मलेशिया भेट - 2 : स्ट्रॉबेरी लेइजर फार्म

गेंटिंग हायलँड फिरून तंगड्या बऱ्यापैकी मोडल्यावर आम्ही स्ट्रॉबेरी लेइजर फार्मकडे मोहरा वळवला.





फार्म अतिशय सुंदर होते.   '८ रिंगेला १०० ग्राम स्ट्रॉबेरी, तीही स्वतःच्या हाताने तोडून'   हि भानगडच एकदम चित्ताकर्षक होती. (मलेशियात पाय टाकताच मी १ रिंगे म्हणजे १७ रुपये हा हिशोब डोक्यातून काढून टाकला.  त्यामुळे ८ रिंगेला १०० ग्राम वस्तूची तुलना मी आपल्याकडे ८ रुपयाला काय मिळते ह्याच्याशी करून वस्तू स्वस्त कि महाग हे ठरवायचे.  अर्थात शास्त्रीय दृष्ट्र्या हे बरोबर नाहीये, पण मला सोयीचे पडले. )  पण शहाणपण दाखवून आणि उगीच सगळ्यांनी एकदम खड्ड्यात पडायला नको म्हणून फक्त माधवीनेच स्ट्रॉबेरी तोडायचे ठरले. त्याप्रमाणे एक बास्केट आणि कैची घेऊन आम्ही फार्म मध्ये पाऊल टाकले.  फार्ममध्ये फारशी गर्दी नव्हती. लोक स्ट्रॉबेरी तोडून बास्केटातच टाकताहेत, स्वतःच्या तोंडात टाकत नाहीयेत हे पाहायला जागोजागी कॅमेरे तर लावलेले होतेच पण बांगलादेशी दिसणारा एका बाबा पण तिथे उभा होता.

आमच्या मलेशिया प्रवासात सोबत ऋषी असल्याचा आम्हाला खूप फायदा झाला.  तो स्वतः आसामात स्थायिक झालेला बंगाली, वयाच्या १६ वर्षांपासून  शिक्षणानिमित्त बाहेर आणि त्यानंतर मुंबईत वास्तव्य. मार्केटिंगमधल्या जॉबमुळे पूर्ण भारत उभाआडवा फिरलेला.  त्यामुळे त्याला जवळजवळ प्रत्येक प्रमुख भाषेत "काय कसे काय? बरे ना?  तू कुठल्या गावाचा?"  ह्या अर्थाची दोन चार वाक्ये सहजगत्या बोलता येतात. आम्ही भेट दिलेल्या बहुतेक हॉटेलमधले  वेटर बांगलादेशी  निघाले.  याने बांगलामध्ये एक वाक्य टाकले कि त्यांचे चेहरे अगदी फुलून यायचे.  एका नेपाळ्यालाही नेपाळीत एक वाक्य टाकून तिथे याने रडवले.  परदेशी मुलखात एकटे राहत असताना अचानक मातृभाषा कानावर पडण्यासारखे सुख दुसरे कुठले नसावे!!!!

तर ऋषीने बांगलामध्ये एक वाक्य टाकून त्या बांगलादेशी बाबाशी बोलणे सुरु केल्यानंतर त्याने आमच्याकडे थोडे दुर्लक्ष केले.   मीसुद्धा मग  दोन तीन स्ट्रॉबेरी तोडल्या, त्यातली एक खाऊन पाहिली. अरे देवा!!! इतकी चित्ताकर्षक दिसणारी स्ट्रॉबेरी चवीला मात्र एकदम  यक्क!!!!.  गोडवा अजिबात नाही, अगदीच  पाणचट.   मी मग अजून स्ट्रॉबेरी तोडायच्या भानगडीत पडलेच नाही.  फोटोग्राफी मात्र चालू ठेवली.

















ज्याप्रकारे या फार्ममध्ये लागवड केलेली ते बघून मला थोडे आश्चर्य वाटले.  आपल्याकडे इतरत्र कशी लागवड करतात माहित नाही पण महाबळेश्वरला खुल्या शेतात प्लास्टिक घालून त्यावर लागवड केलेली  मी पाहिलीय. ह्या फार्ममध्ये बंदिस्त जागेत रॅक उभारून जशी लागवड केली तशी आपल्याकडेही करता येईल. वरच्या प्लास्टिकमध्ये माती किंवा कोकोपीट असणार असा माझा अंदाज आहे.  आपल्याला माती वापरून लागवड नक्कीच करता येईल. शिवाय अशी लागवड केली तर पर्यटकांसाठी स्ट्रॉबेरी पिकिंगची सोय करणे सोपे जाईल, त्यातूनही पैसे मिळवता येतील.  जमिनीवर लागवड झालेली स्ट्रॉबेरी पर्यटक पिकिंग करायला लागले तर अर्धी फळे ते पायाखाली तुडवतील. इथे रॅकवर स्ट्रॉबेरी असल्याने आपण मॉल मध्ये फिरून हवा तो माल उचलतो तश्या प्रकारे स्ट्रॉबेरी तोडता येत होती.

















स्ट्रॉबेरी बागेच्या सुरवातीला हि एक वेल होती.,  खूप सुरेख फुले आलेली.  आधी मला वाटले कि खोटी वेल सोडलीय छतावरून.  पण जवळून पाहिल्यावर लक्षात आले कि खरीखुरी वेल  आहे.   थोडी शोधाशोध केल्यावर नाव कळले.  जेड वाईन  म्हणतात हिला. मूळ फिलिपाइन्स मधली आहे.  मलेशियाला कशी पोचली माहीत नाही पण अतिशय सुरेख दिसत होती. शास्त्रीय नाव :  Strongylodon macrobotrys.













तिथेच हे पपईचे झाड दिसले. चक्क कचऱ्यात उगवल्यासारखे उगवले होते.   पपईला सहसा फांद्या फुटत नाहीत.  याला फांद्या तर फुटल्या होत्याच, त्या फांद्यांनाही पपया लागल्या होत्या.  तिथली जमीन अतिशय सुपीक असणार, आणि हवा पपईसाठी उत्तम.   पपईच्या मागे स्ट्रॉबेरीची शेड दिसतेय. 









मग फोटो काढून झाल्यावर आम्ही परत बाहेर आलो,  आम्हीच तोडलेली ती बेचव स्ट्रॉबेरी आमचेच पैसे देऊन विकत घेतली.  तिथे स्ट्रॉबेरीचे जॅम, कॅंडी वगैरे भरपूर आयटेम होते पण मूळ स्ट्रॉबेरीच इतकी बेचव निघाल्यावर तिथे काही घ्यायची इच्छा झाली नाही.

तिथेच  बाजूला हनीबी  फार्म होते.  तिथेही मधाचे काही पदार्थ उपलब्ध होते आणि एकजण मधमाशांचा डब्बा घेऊन बसलेला.  आपल्याकडे आहेत तशा लहान मधमाशा होत्या त्या डब्यात.  एकूण मला तिथे काही खास आवडले नाही.  मशरूम फार्मचा फक्त बोर्ड दिसला.  आत काही होते असे वाटले नाही. कदाचित सीजन प्रमाणे  ह्या गोष्टी उपलब्ध असतील.

तिथेच लव्हेंडर फार्म आहे हे आम्हाला माहीत नव्हते.  स्ट्रॉबेरी फार्मच्या बाहेर आल्यावर तोच  रस्ता एका बागेकडे घेऊन गेला. सहज म्हणून त्या बागेत गेलो  आणि थक्क होऊन पाहात राहिलो. 









टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लघु अजान वृक्ष - Ehretia Laevis

गारंबीची बी

फाईकस लाइरटा Ficus lyrata

बालपणीचा काळ सुखाचा.........

अडुळसा Justicia Adhatoda

मग मी मूर्ख कसा?