व्यसन, छंद, टाईमपास.....
इंटरनेट ऑफिसात उपलब्ध झाल्यापासून मला त्याचा छंद जडला. ऑफिसात फुकट मिळायला लागण्याआधीपासून माझ्या घरी व्हिएसेनेलची इंटरनेट सेवा होती. पण इंटरनेटची गंमत मला माहित नव्हती. त्याचा वापर फक्त इमेल पाठवण्याकरता होत असे. कधीतरी इंटरनेट एक्सप्लोरर उघडून बघायचे पण बातम्या वाचण्यापलीकडे कधी मजल गेली नाही. काय बघायचे हेच माहीत नव्हते तर ...
ऑफिसात लिखित मेमोजचा जमाना संपला आणि इंट्रानेट सुरु झाले. इंट्रानेट सोबत इंटरनेट कधी आले ते लक्षात नाही पण बहुतेक दोन्ही एकदमच सुरु झाले असावे. तेव्हा व्हॉट्सअप नव्हते त्यामुळे मित्रमंडळ इमेलवरून संदेशवहन करायचे. तो जमाना हॉटमेल, याहू वगैरेचा होता. याहू ग्रुप्स फेमस व्हायला सुरुवात झालेली. निडोकिडोज हा एक अतिशय फेमस याहू ग्रुप होता. बहुतेक सगळे फोर्वर्ड्स ह्या ग्रुपवर जन्माला यायचे. माझ्या जुन्या पुराण्या बॅकअप वर यांच्या ढिगाने मेल्स सापडतील. तर माझी इंटरनेट सुरवात अशी आधी मेल्स मग याहू ग्रुप्स पासून झाली. फोर्वर्ड्सवर क्लिक करता करता इंटरनेट हा एक मोठा खजिना आहे हे लक्षात येऊ लागले. मला वाटते मी नेट माहितीसाठी म्हणून 2005-2006 पासून वापरायला लागले. एक मित्र होता तो कसलेही फोर्वर्ड्स पाठवायचा. एकदा त्याने संदीप खरेची 'एवढेच ना ...' हि कविता अर्धवट पाठवली. त्या ओळी मी नेटवर शोधत असताना मला मायबोलीचा शोध लागला. शोध लागला तरी मी व्यसनी झाले नव्हते. त्याच सुमारास मनोगत सुद्धा नुकतेच सुरु झालेले. सुरवातीला मी मनोगतावर असायचे, मायबोलीकडे थोडे दुर्लक्ष होते. इंटरनेट वर जे शोधू ते सापडते हे लक्षात आल्यावर मी मला जे काही जुने आठवत होते ते नेटवर शोधायचा सपाटा लावला. यात प्रामुख्याने इंग्रजी गाणी होती. एकदा लास्ट ख्रिसमस गाणे शोधत असताना त्याचा एक व्हिडिओ पण दिसला. मी नेटवर पाहिलेला पहिला विडिओ हाच! लास्ट ख्रिसमस. तेव्हा मला युट्युब हे नाव माहीत नव्हते. पण व्हिडिओस असे इंटरनेटवर दिसू शकतात याचे मला तेव्हा खूप आश्चर्य वाटलेले हे आजही आठवतेय. यू ट्युबचा तेव्हाचा अवतार अगदी बाळबोध होता. आताची पिढी ओळ्खणारही नाही.
हळूहळू करता केव्हा मी या आंतरजालाच्या जाळ्यात गुरफटले मलाही कळले नाही. याचे फायदे अनंत आहेत, तोटेही तितकेच.
सध्या नेट शक्य तितके कमी वापरायचे प्रयत्न सुरु आहेत.
नेटवरून लक्ष कमी करून ते ब्लॉगवर द्यायचे ठरवलंय. बघूया कसे जमते ते.
हळूहळू करता केव्हा मी या आंतरजालाच्या जाळ्यात गुरफटले मलाही कळले नाही. याचे फायदे अनंत आहेत, तोटेही तितकेच.
सध्या नेट शक्य तितके कमी वापरायचे प्रयत्न सुरु आहेत.
नेटवरून लक्ष कमी करून ते ब्लॉगवर द्यायचे ठरवलंय. बघूया कसे जमते ते.
टिप्पण्या