गारंबीची बी
आज अकस्मात गारंबीची बी पहावयास मिळाली.
हिला गायरी असेही म्हणतात.
ह्याची जी वेल असते ती साधीसुधी नसते तर महावेल असते. शास्त्रीय भाषेत Liana म्हणतात त्या प्रकारची प्रचंड वेल, जी साधारण जंगलात उंच वृक्षांवर चढलेली आढळते. ह्याची शेंगही काही फूट लांब असते. अजून ही वेल प्रत्यक्ष पहायचे भाग्य मला लाभलेले नाही.
शास्त्रीय नाव Entanda rheedii किंवा Entanda Puesartha.
एप्रिल २०२२चा अपडेट : मी वर लिहिलेय कि हा वेल मला अजून पाहायला मिळाला नाहीय. तेव्हा पाहिला नव्हता पण आता पाहिलेला आहे.
आंबोलीत कायमच्या मुक्कामाला आल्यावर आंबोली घाटातून सावंतवाडी फेऱ्या वाढल्या. अशाच एका फेरीत मला एका १० मजली झाडावर काहीतरी टांगलेले दिसले. इतक्या उंचीवर दिसतेय म्हणजे कुठल्यातरी मोठ्या पक्ष्याने घरट्यासाठी म्हणून मोठे फडके नेऊन तिथे टाकले असणार असे मला वाटले. पण तरी खात्री करण्यासाठी म्हणून पुढच्या वेळेस दुर्बीण घेऊन गेले व बघते तर ते फडके नव्हते तर एक मोठी काळी शेंग झाडावर लटकलेली दिसली. शेंग पाहिल्यावर ती गारंबीची शेंग याची खात्री पटली. गारंबीचा महावेल त्या झाडावर चढून त्याला शेंग लागलेली. नंतर कधीतरी तिथे थांबून वेल शोधला . वेलीपर्यंत जाता आले नाही पण पाहता आला . तेव्हा त्याला फुलोरा आलेला. फोटो मात्र काढता आले नाहीत.
आंबोली घाटातून कोणी जात असेल व वेल पाहायचा असेल तर सावंतवाडीहुन घाटात येताना, घाट सुरु व्हायच्या आधी गोव्याला जाणारा जो फाटा आहे, त्याच्या जरासेच पुढे एक हिरव्या कपड्याने झाकलेली टपरी आहे, तिच्या मागच्या बाजूने खाली उतरून मागच्या जंगलात पाहावे. तिथेच पाण्याचा ओहोळ असल्याने ओलांडून जाता येत नाही पण ओहोळाच्या दुसर्या बाजूला जंगल आहे व तिथेच गारंबीचा वेल पसरलेला आहे. ती शेंग मात्र पडून गेली..
टिप्पण्या