माझ्या बकेट लिस्टचा प्रवास

 बकेट लिस्ट हा शब्दप्रयोग मला अगदी अलीकडच्या काळात कळला. त्या आधी माझ्या फक्त इच्छा होत्या. इच्छा हा शब्दही मी चुकीचाच वापरतेय. जे काही होते त्यातल्या काहीना मुंगेरीलाल के हसीं सपने म्हणायला हवे. थिंक बिग ड्रिम बिग वगैरे मोटीवेशनल स्पिकरवाल्यांच्या बाता कानांना कितीही गोड वाटल्या तरी जर्रा फुलके आफताब नही होता हेच खरे.

कित्येक इच्छा मनात चक्कर मारुन गेल्या. काही टिकल्या, काही विरल्या. काही पुर्त झाल्या, काहींची अपुर्तता आजही काळजात कळ ऊमटवते तर काही इच्छा नुसत्या आठवल्या तरी ‘ बाल बाल बच गयी मै...’ हे फिलींग येऊन आपण किती सुखात आहोत याची जाणिव मन को बाग बाग बना देती है.. काही सुप्त, काही अतीसुप्त तर काही दिवसातुन दहा वेळा तोंडुन वदल्या जात होत्या. सुप्त अतीसुप्तांचा मलाच पत्ता नव्हता. ज्या दिवसभर घोकल्या जात होत्या त्या प्रत्यक्षात न ऊतरण्याची हजार कारणे घरचे लगेच दाखवुन देत होते. (आमच्याकडे ह्या बाबतीत अजिबात हयगय केली जात नाही).

तर अशीच टेरेस फ्लॅटची इच्छा मनात सुप्तावस्थेत होती. जमिनीपासुन वर कुठलाही मजला, घरातील प्रशस्त हॅाल व त्याच्या समोर अतीप्रशस्त अशी टेरेस, त्यावर सुंदर झोपाळा हे स्वप्न होते. त्या झोपाळ्यावर झुलणारी मी, लांब पदर हवेवर सोडुन, कठड्यावर रेलुन लांब क्षितीजापार बघणारी मी ही हिंदी चित्रपटीय खिचडी डोक्यात पकत रहायची. पण हे केवळ स्वप्नरंजनच होते. मुंबईत असले घर घेणे अजुन दहा जन्म तरी आपल्याला जमणार नाही याची खात्री दर महिन्याचा पगार देत होता.

पण अल्ला मेहेरबान तो गधा भी पैलवान हे काय खोटे नाही. भाड्याने काही वर्षे काढल्यावर स्वत:चे घर घ्यायला जीव तळमळायला लागला. आपल्या तोकड्या बजेटमध्ये घर बसेल का ही धाकधूक होतीच, त्यात तेव्हा नव्या मुंबईत मोठ्या घरांचे पेव फुटलेले. मर्यादित बजेटवाल्यानी जायचे कुठे? आंधळ्यांच्या गाई शेवटी देवालाच राखाव्या लागतात. देवच धावला आणि सिडकोने त्यांची पाचसात वर्षे न खपलेली घरे २५ टक्क्यांचे घसघशीत डिस्काऊंट देऊन विकायला काढली. ही खुशखबर जाहीर करणारे फलक सर्वत्र झळकले पण सुमार बांधकामाबद्दलची त्यांची ख्याती माहीत असल्याने मी तिकडे दुर्लक्ष केले. एका ओळखीतल्याने खुपच आग्रह केला म्हणुन निदान बघुन तरी येऊ म्हणुन एकदाचे गेलो. मला सिडकोचे घर अज्जाबातच्च घ्यायचेच्च नाहीयेच्च हे जाण्याआधीच नवऱ्याला बजावुन ठेवले होते.

पण जाऊन बघते तो काय!! थोडी जुनी पण अतिशय सुंदर घरे माझी वाट पाहात ऊभी होती. एकमजली टुमदार स्वतंत्र घर इतक्या कमी किंमतीत बघुन मी लगेच एका घरावर शिक्कामोर्तब केले. पण ज्याने आग्रह केलेला तो म्हणाला की फायनल करण्याआधी अजुन काही घरे आहेत तीही बघुन घे, नंतर तुला हळहळ वाटायला नको... म्हटले ठिक आहे, तीही बघुन घेऊ. तो एका घरी घेऊन गेला. दारातुन आत पाऊल टाकले आणि मी तिथेच खिळुन ऊभी राहिले. आजवर केवळ स्वप्नात पाहात होते ती टेरेस तिथेच हॅालपलीकडे माझी वाट पाहात ऊभी होती. हेच घर घ्यायचे हे ठरवायला बाकीचे ऊरलेले घर बघायची गरज पडलीच नाही. यथावकाश त्या टेरेसवर झोपाळाही आला आणि त्यावर नुसते झुलतानाच इतके छान वाटत राहिले की इतर हिंदी चित्रपटीय कल्पना आठवल्याही नाहीत..

या टेरेसमुळे आयुष्यात निसर्ग आला. भाड्याच्या घरात एक गुलाब कुंडीत वाढवलेले होते. ती एक कुंडी इथल्या टेरेसवर स्थानापन्न झाल्यावर तिच्या शंभर कुंड्या कधी झाल्या कळलेच नाही. या कुंड्यांनी शेती करायची इच्छा बकेट लिस्टीत कधी टाकली तेही कळले नाही. रिटायर झाल्यावर माझ्या लाडक्या आंबोलीत जाऊन कायमचे राहायची इच्छा अतीसुप्तपणे कित्येक वर्षे मनात होती, मला तिचे अस्तित्वही माहित नव्हते. पण शेती बकेट लिस्टीत आल्यावर तिला पुरक म्हणुन आंबोलीही बकेट लिस्टीत जाऊन बसली. आता मात्र घरचे वैतागले. विकेंडला खुरपे घेऊन कुंड्या खुरपत बसतेस, ठिकाय; शेती करायचे म्हणतेस, ठिकाय; तुझ्या बाबानेही कधी शेती केली नाही तर तु काय करणारेस ते आम्हाला माहित आहे. पण हे आंबोलीला जायचे काय खुळ डोक्यात आले? लोक मुंबईला यायला धडपडतात आणि तुला गावी जायचेय.

घरचे इतके बोलल्यावर मी गप्प बसावे हे स्वभावातच नाही ना ... मी भेटेल त्याला शेती व आंबोली या माझ्या इच्छा बोलुन दाखवायला सुरवात केली. काहीजण हलकेच हसुन विषय बदलायचे. काहीजण शहरातुन गावी गेल्यावर मौजेचे पहिले चार दिवस संपले की हॅाटेल, मॅाल, मल्टीप्लेक्स, शॅापिंग, फास्ट लाईफ या सगळ्याला आपण कसे मिस करतो आणि परत शहरात पळतो हे मला नीट समजवायचे. मीही मग शहाण्या मुलीसारखे मान डोलवायचे. पण कोणाच्या समजावण्याने इच्छा निघुन जातात का हो? मुळात त्या कुठून व का येतात हे तरी कुठे कोणाला माहित आहे. काहीच हासभास नसताना त्या अचानक एके दिवशी मनात राहायला येतात. त्यांनी आगमनाची वर्दी दिली की त्यांची मुस्कटदाबी करुन मनाच्या तळाशी त्यांना खोलवर गाडुन टाकायचे किंवा पाठपुरावा करुन त्यांची पुर्तता करायची एवढेच आपल्या हाती ऊरते.

या दोन्ही इच्छा अशाच मनात नांदत राहिल्या. त्या इतक्या प्रबळ होत्या की त्यांची मुस्कटदाबी करण्याइतकी ताकद माझ्या हातात त्यानी ठेवली नाही. पण त्यांची पुर्तता करणेही शक्य नाही हे मला माहित होते. माझे घर शेतकऱ्यांचे नाही. थोडी जमीन होती पण कोणाला त्यात खास रस नव्हता. घरात शंभर विषय चर्चीले जात पण त्यात शेती हा विषय कधीही नव्हता. त्यामुळे मला शेतीची माहिती शुन्य. आणि मुंबईचा संसार सोडुन आंबोलीला कुठे जाणार? रिटायर होऊ तेव्हा बघू. असा विचार करुन मी इच्छांचा हल्ला परतवुन लावत असे.

त्या प्रबळ इच्छांनी स्वत:च स्वत:साठी मार्ग शोधला. कुंड्यामधुन सुरू झालेला प्रवास शहरी शेतीमार्गे नैसर्गिक शेतीपाशी येऊन पोचला. त्या दरम्यान शेतीविषयक माहिती गोळा करत राहिले. लोकांना भेटत राहिले, शेती कशी करतात याचे मिळेल तिथे निरीक्षण करत राहिले. शेती कशी करायची याचे पुस्तकी ज्ञान मिळवले तरी प्रत्यक्ष शेती करायला जमीन तर हवी. ती मिळवायच्या प्रयत्नात माझी फसवणुक झाली, आर्थिक नुकसान झाले, मानसिक नुकसान जमेस धरायची पद्धत नाही म्हणुन..
पण इच्छा डगमगल्या नाहीत. स्वत:चे घोडे कसेही करुन गंगेत नाहवायचा त्यानी चंगच बांधला होता. घरची वडिलोर्पार्जीत जमीन घरात कुणालाच कसायची नव्हती. तुम्हाला नको तर मीच कसते म्हटल्यावर जबाबदारीतून सुटल्याच्या आनंदात संबंधितांनी व इच्छापुर्तीच्या दिशेने पहिले पाऊल या आनंदात माझ्या इच्छांनी गिरक्या मारल्या. शेत मुंबईत राहुन कसे कसेन ह्या प्रश्नाचे ऊत्तर शोधण्याइतका वेळ इच्छानी मला दिला नाही. मी पुढचा विचार न करता शेतघर, मजबुत कुंपण इत्यादी तयारी सुरू केली आणि पहिला लॅाकडाऊन सुरू झाला.

करोनाने किती नुकसान केले याच्या असंख्य कहाण्या वाचल्या आणि ऐकल्या. मला मात्र करोनाने हात दिला. आंबोलीत लोकांकडुन कामे करुन घेणे कठीण. पण करोनाकाळात सगळे ठप्प झाल्यामुळे कामे गमावलेले लोक मे मध्ये लॅाकडाऊनला थोडी शिथीलता मिळाल्यावर कामाला न कुरकूरता तयार झाले. त्यामुळे कुंपण व शेतघर दोनतीन महिन्यात ऊभे राहिले. सगळ्यांनाच वर्क फ्रॅाम होम मिळाल्यामुळे आंबोलीला सहकुटूंब बेस हलवण्यासाठी रिटायरमेंटची वाट पाहण्याची गरज ऊरली नाही. बेग-बॅारो करत शेतीला एकदाची सुरवात झाली आणि इच्छांनी त्यांच्या बकेटलिस्टवर टिक मारली. आता एकदा सुरवात झाल्यावर पुढचे निभावणे मला करायला हवेच. करीयरमधला हा तिसरा चेंज.

बकेट लिस्टीत अजुन कित्येक इच्छा आहेत/असाव्यात. मी कधीही ठरवुन काही केले नाही. जेव्हा ठरवुन केले तेव्हा जे हवेसे वाटले ते मिळाले नाही. मिळायची असोशी विरल्यावर कधीतरी मिळाले.... जेव्हा मिळायला हवे असे वाटत होते तेव्हा माझी घ्यायची तयारी नसावी, त्यामुळे मी तयार झाल्यावर मला मिळाले असणार... कर्म थियरीवर विश्वास ठेवणाऱ्यांकडे सगळ्याचे संदर्भासहीत किंवा विरहीत स्पष्टीकरण तयार असते. पण ठरवल्यावर मिळत नाही हा अनुभव ध्यानात घेऊन आता काही ठरवायचे नाही असे ठरवले आहे. करोनाने तर मिळालेला प्रत्येक दिवस बोनस हे सत्य लख्खपणे दाखवले आहे.

तरी सोलो वुमन ट्रॅवेलर बनुन भारत फिरायचा आहे (एक ट्रिप केलेली आहे, वृ कधीचा तयार आहे, इथे टाकायला हवा). लेह, ऊत्तराखंडात महिनाभर राहुन निवांत निसर्ग बघायचा आहे, ईशान्य भारत पाहायचे आमंत्रण गेली दहा वर्षे वाट पाहात आहे, अंकोर वट बघायचे आहे. पण सद्ध्या शेती सोडुन इतर कशासाठीही वेळ नाही. ती नीट मार्गी लागली की मग बाकीचे सारे... तोवर बकेट लिस्ट अजुन वाढेल. काय करणार, आयुष्य एकच पण ख्वाईशे हजार.. और वो हजार ख्वाईशे भी ऐसी के.....


( मायबोली  गणेशोत्सवासाठी लिहिलेला हा लेख इथे आणला. मूळ  लेख इथे आहे https://www.maayboli.com/node/80005)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लघु अजान वृक्ष - Ehretia Laevis

गारंबीची बी

फाईकस लाइरटा Ficus lyrata

बालपणीचा काळ सुखाचा.........

अडुळसा Justicia Adhatoda

मग मी मूर्ख कसा?