भाभा अणुशक्ती केंद्रात एक दिवस.....
मध्य मुंबई मराठी विज्ञान संघाने आयोजित केलेल्या भाभा अणू संशोधन केंद्रभेटीत सहभागी व्हायची संधी श्री. तुषार देसाई यांच्यामुळे लाभली. अणुशक्तीनगरात वसलेली ही निसर्गरम्य जागा बाहेरून येता जाता कित्येकदा पाहिली होती. पण आत प्रवेश मिळत नाही हे माहीत असल्याने आतला परिसर पाहण्याची खूप उत्सुकता होती. अनासाये संधी मिळतेय म्हटल्यावर मी ऑफिसचे काम बाजूला ठेऊन आधी या संधीचा लाभ घ्यायचे ठरवले.
ठरल्याप्रमाणे दिनांक १६ फेब्रुवारी २०१८ ला बीएआरसिच्या वृंदावन या इमारतीत सगळे जमले. एकूण ४८ उत्साहीजण या कार्यक्रमासाठी आले होते. नेहमीप्रमाणे काहीजण उशिरा आले, त्यांच्यामुळे वेळेत आलेल्या लोकांना खोळंबून राहावे लागले. तिथेच चहा व इडली-वड्याचा आस्वाद घेऊन सगळे निघाले. आत जाण्यासाठी व फिरण्यासाठी बीएआरसीच्य बसची सोय केली होती. नंतर फिरताना एक भगिनी म्हणाली की मुंबईत फिरणाऱ्या या बसेसमधून कधीतरी फिरायला मिळावे ही खूप इच्छा होती जी आज पूर्ण झाली. आता या बसेस कॉम्प्लेक्सबाहेर फिरत नाहीत.
बीएआरसीमध्ये अतिशय कडक सुरक्षा तपासणी केली जाते. कुठलीही इलेक्ट्रॉनिक वस्तू आत नेता येत नाही. मोबाईल, लॅपटॉप, पेनड्राइव्ह, सिम कार्ड वगैरे काहीही आत नेता येत नाही. लिपस्टिक, पावडर, लिपकेअर, क्रीम्स, मॉइश्चरायझर इत्यादी वस्तूही आत नेता येत नाहीत. आमची बस गेटवर गेल्यानंतर आम्ही बीएआरसीला दिलेल्या पत्राप्रमाणे नंबर लावून उभे राहिलो. बीएआरसीचा एक सुरक्षा अधिकारी येऊन त्याने सगळ्यांचे ओळखपत्र व बॅगा तपासल्या. त्यानंतरही स्त्रियांच्या बॅगेतून लिपस्टिक, लीपबाम इत्यादी वस्तू निघत होत्या. आपल्या पर्समध्ये कुठे काय टाकलेले असते ते आपल्याला नंतर आठवत नाही पण निषिध्द क्षेत्रात आपल्या बॅगेत काही सापडले तर पूर्ण ग्रुप व आयोजकांना त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे निषिद्ध जागी जायचे असल्यास नेहमीची बॅग सोडून दुसरी बॅग नेणे योग्य. असो.
सर्व चाचण्या झाल्यावर बसने आम्ही बीएआरसीच्या एका प्रशस्त हॉलमध्ये गेलो. तिथे आधी चहापान झाल्यानंतर बीएआरसीचे अभियंता श्री. प्रसाद केळकर यांनी संस्थेची माहिती दिली. अणूऊर्जा प्रकल्प म्हणजे केवळ वीजनिर्मिती इतकेच माहीत होते. श्री. केळकरांनी अणूऊर्जेचे बहुविध उपयोग, विषय क्लिष्ट असतानाही, अतिशय सोप्या मराठीत विशद केले. भाभा अणूसंशोधन केंद्र ही एक विविध क्षेत्रात अणूविषयक संशोधन करणारी प्रमुख संस्था आहे. (Multi disciplinary nuclear research centre).
थोर भारतीय शास्त्रज्ञ होमी जहांगीर भाभा यांनी १९५४ मध्ये या केंद्राची मुंबईत ट्रॉमबे इथे स्थापना केली. भविष्यात भारत उर्जेच्या बाबतीत पूर्णतः स्वयंपूर्ण व्हावा या हेतूने त्यांनी भारतीय औष्णिक प्रकल्प तीन टप्प्यात विभागला.
पहिला टप्पा युरेनियम वापरून औष्णिक ऊर्जेची निर्मिती करणे. ह्या टप्प्याला PHWR हे नाव आहे. म्हणजे Pressurised Heavy Water Reactor. निसर्गात सापडणारे शुध्द युरेनियम PHWR अणुभट्टीत वापरून पाणी उकळवायचे व त्या वाफेवर टर्बाइन्स चालवून वीजनिर्मिती करायची. जेव्हा भाभानी हा प्रकल्प सुरू केला तेव्हा PHWR हे तंत्रज्ञान तेव्हाच्या उपलब्ध भारतीय इन्फ्रास्ट्रक्चरला सुयोग्य व फायद्याचे होते.
भारतात नैसर्गिकरित्या असलेले युरेनियमचे मर्यादित साठे व त्यातून मिळालेल्या युरेनियमपैकी वापरण्याजोग्या युरेनियमचे अत्यल्प प्रमाण लक्षात घेता वरील तंत्रज्ञान अमर्याद काळापर्यंत वापरता येणार नाही. त्यामुळे दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्याची योजना केलेली आहे. भारतात अजूनही पहिल्या टप्प्यातील केंद्रे कार्यान्वित आहेत, काही ठिकाणी दुसऱ्या टप्प्यातली केंद्रे सुरू होताहेत. तिसऱ्या टप्प्यात युरेनियमच्या जागी थोरियम वापरले जाईल, ज्याचा भारतात मुबलक साठा आहे. तिसरा टप्पा पूर्णपणे पर्यावरणस्नेही टप्पा असेल.
विजेव्यतिरिक्त अणुभट्टीत तयार होणाऱ्या वेगवेगळ्या बायप्रॉडक्ट्सचे खूप उपयोग आहेत. ही प्रोडक्टस वैद्यकीय क्षेत्रात व अन्नधान्ये सुरक्षित ठेवण्यासाठी वापरतात. वैद्यकीय क्षेत्रात वेगवेगळ्या प्रकारच्या इमेजिंग साठी रेडिओ आईसोटॉप्सचा वापर केला जातो. कर्करोगावरील उपचारात याचा वापर केला जातो. अन्यधान्ये, फळे, फुले यांचे शेल्फलाईफ वाढवण्यासाठी गॅमा किरणांचा वापर केला जातो. औषधे, मेडिकल इक्विपमेंट्स स्टरीलाईज करण्यासाठी गॅमा किरणांचा वापर केला जातो.
ही सगळी माहिती मिळाल्यावर आम्ही बीएआरसीच्या बगीच्यांना भेटी द्यायला निघालो. इथे विस्तीर्ण जागेवर वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडे लावली आहेत. भारतीय गुलाबाच्या दीडशेच्या वर जाती, बोगनवेलीच्या 140 च्या वर जाती, कर्दळीच्या 100 च्या वर जाती इथे जोपासल्या आहेत. सायरस अणुभट्टीचा जो स्टॉक फोटो सर्वत्र वापरला जातो, त्यात समोर जे हिरवे व गुलाबी डिजाईन दिसते ती आहे कर्दळीबाग. त्याच्या बाजूला षटकोणात रचना केलेली बोगनवेलीची बाग आहे. कर्दळीसारखीच ही बाग सुद्धा डिजाईन केलेली आहे. थोड्या उंचावर गुलाबबाग आहे. इथे शक्य त्या सगळ्या रंगात, आकारात व जातीत वाढवलेले गुलाब आहेत. गुलाबबाग बघायला वर उंचावर गेलो, तिथून खालच्या दोन्ही बागा अतिशय सुरेख दिसतात. कॅमेरा हाती नसल्याचे प्रचंड दुःख होत होते
हा फोटो नेटवरून घेतलाय. गोल घुमटाकार सायरस अणुभट्टी जी आता बंद आहे. तिच्या बाजूला डावीकडे चौकोनी ध्रुव अणुभट्टी जी सध्या कार्यरत आहे. ध्रुवच्या समोर कर्दळीबाग, फोटोच्या उजव्या हाताला अर्धवट दिसतेय ती बोगनवेल बाग. षटकोणाच्या सहा बाजूपैकी प्रत्येक बाजूला दोन जातींच्या बोगणवेलींची मांडणी व मध्यभागी अजून एक वेगळ्या जातीची बोगणवेल असे एकूण रूप होते. वेळ कमी असल्याने कर्दळीबाग दुरून पाहिली.
या व्यतिरिक्त, बाजूच्या डोंगरावर नियमितपणे पावसाळ्यात वृक्षारोपण केले जाते. बीएआरसीतले आतले सगळे रस्ते दोन्ही बाजूला, जिथे जागा मिळेल तिथे मोसमी फुलझाडे लावून पूर्ण बीएआरसी रंगीबेरंगी केली आहे. शेडनेटमध्ये डच कट गुलाबांच्या व झरबेराच्या कित्येक जाती वाढवल्या आहेत. एक मोठी नर्सरी आहे जिथे बीएआरसीच्या डोंगरावर व रस्त्यावर लावण्यासाठीच्या वृक्षांची लागवड होत असते, नवीन फुलझाडे तयार होत असतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वेगवेगळे भारतीय वृक्ष दिमाखात उभे असलेले दिसतात. डोंगरालगतच्या एका रस्त्यावर डोंगरावरून सतत दगड येऊन पडत. त्यांना रोखण्यासाठी पूर्ण रस्त्यावर एका बाजूला आसोपालवची भिंत उभी केली आहे.
खालील फोटो नेटवरून
बीएआरसीची ही निसर्ग दौलत श्री. चंद्रकांत साळुंखे व त्यांच्या टीमने जोपासली आहे. स्वतःच्या ऑफिस कामातून वेळ काढून स्वतः साळुंखे सर व त्यांची टीम उत्साहाने आम्हाला झाडे, फुले, नर्सरी दाखवत होते.
इथे दर दिवशी खूप मोठया प्रमाणात फुलांचे उत्पादन होते. यातली फुले दर दिवशी पुष्पगुच्छ करण्यासाठी वापरली जातात. प्रत्येकाच्या हुद्द्याप्रमाणे त्याच्या ऑफिसात टेबलावर पुष्पगुच्छ ठेवले जातात, फुले घरी पाठवली जातात, बीएआरसीला भेटी देणाऱ्या पाहुण्यांना पुष्पगुच्छ दिले जातात. हे काम करण्यासाठी वेगळा स्टाफ आहे.
नर्सरी, बागा व शेडनेट पाहून झाल्यावर आम्ही अन्नसुरक्षा व अन्नवृद्धी क्षेत्रातील अणूऊर्जेचे काम पाहायला गेलो. त्या दालनात श्री. खाडे यांनी गॅमा किरणांचा वापर करून अन्नधान्यातील कीड, बुरशी व सूक्ष्म जंतू कसे मारले जातात हे समजावून सांगितले. अतिशय कमी क्षमतेचा गॅमा किरणांचा डोस देऊन अन्न सुरक्षित केले जाते. हा डोस अन्नाला व पर्यायावर माणसाला अजिबात अपायकारक नसतो. याच्यामुळे अन्नातले व्हिटॅमिन्स, प्रोटिन्स नष्ट होत नाही, रंग बदलत नाही. फक्त त्यातली कीड मरते. गॅमा किरणांमुळे कांदे, बटाटे इत्यादी कंदवर्गीय भाज्यांची अंकुरणक्षमता मंदावते. त्यामुळे शेल्फलाईफ वाढते. आंब्यासारखे फळ, जे भारतातून अमेरिकेत व्यापारासाठी निर्यात करायला अमेरिकन सरकारने बंदी घातलेली, त्याची निर्यात बीएआरसीच्या या इररॅडीएशन तंत्रामुळे परत सुरू झाली. आंब्याच्या कोयीतील कीड या तंत्राने नष्ट केली जाते व आंबा निर्यात केला जातो.
बीएआरसीची भारतात ठिकठिकाणी इररॅडीएशन केंद्रे आहेत जिथे उत्पादकाला आपला माल जंतूमुक्त करून घेता येतो. नव्या मुंबईत एपीएमसीला एक केंद्र आहे जिथे शेतीमाल इररॅडीएशन करून घेता येते. लासलगावाला खूप मोठे केंद्र आहे जिथे आंबा इररॅडीएट करून घेता येतो. बीएआरसी व्यतिरिक्त खासगी मालकीची इररॅडीएशन केंड्रेही भारतात आहेत. इररॅडीएशनसाठी लागणारे घटक मात्र बीएआरसी पुरवते. एक युनिट उभे करायचा खर्च दहा कोटी आहे, यातले सहा कोटी सरकारी अनुदान म्हणून मिळतात. जिथे प्रत्यक्ष हे काम चालते, तिथली संरक्षक भिंत 1.7 मीटर जाड असावी लागते. अतिशय कमी मात्रेत रॅडीएशन होत असूनही एवढी जाड भिंत उभारावी लागते त्यावरून यात असलेल्या धोक्यांची तीव्रता लक्षात येते. तरीही भारतात ठिकठिकाणी अशी केंद्रे आहेत, अणूऊर्जा निर्मिती करणारी केंद्रेही काही विघ्ने न येता चालू आहेत यावरून या सगळ्यांच्या सुरक्षिततेसाठी किती मोठ्या प्रमाणात काळजी घेतली जाते हे लक्षात येते.
भारताला आज खूप मोठया प्रमाणात विजेची गरज आहे व अणूऊर्जा हा त्याचा एक अत्यंत चांगला, पर्यावरण स्नेही पर्याय आहे. पण केवळ राजकीय फायद्यासाठी ठिकठिकाणी याला विरोध करून मुद्दाम प्रोजेक्ट्स लांबवत नेऊन खर्च वाढवण्याचे प्रयत्न केले जातात ते देशाच्या विकासमार्गात खीळ घालणारे आहेत. अणूप्रकल्प खरेच धोकादायक असतील तर मुंबईसारख्या भारतातल्या सगळ्यात महत्वाच्या शहराच्या कुशीत असलेले ट्रॉमबे व तारापूर प्रकल्प इतकी वर्षे काहीही त्रास न होता कसे काय सुरू आहेत? कोकणातील प्रकल्पाला विरोध करणारे या दोन प्रकल्पांना विसरलेत का?
अन्नसुरक्षेबरोबर बीएआरसी अन्नवृद्धीचेही काम करते. इथल्या संशोधकांनी भुईमूग, तूरडाळ, उडीदडाळ, मूग, केळी यांच्या सुधारित, जास्त उत्पन्न देणाऱ्या जाती शोधून काढल्या आहेत, ज्या शेतात वापरात आहेत.
कचऱ्याचे नियोजन व उपयोग व्हावा यासाठी बीएआरसीने तंत्रज्ञान शोधले आहे. निसर्गऋण हा त्यांचा प्रकल्प जैविक कचऱ्यातून खत निर्मिती करतो. मुंबई महानगर पालिका याचा मर्यादित उपयोग करून घेते. हे तंत्रज्ञान भारतात सर्वत्र वापरले जाणे आज गरजेचे आहे.
यानंतर आम्ही आयसोमेड या प्रकल्पाला भेट दिली जिथे औषधांवर इररॅडीएशन केले जाते. औषध उत्पादक त्यांचा माल पाठवतात जो इररॅडीएशन करून दिला जातो. इथे श्री. सिंह यांनी उत्तम माहिती दिली.
यानंतर सुपरकंप्युटर विभागाला भेट दिली. बीएआरसीच्या तंत्रज्ञांनी बनवलेला अनुपम सुपरकॉम्प्युटर पाहिला. मी भारताच्या परम सुपरकंप्युटरबद्दल ऐकले होते पण सुपर कॉम्प्युटर म्हणजे काय हे माहीत नव्हते. बीएआरसीचे श्री. सोनावणे यांनी सोप्या भाषेत सुपर कॉम्प्युटर म्हणजे काय समजावून सांगितले. अंतराळ, हवामान अंदाज, अणूऊर्जा आणि इतर बऱ्याच क्षेत्रातल्या प्रोसेसेससाठी मोठमोठे क्लीष्ट प्रोग्रॅम्स लिहिलेले असतात. आपल्या नॉर्मल कॉम्प्युटरवर हे प्रोग्रॅम रन होणे शक्य नाही. सुपरकंप्युटरवर मोठ्या प्रोग्रॅम्सचे छोटे छोटे प्रोग्रॅम्स करून हे चाईल्ड प्रोग्रॅम्स एकाचवेळी चालवून त्यांचा आउटपुट मेन प्रोग्रॅमला दिला जातो. मला समजले ते हे एवढेच. प्रत्यक्षात हे एवढेच नसून फार गुंतागुंतीचे असणार :). सुपरकंप्युटर म्हणजे मोठ्ठा स्क्रिनवाला कॉम्प्युटर असा एक समज डोक्यात होता. पण प्रत्यक्षात अनेक सर्वर, म्हणजे आपल्या भाषेत मोठ्या हार्ड डिस्कसारखे दिसणारे उपकरण, रॅकमध्ये रचून अशा अनेक रॅकचे एक मोठे कपाट असल्यासारखा हा कॉम्प्युटर दिसतो. आतले तापमान योग्य त्या मर्यादेत ठेवावे लागते.
खालील फोटो नेटवरून:
याच्या बाजूलाच एक मोठा 8x8 चा स्क्रिन होता. म्हणजे उभे 8 व आडवे 8 असे एकूण 64 तेरा इंची एलसीडी एकत्र लावले होते. त्यावर चार पाच चित्रे सीमुलेट करून दाखवत होते. एका स्क्रिनवर आपल्याला जे दिसते ते 64 पटीत मोठे होऊन दिसत होते. अशा स्क्रिनवर चित्र कसे दिसते हा प्रश्न मला कायम पडतो. मी सोनावण्यांना विचारले देखिल ते म्हणाले प्रत्येक एलसीडी मागे जो कॉम्प्युटर असतो त्याला चित्राचा केवळ तेवढाच भाग प्रोजेक्ट करायचा असतो. सर्व सिस्टीम मिळून एकत्र सिंक्रोनैज करून चित्र प्रोजेक्ट करतात व आपल्याला एक सलग चित्र पाहिल्याचा आनंद मिळतो.
सुपरकॉम्प्युटर बघून झाल्यावर यानंतर परत एकदा चहापान करून जंगल सफारीवर निघालो. पण तिथे गेल्यावर आमच्याकडे योग्य ती परवानगी नसल्याने मागे फिरावे लागले. इथे किती कडक सुरक्षा आहे याची परत एकदा जाणीव झाली. जातायेता वाटेत एक किमी लांबीची तिनमजली इमारत पण पाहिली. ही बीएआरसीची मॉड्युलर लॅब, जिला तिथे मॉडलॅब म्हणतात. या इमारतीत सर्व प्रकारचे संशोधन करण्यासाठीच्या लॅबोरेटरीज आहेत. आमचे दुपारचे जेवण आम्ही इथल्याच कॅन्टीनमध्ये घेतले. आमच्यासोबत काही लोक असे होते ज्यांची मुले किंवा पती इथे कामाला होते. पण कुटुंबियांना आत प्रवेश नसल्याने त्यांना बीएआरसी कॅम्पसमध्ये राहूनही कधी आत जाता आले नाही. मध्यमुंबई मराठी विज्ञान संघामुळे मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन हे कुटुंबीय आत आले होते. दुपारी जेवायच्या वेळेस मुले, पती वगैरे मंडळी त्यांना भेटायला आली. आम्हीही त्यांच्याबरोबर गप्पा मारून घेतल्या :)… विषय अर्थात तुम्हाला अणुभट्टीच्या इतक्या जवळ कितपत सुरक्षित वाटते हाच होता. बहुतेकानी कसलाही त्रास नाही असेच सांगितले.
खालील फोटो नेटवरून, आम्ही तिथे होतो तेव्हा दुपारचे जेवण करून तिथले काही जण इथे आराम करत होते.
जिथे आम्ही जेवण घेतले त्याच आवारात पिंपळ, वड वगैरे महावृक्ष उभे होते, सोबत एक तीन मजल्याहुनही उंच, तितकाच रुंद असा डेरेदार हिरवागार पोपटी वृक्ष दिसला. आजूबाजूच्या पाने गाळणाऱ्या वड पिंपळाच्या पार्श्वभूमीवर हा भरगच्च वृक्ष बघून माझे डोळे दिपले एकदम... साळुंखेसरांनी त्याची ओळख नांद्रुक म्हणून करून दिल्यावर नवा वृक्ष पाहिल्याचा आनंद झाला. तिथेच एक प्रचंड मोठा कृष्णवड होता. राणीबागेतला कृष्णवड कसाबसा आधार देऊन उभा ठेवलाय, त्या पार्श्वभूमीवर हा इतका मोठा डेरेदार कृष्णवड बघून खूप बरे वाटले. नंतर जिथे दुपारचे चहापान केले त्याइथला पूर्ण रस्ता फणशीच्या झाडांनी भरलेला पाहिला. हा वृक्षही मी प्रथमच पाहात होते. प्रथमदर्शनी त्याची फुले पाहून तो करंज वाटला पण गेल्या वर्षीच्या काही शेंगा अजूनही झाडाला चिकटून होत्या व त्या अज्जबात करंजासारख्या नव्हत्या. मी सोबत महाजनसरांचे देशी वृक्ष हे पुस्तक नेले होते. साळुंखे सर तेव्हा सोबत नसल्याने मला पुस्तकाने मदत केली. बऱ्याच रस्त्यांवर बुद्धाज कोकोनट लावले होते. हे झाडही खूप उंच वाढते. राणी बागेत बघितलंय. आम्ही नर्सरी बघायला गेलो होतो तिथे ऑस्ट्रेलियन चेस्टनटचे सहा सात मजली उंच असेल इतके प्रचंड मोठे झाड बघितले. पूर्ण फुलले होते. हेही राणीबागेत आहे.
नर्सरीत डच रोजेस व झरबेरा फुलले होते हे वर लिहिले आहेच. त्यासोबत इतर अनेक झाडे तिथे होती. मोसमी फुलांची शेती होती. पागलपत्ता हे झाड व नाव मी तिथे पहिल्यांदा पाहिले व ऐकले. ह्या झाडाचे प्रत्येक पान वेगळे दिसते. कुठलीही दोन पाने एकसारखी नाहीत. तिथे मी बिक्साही पहिल्यांदा पाहिला. बीएआरसीमध्ये फक्त झाडे पाहायला यायलाच हवे असे राहून राहून मनात येत होते. साळुंखेसरांनी मनावर घेतले तर ही इच्छाही प्रत्यक्षात उतरेल.
अजून बरेच काही पाहायचे होते. मुख्य आकर्षण अणुभट्टी मेन्टेनन्ससाठी बंद असल्याने पाहता आली नाही. सायरस ही भारतातली सगळ्यात पहिली अणुभट्टी आता बंद आहे. त्याच्या बाजूलाच ध्रुव ही अणुभट्टी आहे जिथे बीएआरसीसाठी अणूऊर्जेचे उत्पादन होते. इथली वीज बाहेर वापरासाठी नसून हे केंद्र अणुसंशोधनाचे काम करते. तारापूरला वीजनिर्मिती होते.
अणुभट्टी आतून पाहता आली नाही याची हुरहूर मनात बाळगत, परत बीएआरसी भेटीला यायचे असा आशावाद बाळगत परतीच्या रस्त्याला लागलो.
टिप्पण्या