीवरूनही नदी धावत होती. घाट खूप स्वच्छ होता. अपेक्षित कचरा, भिकारी वगैरे अजिबात दिसले नाहीत.   बहुतेक पावसाळा असल्यामुळे की काय, पाण्यात भरपूर माती होती. घाटावर काही बायका पानाच्या द्रोणात फुले, अगरबत्ती, पिठाचा छोट्टूसा दिवा, त्यात तुपात भिजवलेली एक फुलवात व त्यावर कापराची एक वडी असा सगळा थाट रचून विकत बसलेल्या पण विकत घ्याच म्हणून गळ्यात मात्र पडत नव्हत्या.  खूप लोक फुलांचे द्रोण विकत घेऊन नदीला दिव्याने ओवाळून मग तो सगळा सरंजाम पाण्यात सोडत होते तर काही पायरीवरच पूजा मांडून तिथेच दिवा लावत होते.

गंगापूजेचा फुलांचा द्रोण.


एकाच हातात द्रोण धरून पाण्यात सोडला तर लाटेच्या माऱ्याने तो लगेच उपडा होतो. द्रोण दोन्ही हातांच्या ओंजळीत धरुन ती ओंजळ पाण्याखाली धरली तर वरचा द्रोण अलगद लाटेवर स्वार होऊन दुरवर हेलकावत जातो हे टेक्निक तेवढ्यात बघून घेतले. हे अर्थात थोडे रिस्की आहे कारण ओंजळ पाण्याखाली धरण्यासाठी पाण्यात थोडे वाकावे लागते व त्या भानगडीत तोल जाऊन नदीत पडलात तर तुम्ही पडलात हे तुम्हाला कळायच्या आधीच तुम्ही 500 मीटर तरी वाहत जाल इतक्या वेगात नदी धावत असते.  इतक्या वेगात धावणारी नदी, घाटावर बऱ्यापैकी गर्दी तरी कुठेही जीवरक्षक दिसले नाहीत किंवा पाण्यात कुठेही आधार धरायची सोय दिसली नाही.  ऋषिकेशला जाताना वाटेत हरिद्वारचे घाट दिसले तिथे पाण्यात आधारासाठी रेलिंग लावलेले दिसत होते पण इथे तसे काहीही नव्हते. कदाचित पाण्याखाली गेले असावेत. नदीत डुबकी मारणारे एकदोघे दिसले पण ते पायरीवरूनच डुबकी मारत होते. आत पुढे अजून पायऱ्या असणार पण दिसत नव्हत्या.











हल्ली कुठेही भेटतात ते सेल्फी सम्राट नदीतटावरही होते. त्यांची गंमत बघण्यात थोडा टाईमपास केला. वेडी दिसणारी एक बाई जेवणाचा डबा धुवायला किनारी आली. अर्धा पाऊण किलो तरी भरेल इतका मोठा दगड तिने गळ्यात बांधलेला म्हणून ती वेडी असावी असे मला वाटले. पण तिने डब्बा शहाण्यासारखा धुतला, चूळ भरली व आता ही पाणी पितेय की काय असे मला वाटत असतानाच डब्बा भरून मातीमिश्रित पाणी ती प्यायलीही.  गंगामैया सगळ्यांचे रक्षण करते असा विचार करत मी घाटावरची इतर गंमत बघायला लागले.



सेल्फी सम्राट



गंगा आरतीची वेळ संध्याकाळी साडेसहा की सातची होती. भाविकांनी लवकर येऊन आपापल्या शिटा धराव्यात हे आवाहनही केलेले होते पण आम्ही भाविक नसल्याने ते फारसे गांभीर्याने घेतले नाही. घड्याळात साडेचार वाजत आलेले तेव्हा नंतर परत येऊन रात्रीच्या अंधारात दिव्यांचा द्रोण सोडायची गंमत करू व आरतीही बघू म्हणत परतलो.

परतून आलो तर लोक चहा पित बसलेले. मी जड होतात म्हणून बॅगेत भरलेले सिरॅमिक कप काढून ठेवले पण स्टीलचे टाकायला विसरले त्यामुळे त्याच पावली मागे फिरून एक 10 रूपयाचा प्लास्टिक कप विकत घेतला.  परत हॉस्टेलवर आले तर एक ग्रुप 'ताट,वाटी, चमचा, टिफिन बॉक्स सगळे आमचे आम्ही आणायचे' हे तुम्ही सांगितले नाही म्हणून हुज्जत घालत होता. 'वर या, साईट उघडून दाखवतो कुठे लिहिलेय ते' म्हणून मॅनेजर साहेबांनी त्यांना वरून छज्यातूनच गप्प केले.  मॅनेजर साहेब जरा भारीच दिसताहेत याची नोंद करत चहा घेतला आणि ओरिएंटेशनची वाट बघत बसलो. शेवटी ते सहा वाजताच झाले.  इंडियन स्टॅंडर्ड टाइम, अजून काय?

ओरिएंटेशनमध्ये मॅनेजर साहेबांनी सगळ्या डुज व डोंट्स ची माहिती दिली.  आधीच्या पिढीला जेवढा निसर्ग दिसला तेवढा आताच्या पिढीला दिसत नाही आणि हे असेच सुरू राहीले तर येणाऱ्या पिढ्यांसाठी काहीही शिल्लक राहणार नाही म्हणून युथ हॉस्टेल ही जागतिक संस्था जगभरात तरुणांनी परत निसर्गाच्या जवळ जावे यासाठी प्रयत्न करते.  त्यांनी आयोजित केलेल्या निसर्गयात्रांना साधे शाकाहारी जेवण, तंबूत मुक्काम व शक्य तितकी कामे आपली आपणच करायची यावर भर असतो.  जेवणाचे ताट,वाटी, डब्बा आपले न्यायचे, प्रत्येक वेळी ते वापरले की आपले आपणच घासून घ्यायचे, तंबू जसा स्वच्छ मिळाला तसाच तो जाताना पुढच्या ग्रुपसाठी स्वच्छ करून मग निघायचे वगैरे त्यांचे बरेच नियम आहेत. कुठल्याही प्रकारचे अमली पदार्थ न वापरण्याविषयीचे नियमही खूप कडक आहेत व त्यांचे तसेच कडक पालन केले जाते. त्यामुळे एकट्या मुलीसुद्धा त्यांचे ट्रेक बिनधास्त करतात.  बहुतेक वेळा ते जंगलात सोबत गाईड देत नाहीत,  जिथे रस्ता चुकण्याची शक्यता असते तिथे मार्गदर्शनपर बोर्ड लावलेले असतात.   जमलेल्या मेम्बर्समधून ग्रुप लीडर व को लीडर म्हणून अनुभवी लोकांची निवड करतात, त्यांना जबाबदारी नीट समजवतात त्यामुळे जंगलात जाणारे मेम्बर्स सहसा रस्ता चुकत नाहीत. माझा yhai सोबतचा हा तिसरा ट्रेक, त्यापैकी निलगिरी ट्रेकला सोबत गाईड होता (ज्याचे कारण वेगळे होते) पण गोवा ट्रेकला गाईड नव्हता.  ह्या ट्रेकलाही सोबत गाईड नसणार, फक्त फुलोनकी घाटी मध्ये गाईड असणार ही माहिती मॅनेजर साहेबांनी दिली.  ह्या ट्रेकला तशीही गाईडची गरज नव्हती हे नंतर लक्षात आले.

ही सगळी माहिती घेतल्यावर परत त्रिवेणी घाटावर गेलो. आता घाटावर बऱ्यापैकी गर्दी होती. फुलांचा एक द्रोण विकत घेऊन तो गंगार्पण केला. नदीचे पाणी आता थोडे कमी झाले होते व दुसरी पायरी दिसत होती. गंगाआरतीची नुकतीच सुरवात होत होती. आरती जिथे होते तिथे लोकांची गर्दी तर होतीच पण आम्ही ज्या बाजूला होतो त्या बाजूनेही खूप गर्दी होती. आम्हीही त्या गर्दीत घुसून शक्य तितके पुढे जाऊन इतर जनतेप्रमाणे  मोबाईलवर विडिओ चित्रीकरण सुरू केले. त्या भानगडीत मी घाटाची पहिली पायरी सोडून दुसऱ्या पायरीवर जाऊन उभी राहिले. मी नदीत पडते की काय या भयाने ऐशु एक डोळा मोबाईलवर व एक डोळा माझ्यावर ठेऊन होती, पण मी काही नदीत पडले नाही.













आरती बराच वेळ सुरू होती व आरती करणारे भटजी वेगवेगळ्या पोझेस घेऊन, गोल गोल फिरून आरती करत होते. मला हा प्रकार पर्यटकांसाठी केल्यासारखा वाटला. 15 वर्षांपुर्वीही आरती अशीच होत होती का हा प्रश्न मनात आला.   आरतीचे दिवे अतिशय सुंदर होते.
































































आरती गाणारे सुद्धा अगदी तालासुरात गात होते. एकूण मस्त माहौल होता. लोक विडिओ घेत होते. एकाच्या मोबाईल स्क्रीनवर आरती दिसायच्या ऐवजी कोणी स्त्री पुरुष आलटून पालटून दिसत होते. तो स्काईपवर घरच्यांना आरती दाखवत होता हे  थोड्या वेळाने माझ्या लक्षात आले.  आरती पार पडल्यावर घाटावर उगीच इकडे तिकडे फिरून टाइमपास केला. त्या दिवशी जन्माष्टमी असल्याने बरेच बाळगोपाळ कृष्णाच्या वेशात वावरत होते.



घाटावर गावठी मक्याची कणसे दिसली म्हणून घ्यायला थांबलो. इथे स्वीटकॉर्न मिळतात जे मला अजिबात आवडत नाहीत.  आमचे मराठी ऐकून कणीसवाला मराठीत बोलायला लागला. मी थक्क! तिकडचे भय्ये इकडे येऊन भरले म्हणून मराठ्यांनी चक्क ऋषिकेश गाठावे? त्याला विचारले कधी येऊन राहिला म्हणून. तर म्हणे मी सातारचा, माझे आई बाबा इथे येऊन स्थायिक झाले, कधी मधी जातो सातारला. म्हटले बरे आहे गड्या!!





 8.30 वाजता डिनर असल्याने त्या सुमारास रमत गमत परतलो. दुसऱ्या दिवशी साडे तीन वाजता उठून पावणे पाचला जोशीमठसाठी निघायचे होते. ट्रेक साठीचे कपडे वेगळ्या बॅगेत पॅक करायचे काम पार पाडून झोपलो.

रात्री झोप अशी काही लागली नाही. तिनालाच जाग आली.  चहा घेऊन, सगळे आवरून, पॅक लंच घेऊन निघालो. ब्रेकफास्ट गाडीतच होणार होता.


टिप्पण्या

varshu म्हणाले…
ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लघु अजान वृक्ष - Ehretia Laevis

गारंबीची बी

फाईकस लाइरटा Ficus lyrata

बालपणीचा काळ सुखाचा.........

मग मी मूर्ख कसा?

भाभा अणुशक्ती केंद्रात एक दिवस.....