आनंदाचे फळ
आज मला आनंदी आनंद गडे असे झालेय. लेक व मी दोघींनी आनंद साजरा करूनही तो अजून भरपूर उरलाय. तो आता सर्वत्र वाटतेय. घरचा सगळा कचरा घरच्या कुंड्यांमध्येच जिरवायची सवय. त्यामुळे माझ्याकडे कायम पपई, सीताफळ, आंबा वगैरे मंडळी रुजून येतात. त्यात पपई व सीताफळ तर भरपूर, आज बिया टाकल्या की आठवड्यात रोप हजर. माझ्याकडे आता फारसे ऊन नसल्याने मी ही रोपे अगदी लहान असतानाच काढून टाकते, तरी काही चुकार रोपे तशीच राहतात. ही सगळी जनता स्वतःहून उगवलेली असल्यामुळे कुंडीमालक वेगळे झाड असते आणि हे पोट भाडेकरू. असेच कण्हेरीच्या कुंडीत एक सिताफळाचे रोप राहून गेले. कण्हेरीच्या पसाऱ्यात मला ते आधी दिसले नाही, फूटभर वाढल्यावर दिसायला लागले आणि इतके वाढलेले काढायला जीव झाला नाही. मग ते तसेच राहिले. किती वर्षे झाली देव जाणे. चार पाच वर्षे नक्की झाली असतील. मी त्याला कितीदा छाटलेही असेन. झाड साधारण तीन फूट उंच व चारपाच फांद्या असे रूप आहे. कण्हेरीसोबत राहतेय. गेल्या वर्षी सीताफळाला फुले लागली होती पण ती सगळी बारकुंडी नर फुले होती. त्यांना सिताफळे लागणार नव्हती. यंदा मार्च- एप्रिलपासून मांसल पाकळ्यांची मोठी फुले यायला ला...