बालपणीचा काळ सुखाचा.........

बालपणीचा काळ सुखाचा..  माझ्या बालपणातलाच काय आजवरच्या एकुण आयुष्यातला सुखाचा काळ कोणता असा प्रश्न कोणी विचारला तर उत्तर लगेच येईल,  सावंतवाडीतील वास्तव्याचा.  (अर्थात मला असले प्रश्न विचारतंय कोण म्हणा... :)

माझा जन्म नगरचा.  मी साताठ महिन्याची असताना आईबाबा आंबोलीला परतले.    आणि मग मी तीन वर्षांची असताना आईबाबा सावंतवाडीला राहायला आले. तोपर्यंत कुटुंबात एका भावाची भर पडली होती. आधी सालईवाड्यात होतो राहायला.  तिथे आमचे स्वतंत्र एकमजली घर होते.  इतर घरे एकमेकांना जोडलेली होती.  तळमजल्यावर बाबा हार्मोनियम पेट्या बनवायचे, तिथेच छोटे स्वयंपाकघर होते आणि वरच्या मजल्यावर झोपायची खोली.  दोघांना जोडणारा एक जिना.  एकदा त्या वरच्या खोलीतुन खाली येताना पहिल्याच पायरीवर माझा पाय घसरला आणि मी पाय-या मोजत थेट खाली.  महिनाभर हात प्लास्टरमध्ये होता.  त्या काळात मी जेवढे शक्य होते तेवढे लाड करवुन घेतले,  धाकट्या भावाला शक्य तितके धपाटे मारुन घेतले. कारण त्या दरम्यान मला कोणीच ओरडत नव्हते. प्लास्टर निघाले त्या दिवशी मी खुप रडले. कारण मी परत सामान्य मुलगी झाले होते. 

घरासमोर मोठे सगळ्यांना सामायिक असे अंगण आणि त्यात मध्यभागी पारिजातकाचा वृक्ष.  पुर्ण वाढलेल्या आंब्याच्या झाडाइतका मोठा प्राजक्ताचा वृक्ष मी परत कधीच कुठेही पाहिला नाही.

मग कधीतरी सालईवाड्यातुन दुसरीकडे राहायला गेलो.  बालपणीच्या  सगळ्या आठवणी ह्या नव्या जागेशी संबंधित आहेत.  आयुष्यातला सर्वात सुंदर काळ मी इथे घालवला.  आणि तो काळही किती मोठा असेल?  जास्तीत जास्त ५ वर्षांचा.  कदाचित त्याहुनही कमी.  पण आजही कित्येक प्रसंग डोळ्यासमोर आहेत.  खरे तर मला कालचे आज आठवत नाही,  विसराळु म्हणुन माझी ख्याती आहे.  पण ह्या ठिकाणचे प्रसंग मनावर असे कोरले गेलेत की आजही आठवण आली की तो प्रसंग अगदी जशाच्या तसा डोळ्यासमोर उभा राहतो.  कधी कधी वाटते, ते सगळे कालचे परत आज घडतेय आणि आजची मी एका कोप-यात उभी राहुन पाहतेय.

हे नविन घर खुप मोठे होते.  जागा नक्की सांगता नाही येणार मला,  पण वाडीहुन कोलगावला जायचा रस्ता आहे त्या रस्त्यावर घर होते.  घराच्या आजुबाजुला उंचसखल अशी मोकळी जागा होती,  घरही रस्त्याहुन बरेच उंचावर होते.   जांभ्या दगडाच्या विसेक पाय-या चढल्यावर घराच्या अंगणात प्रवेश होई.  घराच्या डाव्या बाजुला उताराचा रस्ता होता जो पुढे जाऊन खालच्या रस्त्याला मिळे.  उजव्या बाजुला घरमालकांची आंब्याची बाग होती.  त्यात आंब्याबरोबर काजु, सिताफळ,  नारळ  आणि इतर बरीच झाडे होती.  घर जवळजवळ १५-२० खोल्यांचे होते.  आत प्रवेश करताच आयताकृती मोठा हॉल,  त्याला ओळीत तिन दरवाजे.  मधला दरवाजा परत एका मोठ्या हॉलमध्ये उघडत होता.  त्यामागे अजुन ४-५ खोल्या.  बाजुच्या दोन्ही दरवाजांमागे तिन खोल्या.  डावीकडच्या भागात आम्ही राहात होतो,  उजवीकडच्या भागात पेडणेकर म्हणुन एक भाडेकरु आणि मधे मालक. मालकांच्या आईच्या ताब्यात सगळी मालमत्ता होती.  मालक मुस्लिम होते.  आणि आम्ही दोन्ही भाडेकरु हिंदु.  त्यांच्या आईला आम्ही सगळेजण आजी म्हणायचो. 

आमच्या बाजुच्या हॉलच्या भागात माझे बाबा पेट्या बनवायचे आणि मुंबईला पाठवायचे.  मला वाटते वर्ष/दिड वर्ष ते राहिले असतिल तिथे आणि मग ते मुंबईला गेले.  आम्ही मात्र वाडीलाच राहिलो. माझ्या धाकट्या दोन्ही भावांचे जन्म तिथलेच.  आम्हा चौघा भावंडांना घेऊन माझी आई तिथे एकटीच राहायची.  आंबोलीहुन अधुन मधुन आजी, काका,  मावशी, मामा यापैकी कोणीनाकोणी येऊनजाऊन असायचे.  शिवाय गावातले कोणी कामासाठी वाडीला आले तरी खेप घालायचे.  बाबा असताना तर बघायलाच नको.  तेव्हा संगीत नाटके अगदी फॉर्मात होती आणि बाबांना त्यांचा खुप नाद होता.   नाटकाचा मुक्काम वाडीला आला की दर रात्री बाबांचे कोणी ना कोणी मित्र गावाहुन यायचे नाटक बघायला.  त्यांना सोबत घेऊन रात्री २ वाजता बाबा घरी परतत  आणि मग झोप अर्धवट टाकुन त्यांना पिठलंभात करुन वाढायची जबाबदारी आईवर.  कधीकधी आई वैतागायची.  पण हा वैताग स्वयंपाकघराबाहेर दाखवण्याची पद्धत त्या काळी नव्हती.

बाबा मुंबईला गेल्यावर आईवर घराची सगळी जबाबदारी आली.  घरचे आणि बाहेरचे दोन्ही करताना तिला माझ्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळेनासा झाला.  त्यामुळे मी स्वतंत्रपणे कुठेही हिंडायला मोकळी झाले.  कधी एकटी तर कधी धाकटा भाऊ सोबत असायचा.  मी नुकतीच शाळेत जायलाही सुरवात केली होती.  शाळा दोन सत्रात असायची.  सकाळी ७.३० ते १०.३०  आणि दुपारी २.३० ते ५.३०.  सकाळचे अधिवेशन संपले की घरचा अभ्यास द्यायचे.  वह्या वगैरे प्रकार माहितच नव्हता.  सगळा कारभार पाटीवर.  त्यामुळे पाटीच्या दोन्ही बाजु भरतील इतकाच अभ्यास दिला जाई.  घरी आले की दहा मिनिटांत मी अभ्यास करुन बाहेर हिंडायला मोकळी व्हायचे.  शेजारच्या आंब्याच्या बागेपासुन माझी भटकंती सुरू व्हायची.  बाग संपली की पुढे थोडेसे विरळ पण उंच झाडांचे रान सुरू व्हायचे.  त्या रानात बकुळीची भरपुर झाडे होती.  बकुळीखाली नारंगी रंगाची कोनाच्या आकाराची फळे पडलेली असायची.  आत नारंगी रंगाचा चिकट पण अतिशय मधुर असा गर असायचा.  त्याची चव अजुनही जीभेवर रेंगाळतेय.  आता कुठेही बकुळ दिसला की डोळे लगेच खाली पडलेली फळे शोधायला लागतात.  पण दुर्दैवाने आजपर्यंत मला ती फळे कुठेही मिळाली नाहीत.  (गेल्या महिन्यात उदयपुरला सहेलियोंकी बाडीत फळे मिळाली पण ती कच्ची होती :( )

कधीकधी रानात सापही दिसायचे.  मला तेव्हा साप चावतात, त्यांच्यापासुन जीवाला धोका आहे वगैरे काहीच माहित नव्हते.  साप दिसला की  मी थांबुन तो जाईपर्यंत पाहात राहायचे.  कधीकधी एखादा  भक्ष्य गिळून स्वस्थ पडलेला अजगर दिसायचा.  बराच वेळ थांबले तरी तो काहीच हालचाल करत नाही हे पाहुन मी त्याचा नाद सोडुन पुढे जायचे.  कधीकधी दुसरे साप दिसायचे.  कधी ते स्वतःच्याच मुडमध्ये असायचे तर कधी माझ्याकडे एक कटाक्ष टाकुन मग सरळ स्वतःच्या मार्गाने जायचे.  घरी आल्यावर आईला सांगितले की ती खुप घाबरायची.  मग दोन तीन दिवस सक्तीने घरी बसवायची.  पण तिलाही इतर कामे असायची.  त्यामुळे मग माझी भटकंती परत सुरू.

असेच एकदा आंब्याच्या बागेत भटकत होते.  एका ठिकाणी फुलपाखरे जमली होती.  त्यांना पाहात उभी होते आणि एक हात आंब्याच्या खाली आलेल्या फांदीवर होता.  थोड्या वेळाने हातावर काहीतरी हालचाल जाणवली.  पाहते तो काय!!  एक हिरवा साप माझ्या हाताचा पुलासारखा उपयोग करुन एका फांदीवरुन दुस-या फांदीवर जात होता.  हे साप खुप पातळ असतात, साधारण आपल्या अंगठ्याएवढी जाडी असेल  आणि जास्त लांबही नसतात.  तसे मला तेव्हा सापाचे फारसे भय वाटत नव्हते.   पण हे दृश्य पाहुन मात्र मी प्रचंड हादरले.  इतकी हादरले की माझा तिथेच पुतळा झाला.  तो साप जाईपर्यंत मी तशीच पुतळ्यासारखी उभी राहिले आणि तो गेल्यावर घरात धुम ठोकली.  पुढचे दोन दिवस घराबाहेर पडलेच नाही.  अर्थात आईच्या कानावर ही घटना कधीच गेली नाही :)

बागेपासुन खुप दुर एक काज-याचे झाड होते.  त्याला लालशेंदरी रंगाची अतिशय आकर्षक फळे लागत आणि पिकुन गळाली की त्यांना खाण्यासाठी बक-या गर्दी करत.  पण तिथल्या लोकांच्या मते ती फळे माणसांसाठी विषारी होती.  आईला नेहमी भिती वाटायची की मी रंगाला भुलुन ती फळे खाईन की काय.. मी बाहेर निघाले आणि तिने बघितले तर न चुकता ती 'काज-याकडे जाऊ नकोस' म्हणुन बजावायची.

आईला अजुन भिती कोकणातल्या देवचारांची असायची.  हा  झाडांवर राहणारा भुताचा एक प्रकार फक्त कोकणातच आढळतो. :)  अर्थात आता देवचार आहेत का कोकणातुन पळाले मला कल्पना नाहीय,  पण माझ्या लहानपणी मात्र ते प्रत्येक तिस-या चौथ्या झाडावर,  विशेषत: जुन्या, प्रचंड पसरलेल्या  आंबा, फणस, वड, पिंपळ वगैरे झाडांवर असायचेच असायचे.  शिवाय प्रत्येक देवचाराचा स्वतःचा एरीया असायचा आणि अमावस्येच्या रात्री तो आपल्या एरीयात फिरत असताना त्याच्या वाटेत येण्याचा गाढवपणा करणा-या माणसाची काही धडगत नसायची.  :)  आईला एरवी वेळ नसायचा पण अमावस्येला मात्र माझ्यावर बरोब्बर लक्ष ठेऊन असायची ती.  आमच्या मधल्या खोलीच्या खिडकीबाहेर नेमके फणसाचे प्रचंड मोठे झाड होते.  अमावस्येला न चुकता दुपारीच ती खिडकी बंद व्हायची.  मग रात्रीच्या वेळी आजी, तिच्या सुना, माझी आई इत्यादी मंडळींच्या  देवचाराच्या गोष्टी सुरू व्हायच्या आणि मी तोंड उघडे टाकुन त्या ऐकत बसायचे.  
रानातुन फिरताना मला खुप आशा वाटायची की कुठल्यातरी झाडावर बसलेला देवचार मला दिसेल म्हणुन.  पण तसे कधीही झाले नाही :(.  बहुतेक देवचाराला लहान मुलांमध्ये रस नव्हता.   पण ह्या देवचारांमुळे मला संध्याकाळी जास्त वेळ बाहेर फिरायला मनाई होती.  जराजरा काळोख पडायला लागला की परतावे लागायचे, नाहितर आई कोणालातरी पाठवायची मला शोधुन आणायला.

लहानपणी मला आईसफ्रुटचे जबरदस्त आकर्षण होते.  पण आम्हाला मात्र महिन्यातुन एकदा, बाबांची मनिऑर्डर आलीकीच आईसफ्रुट मिळायचे.  ज्या दिवशी मनिऑर्डर यायची त्या दिवशी आम्ही आईसफ्रुटवाल्याच्या आगमनाकडे डोळे लाऊन बसायचो.  तो आला रे आला की पहिली उडी माझीच असायची.  कधीकधी दोन दोन महिने यायचीच नाही मनिऑर्डर. अर्थात मग नो आईसफ्रुट!!!!  तेव्हा आमच्याइतके गरीब जगात अजुन कोणीच नसणार याची खात्री पटायची.  :P  आता कधी इच्छाही होत नाही आईस्फ्रुट खावे म्हणुन.
तेव्हा राजेश खन्ना हा तरुणींच्या दिलाची धडकन होता.  अर्थात मला तेव्हा त्याचे नाव माहित नव्हते.  आमच्या बरोबरचे भाडेकरु होते त्यांची इंदु नावाची मुलगी होती.  घरमालकांची रुबी नावाची बहिण होती.  ह्या दोघी आणि आजुबाजुच्या इतर मुली मिळून गोविंद चित्र मंदिरात जात आणि सोबत कधीकधी मलाही घेऊन जात.  तेव्हा पाहिलेले मेरे जीवनसाथी,  हाथी मेरे साथी वगैरे पिक्चर नंतर मोठी झाल्यावर परत पाहिले तेव्हा कळले की त्या सगळ्या मुली ज्याच्याबद्दल दिवसभर बोलत असायचा तो राजेश खन्ना होता :).  मला तेव्हा पिक्चर अजिबात आवडत नसत.  बहुतेक वेळा थियेटरातुन मला झोपलेली उचलुन आणावे लागायचे.  तुला परत नेणार नाही म्हणत परत पुढच्या वेळी घेऊन जात.  संजिवकुमारच्या एका पिक्चरचे शुटींगही तेव्हा वाडीत आणि आंबोली घाटात झाले होते.  लोकांना बरेच दिवस हा विषय बोलायला पुरला होता.

वाडीला राहात असताना मला शाळेला चार दिवसांची सुट्टी मिळाली आणि नेमके तेव्हाच कोणी गावाहुन आलेले असले तर आई मला लगेच आंबोलीला धाडुन द्यायची.  वेगवेगळ्या सिजन्समध्ये आंबोलीत वेगवेगळी मज्जा असायची.  मात्र मे महिन्यात गेले की मज्जाच मज्जा.  मे महिन्यात भरपुर रानमेवा मिळायचा.  माझी मावशी तेव्हा शाळकरी वयाची होती.  सुट्टीत ती, तिच्या मैत्रिणी आणि सोबत मी असे सगळे जण रानात फिरुन नेरडी, ढवसे, तोरणे, करवंदे वगैरे गोळा करायच्या उद्योगात मग्न असायचो.   तोरणे अतिशय आंबट असायची,  त्याउलट ढवसे अगदी गुळमट.  पण तरीही ते सगळे खाल्ले जायचे.  अतिशय लहान आणि सुमधुर जांभळे फक्त आंबोलीतच मिळायची.  यापैकी नेरडी/नेर्ली मला महिमंडणगडावर परत भेटली,  करवंदे भेटतात मधुन मधुन,  पण आंबोलीची वेगळीच रेडे करवंदे मात्र भेटली नाहीत. ढवसे आणि तोरणे बहुतेक आंबोलीतच गडपली.  कित्येक वर्षे शोधतेय, पण अजुन पत्ता नाही..  आणि दुर्दैव म्हणजे हा खजिना लुटायला आम्ही ज्या रानात जायचो,  ते रान तोडुन तिथे प्लॉट्स पाडुन ते विकले गेले  आणि मी त्यापैकीच एक प्लॉट घेऊन आता तिथे घरही बांधले.  म्हणजे आता ढवसे आणि तोरणे परत भेटायची शक्यता पुर्णपणे दुरावलीय.. :(.

उन्हाळ्यात शेतीची कामेही असत. मला या सगळ्यात भरपुर रस असल्याने मी मावशी/आजीबरोबर शेतावरही जायचे.  आंबोली म्हणजे सगळे तांदुळमय जगत. तसे काही काही लोक नाचणीही करत. पण बाकी सगळे तांदळाचेच राज्य.  मी कापणी सुरू झाल्यापासुन शेतावर जायला लागायचे. अर्थात काम तर काहीच करायचे नाही.  फक्त पाहायला.  तिथल्या कामकरी बायका मला खुप कौतुकाने सगळे दाखवायच्या.  भात कापुन, मग खळ्यात ते तुडवुन, पाखडुन घरी आणले जायचे.  मग लाकडाच्या जात्यावर (भिरट) भरडायचे.  असे भरडले की भातावरची सगळी फोलपटे निघुन जात आणि लाल रंगाचा तांदुळ बाहेर पडे (पटनी तांदुळ).  मग तो तांदुळ व्हायनात घालुन मुसळाने सडायचा.  (घराच्या एका खोलीत, जिथे धान्य वगैरे साठवत तिथे, पेल्याच्या आकाराचे पण मोठ्या तांब्याएवढे लोखंडाचे भांडे  जमिनीत उभे  पुरत.  ते वरुन पाहायला जमिनीत रुतवलेल्या पेल्यासारखे दिसायचे. आणि मुसळ म्हणजे भरीव लाकडाचा बाहेरुन पुर्ण गोल तासलेला ४-५ फुट लांब दांडा.  त्याचा व्यास साधारण २-३ इंच असतो. एका टोकाला बाहेरुन १-१.५ इंच रुंद लोखंडाचे गोल आवरण असते.  ह्या बाजुने तांदुळ सडायचे. ह्यासाठी जे लाकुड वापरतात ते खुप जड असते.  बहुतेक शिसम वगैरे झाडाचे वापरायचे.) सडल्यावर ते वरचे लाल रंगाचे आवरण निघुन जाई आणि गुलाबी रंगाचा,  आपण खातो तो तांदुळ आणि कण्या उरायच्या.  मग तो तांदुळ आणि कण्या बांबुपासुन बनवलेल्या चटयांच्या पिंपात भरुन ठेवायचा. की झाली वर्षाची बेगमी.  ही पिंपे आतुन बाहेरुन गाईच्या शेणाने सारवलेली असत.  तांदुळ भातासाठी आणि कण्या दळुन भाकरीसाठी.

मी ही सगळी कामे आवडीने पाहायचे.  भात घराबाहेरच्या खळ्यात आले की माझा हट्ट सुरू,  मला पण काम करायचेय.  मग आजी मला किलोभर भात द्यायची.  ते घेऊन सगळ्यात शेवटी मी भिरटावर बसायचे,  भिरटाची रुंदी एवढी असायची की माझा हात पुरायचा नाही.  कोणाची तरी मदत घेऊनच काम करावे लागायचे.  भाताची तुसे निघाल्यावर ते तांदुळ घेऊन लगेच व्हायनात घालुन सगळ्यात छोटे मुसळ घेऊन सडायचे. ५ मिनिटांतच कोणीतरी मदतीला धावायचे. मग मावशी जात्यावर तांदुळ दळुन मला त्याच्या भाक-या करुन द्यायची.  मी स्वतः बनवलेल्या तांदळाची भाकरी खाताना मला खुप बरे वाटायचे.

मुसळाने तांदुळ सडणा-या बायकांचे कौशल्य पाहण्यासारखे असे.  तिघी तिघी एकत्र सडायच्या पण कधी दोन मुसळे एकत्र व्हायनात गेलेली मी पाहिली नाहीत.  एकीचे मुसळ जरा वर उचललं जातंय तोच दुसरीचं दाण्णकण तांदळावर आदळे,  तिने जरा वर उचलले तोच तिसरीचे  खाली येई.  आणि हे करताना चौथी खाली बसुन मधुन मधुन बाहेर उडणारे तांदुळ परत व्हायनात ढकलायचे काम करत असायची.  मी सडताना दर दोन फटक्यांनंतर एक फटका व्हायनाच्या कडेवर बसुन टाण्ण... आवाज यायचा. माझ्याच उंचीचे मुसळ उचलुन तांदुळ सडायचे म्हणजे काय खाऊ नाही.  ५-७ मिनिटांतच मी दमायचे. मग कोणीतरी यायचे मदत करायला  आणि माझे मुसळ बाजुला ठेवून दुसरे मोठे मुसळ घेऊन तांदुळ सडुन द्यायचे. मला मात्र फुकटचा आनंद व्हायचा मीच सगळे केले म्हणुन :)

गेल्या वर्षी मे महिन्यात गावी गेले तर नुकतेच नवे भात शेतातुन आले होते.  मी गाडी घेऊन बाजारात जातेय म्हटल्यावर माझी काकी लगेच एक पोते उचलुन माझ्याबरोबर आली गिरणीवर जायला म्हणुन.  आता गावी भात घेऊन गिरणीवर जायचे आणि तांदुळ घेऊन तासाभरात घरी परत..  ती भिरटे, मुसळे आणि व्हायने इतिहासजमा झाली.  नविन घरात व्हायनांची गरजच नाही आणि जुन्या घरातील व्हायनांवर झाकणे टाकुन बंद केली.

हिरण्यकेशीला जाणे हाही माझा आवडता उद्योग होता.  अर्थात मला तिकडे एकटे कोणी पाठवत नसत.  मग तिकडे शेत कसायला जाणा-या बायकांबरोबर जाणे हा मार्ग माझ्याकडे उरे.  रोजरोज घरातले कोण कसे काय येणार माझ्याबरोबर??  मी रोज चालत हिरण्यकेशीच्या वरच्या अंगाला असलेल्या शेतांमध्ये जाई.  बरोबरीच्या बायकांना जंगलाची पुर्ण माहिती असे.  चालताचालता मध्येच थांबुन जमिनीतुन वर आलेल्या गवतावरुन खाली असलेल्या कंदाची बरोबर परिक्षा करुन त्या  ते कंद उकरुन काढत.  कच्चेच मला खायला देत.  खुप छान लागायचे. कसले असायचे माहित नाही.  पण मी कुठल्याच गोष्टीला नाही म्हणायचे नाही.  तहान लागली आणि पाणी संपले तर एका विशिष्ट वेलीचा थोडासा भाग कापुन घेत.  मग तो भाग उभा फाडायचा आणि आतला गराचा भाग चावायचा.  जसे चावत जाऊ तसे त्याला पाणी सुटत जाई. आपोआप तहान भागायची.  आता हिरण्यकेशीला जायचे म्हटले तर कोणी चालत यायला तयार नसते. गाडीशिवाय कोणी हलत नाही.  आणि त्या वेली मला कुठे दिसतही नाहीत.  दिसल्या तरी मला ओळखता येणार नाहीत :(

आंबोलीला असे मजेत आयुष्य जात असताना मग जुन उजाडायचा आणि सोबत वाडीला परतायचा दिवसही :(.  मी 'वाडीला जाणार नाही' म्हणुन रडुन घातलेल्या गोंधळाच्या हकिकती आजी आजही सांगते :).  दरवेळी लपुन बसायची नविन नविन ठिकाणे मी शोधायचे.  पण हाय... कधीकधी १-२ दिवसांचे एक्स्टेंशन मिळायचे, पण शेवटी जावे तर लागायचेच.

आंबोलीला कोणी उकडा तांदुळ बनवायचे नाही.  साध्या तांदळाला सुरय तांदुळ म्हणायचे आणि दुसरा उकडा.  हा उकडा तांदुळ वाडीला घरमालकिण आजी बनवायची.  घराच्या मागिलदारी  कायमच्या चुली मांडलेल्या होत्या असली सगळी कामे करायला.  एप्रिल/मे महिन्यात बहुतेक दिवस ह्या चुली पेटत असायच्या.  आधी मोठमोठ्या टोपात पाणी उकळत ठेवत. आणि मग त्या उकळत्या पाण्यात पोत्यांनी भात ओतायचे.  टरफलाच्या आत तांदुळ शिजायचा.  मग ते शिजलेले भात काढुन खळ्यात वाळवायचे.  खडखडीत वाळल्यावर भिरटीवर भरडुन तुस काढुन टाकले की उकडा तांदुळ तय्यार....

त्याच टोपांमध्ये पाणी उकळुन त्यात रिठे टाकायचे.  मग त्यात चादरी, गोधड्या भिजवुन मग धुवायच्या.  पावसाळ्यापुर्वी हा एक महत्वाचा उद्योग असे.  रानातुन रिठे गोळा करुन आणायचे काम मी करायचे.
मे महिन्यात तशी वाडीतही मज्जा असायची.  कधी गावाला नेणारा कोणी उशीरा आला की माझा एप्रिल्/मे अर्धा वाडीतच जायचा.  एप्रिल-मे महिन्यात वाडीत आंब्याची मज्जा असायची.  तेव्हा आंबे डझनावर घ्यायची पद्धत नव्हती.  सरळ शेकड्यात व्यवहार.  (पेडवे, बांगडे पण शेकड्यात. मग वाटत बसायचे सगळ्यांना :) ).  एप्रिल-मे मध्ये मी आणि भाऊ जेवायचोच नाही.  घरात आंबे पिकत घातलेले असायचे.  त्यातलेच येताजाता खायचे.  घरमालक आंब्याची झाडे व्यापा-यांना देत. सिजनमध्ये मग आंबे उतरवण्याचा उद्योग चालु असायचा.  मी त्यात उगाचच लुडबुडत असायचे.  दिवसभर आंब्यातच वावरायचे आणि मिळतील तेवढे आंबे खात बसायचे.  झाडांवरचे सगळेच आंबे काही उतरवले जात नसत.  हे उरलेले आंबे झाडावरच पिकायचे.  दुपारच्या कडक उन्हात वा-याची हलकीशी झुळुक जरी आली तरी एखादा आंबा धप्प... करुन पडायचा.  मी आणि भाऊ दुपारच्या वेळी पाय-यांवर बसुन ह्याच आवाजाची वाट पाहायचो.  आवाज आला की आवाजाच्या रोखाने धावायचे. शोधाशोधीनंतर आंबा मिळायचा.  तो हमखास चानीने नाहीतर पोपटाने चाखलेला असायचा.  आम्हाला काही फरक पडायचा नाही.  तो अवीट चवीचा आंबा आम्ही लगेच आळीपाळीने खायचो.

हे सुखाचे दिवस कधी संपले कळलेही नाही.  एका मे महिन्यात आईने सगळे सामान बांधले.  बाबांनी आम्हाला मुंबईला बोलावले होते.  आता मला आठवतही नाही मला आनंद झाला होता की दु:ख ते.  फक्त डोळ्यासमोर घराच्या पाय-या दिसतात आणि त्यावर बसलेली दोन छोटी मुले.  एक झुळुक येते आणि पाठोपाठ धप्प्प..... दोघेही धावतात, आंबा शोधुन काढतात आणि आळीपाळीने चोखतात.  बस्स..  तोच माझा शेवटचा झाडावर पिकलेला आंबा.  आता तर आंबे खाणेही सोडुन दिलेय.  मला इथल्या आंब्यांची चव अजिबात आवडत नाही.
त्याच संध्याकाळी गाडीत बसुन आम्ही दुस-या दिवशी मुंबईला आलो.  वाडीला मोकळ्या रानात फिरणारी मी इथे वाण्याच्या चाळीतल्या १०x१२ च्या एका खोलीत येऊन पडले.  चाळीखाली वाहती गटारे.  तिथेच खेळणारी मुले. मी एकदा ते पाहिल्यावर परत खाली पाय ठेवला ते फक्त बाहेर जाण्यासाठी.  तिथे कधीही मोकळेपणे फिरू शकले नाही,  ना कधी खेळू शकले.  बाबा चांदोबा, किशोर आणि इतर गोष्टींची पुस्तके  आणायचे.   मी हळुहळु पुस्तकांमध्ये रमत गेले आणि मग बाहेर जायची गरजच राहिली नाही.  सावंतवाडीतुन निघालो तेव्हाच बालपण संपलेलं होतं.... :(

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लघु अजान वृक्ष - Ehretia Laevis

गारंबीची बी

फाईकस लाइरटा Ficus lyrata

अडुळसा Justicia Adhatoda

बोरिवली नॅशनल पार्क - एक भेट