फाईकस लाइरटा Ficus lyrata






ऑफिसात फिरताना ही झाडे अनेकदा पाहिली.  प्रथमदर्शनी समुद्रफुलांची झाडे वाटली, Barringtonia Asiatica.  म्हणून फारसे लक्ष दिले नाही.



पण पाने जवळून पाहताना फरक लक्षात येऊ लागले.  पानांचा पुंजका व रंग जरी समुद्रफुलासारखा असला तरी याची पाने वेगळी होती. समुद्रफुलांची पाने टोकाला निमुळती होतात.  याची पाने टोकाला चक्क चौकोनी आकाराची होती. टोक असे नाहीच.

मग शोधाशोध सुरू केली.   इंडियन फ्लोरा ह्या फेसबुक ग्रुपवर माहितीगार भरपूर आहेत.  तिथे नाव कळले, फाईकस लाईराटा Ficus lyrata.  याच्या पानांचा आकार लायर नावाच्या एका ग्रीक वाद्यासारखा आहे म्हणून लाईराटा व फाईकस हे त्याचे कूळ.

पाने तशी बऱ्यापैकी मोठी आहेत, आपला दीड पंजा मावेल इतकी.  काल सहज फिरायला गेल्यावर झाडे परत दिसली.  एक दोन झाडांवर हिरवी फळे लागलेली दिसली.  म्हटले फळे लागली म्हणजे फुले येऊन गेली असणार आणि तरीही मला दिसली नाहीत.....



पण फाईकस कुळातले झाड आहे हे समजल्यावर फुले पहावयास न  मिळाल्याची चुटपुट कमी झाली.  फाईकस कुटुंबात दर्शनी फुले अशी नसतात.  फांद्यांवर, पानांच्या बेचक्यात हिरव्या गाठी येतात ज्याच्या आत फुले असतात.  आपले वड, पिंपळ, उंबर, अंजीर हे सगळे फाईकस.  त्यामुळे त्यांची फुले कधीच दिसत नाहीत.  त्या हिरव्या गाठीच्या आत लहान लहान असंख्य फुले असतात.  त्यांच्या परागीभवनाची सोय निसर्गाने केलेली आहे.  त्या प्रत्येक बारकुंड्या फुलाचे बारकुंडे फळ होते व आता हिरवेपण सोडून लाल झालेल्या बाह्य आवरणातील एकत्रित फळांना आपण अंजीर, उंबर वगैरे नावांनी ओळखतो.

फाईकस लाईराटा शोभेचे झाड म्हणून लावलेले दिसते.  हे देशी झाड नाही तर पश्चिम आफ्रिकेतुन इथे आलेय. दिसायला खूप सुंदर असल्याने बागांमधून लावले जाते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लघु अजान वृक्ष - Ehretia Laevis

गारंबीची बी

बालपणीचा काळ सुखाचा.........

अडुळसा Justicia Adhatoda

मग मी मूर्ख कसा?