परोपकारी - The Mixer by P G Wodehouse
पीजी वुडहाऊस यांच्या The man with two left feet मधल्या The Mixer चा हा मला जमला तसा अनुवाद.
*****************************************
आज मागे वळुन पाहताना लक्षात येतेय की बुज-या माणसाने ज्या दिवशी पैसे देऊन मला विकत घेतले त्या दिवसापासुन कुत्रा म्हणुन माझी कारकिर्द सुरू झाली. त्या दिवशी माझे बालपण संपले. माझी पैशांमध्ये किंमत होऊ शकते या विचाराने मला नव्या जबाबदा-यांची जाणिव झाली. मी गंभीर झालो. शिवाय पैशांची अदलाबदल झाल्यावरच मला बाहेरच्या जगाचे दर्शन घडले. आता दारुच्या गुत्त्यातले आयुष्य कितीही सनसनाटी असले तरी बाहेरच्या जगात गेल्यावरच तुम्हाला व्यापक दृष्टीकोन प्राप्त होतो आणि कौन कितने पानीमे ते कळते.
तसे माझे तोपर्यंतचे आयुष्य ब-यापैकी आखिव रेखीव होते. इस्ट एन्डमधल्या एका दारुगुत्त्याच्या यार्डात माझा जन्म झालेला. असल्या जागी आपण चांगुलपणाच्या फारशा अपेक्षा ठेऊ शकत नसलो तरी तिथे धामधुम मात्र भरपुर होती. मी सहा आठवड्यांचाही नव्हतो तेव्हा ‘संशयास्पद हालचाल आढळली’ या सबबीवर मागच्या दारातुन आत आलेल्या तिघा पोलिसांच्या पायात लुडबुडून त्यांना पळता भूई थोडी केलेली. आणि भटारखान्यावर यशस्वी डल्ला मारुन पळताना माझा चक्क सतरा वेळा हातात झाडू घेऊन पाठलागही झालेला!
या असल्या गोष्टींमुळे माझा वेळ जरी चांगला जात असला तरी माझी मुळची चळवळी वृत्ती मला गप्प बसु देत नसे. सतत काहीतरी करायला माझे हात शिवशिवायचे. एका जागी स्वस्थ बसणे माझ्या स्वभावातच नव्हते. माझ्या रक्तात एकतर भटकण्याचा गुण आहे – माझे एक दुरचे काका सर्कशीत होते – किंवा कलाकाराची तळमळ तरी – माझे एक दुरचे आजोबा स्टेजवर ‘प्रो. पाँडचे करामती कुत्रे’ म्हणुन प्रसिद्ध होते.
पण अगदी खरे सांगायचे तर माझ्या रंगीबेरंगी आणि अनुभवसंपन्न आयुष्याचे श्रेय ह्या चळवळ्या वृत्तीलाच द्यायला हवे. नाहीतर अगदी चांगलीचुंगली घरे सोडुन मी उगीचच कोणाच्याही मागे 'हा काहीतरी इंटरेस्टिंग गोष्टीच्या वासावर आहे वाटते' असा विचार करत गेलो नसतो. माझ्यात मांजरीचेही रक्त आहे की काय?
एका एप्रिल महिन्याच्या टळटळीत दुपारी मी आणि आई फ्रेडने, अहो तोच तो, आमच्याबरोबर गुत्त्यात काम करणारा फ्रेड, तर त्याने दिलेल्या स्वेटरवर शांतपणे झोपलो असताना बुजरा माणुस आमच्या यार्डात आला. आईला गुरगुरताना मी ऐकले, पण दुर्लक्ष केले. आई एक खुप चांगली राखणी कुत्री आहे आणि मालक सोडून बाकी कोणीही यार्डात आले की ती गुरगुरते. आधी ती अशी गुरगुरली की मी लगेच उठुन जीव तोडुन भुंकायचो. पण नंतर मी ते सोडून दिले. प्रत्येकावर भुंकत बसायला मला काय तेच काम नाहीय. आणि तसेही गुत्त्याच्या मागच्या बाजुला खुप भंगार पडलेले असते आणि त्यामुळे तिथे सतत लोकांची येजाही असते. कोणाकोणावर भुंकणार?
शिवाय मी त्या दिवशी खुप थकलो होतो हेही एक कारण होते. त्या दिवशी सकाळपासुन मला खुप काम पडलेले. बीअरचे क्रेट्स आणणा-यांबरोबर आतबाहेर करा, गुत्त्यात बसलेल्या फ्रेडबरोबर थोड्या गप्पा मारा आणि इतर असेच थोडेफार…. त्यामुळे मी परत झोपी जाणार तेवढ्यात माझ्या कानावर आले, ‘हम्म, दिसायला ब-यापैकी कुरूप आहे!’ आता हे मात्र खास माझ्याबद्दल होते एवढे नक्की.
मी काही फार आकर्षक, उमदा वगैरे दिसणारा कुत्रा नाहीय हे मला आधीपासुनच माहित होते आणि कोणीही हे सत्य उगीच माझ्यापासुन लपवलेही नाही. माझ्या आईलाही मी कधी सुंदर वाटलो नाही. आता तीही काही खुप सुंदर अशी कुत्री नाहीय, पण तिने मला रुपावरुन नेहमीच नावे ठेवली. खरेतर नावे न ठेवणारा अजुन कोणी मला भेटलेलाच नाहीय. अगदी अनोळखी लोकसुद्धा मला पाहुन ‘काय बेक्कार दिसतो हा कुत्रा’ हेच पहिले उद्गार काढतात.
मी नक्की कसा दिसतो मला ठाऊक नाही. माझे तोंड बुलडॉगसारखे आहे पण बाकीचे शरीर टेरिअरसारखे. माझी लांबसडक शेपुट कायम उभी राहिलेली असते, केस कुरळे आहेत, डोळे पिंगट आहेत आणि रंग जरी काळा कुळकुळीत असला तरी छातीवर पांढरा चांद आहे. मी गॉर्गाँझोला चिजहाऊंड सारखा दिसतो असे फ्रेडचे मत आहे आणि फ्रेड खरेच खुप हुशार आहे. त्याला सगळ्याची माहिती आहे.
तर माझी चर्चा चाललीय म्हटल्यावर मी डोळे उघडून पाहिले. माझ्याकडे पाहात मालक उभा होता आणि त्याच्या बाजुला 'मी पुरेसा कुरूप आहे' हे उद्गार काढणारा माणुस उभा होता. तो बारीक होता, वयाने गुत्त्यातला नोकराएवढा आणि पोलिसापेक्षा लहान. त्याने करडे बूट आणि काळी पँट घातलेली.
‘पण स्वभावाने खुप चांगला आहे’ मालक म्हणाला.
हे सुदैवाने खरे होते. आई नेहमी म्हणायची, 'दिवस ढकलण्यासाठी समर्थाघरचा हात आपल्या डोक्यावर जर नसेल, तर कुत्र्याला एकतर चांगले रुप तरी पाहिजे किंवा तो निष्ठावंत तरी असायला हवा.’ पण मी जरा जास्तच निष्ठा दाखवायचो असे तिला वाटायचे. ‘भेटेल त्याच्या गळ्यात न पडताही कुत्रा निष्ठावंत राहु शकतो. तु जरा जास्तच करतोस कधीकधी’ असे ती नेहमी म्हणायची.
तसा मी माणसांमध्ये अगदी चटकन मिसळतो. हवेतर माझ्यातला तो दोषच आहे समजा ना! पण माझा स्वभावच तसा आहे. मला माणसे आवडतात. मला त्यांच्या बुटांचा स्वाद आवडतो, पायांचा वास आवडतो इतकेच काय त्यांचा बोलण्याचा आवाजही आवडतो. आता हा माझा कमकुवतपणा असेलही, पण कोणी माझ्याशी एक शब्द जरी बोलला तरी एक गोड शिरशिरी माझ्या कण्यातुन थेट शेपटीपर्यंत धावत जाते आणि माझी शेपुट आपसुकच हलायला लागते!
आताही मी शेपुट हलवायला लागलो. माणसाने मात्र माझ्याकडे थोडे दुर्लक्षच केले. मला थोपटलेही नाही. मला तेव्हा वाटले – जे नंतर खरेच निघाले – की तो थोडा बुजरा असणार. त्याला थोडे बरे वाटावे म्हणुन मी त्याच्या अवतीभवती उड्या मारु लागलो. आई परत गुरगुरली. तिला आवडले नसणार.
‘बघा, त्याला तुम्ही आवडलेले दिसताय.’ मालक म्हणाला.
माणुस एक शब्दही बोलला नाही. तो कसल्यातरी विचारात होता वाटते. तो अगदीच शांतप्रकृती प्राणी होता. त्याला बघुन मला ज्योची आठवण झाली. कोप-यावरच्या दुकानातला हा म्हातारा कुत्रा दिवसभर जमिनीवर पडुन येणा-या जाणा-यांना बघत राही, पण कधीही काहीही बोलत नसे.
मालकाने परत बोलायला सुरवात केली. त्याने माझी जी तारिफ चालवलेली ती ऐकुन मी तर चक्रावलोच. शप्पथ सांगतो त्याला माझे एवढे कौतुक असेल असे मला कधीच वाटले नव्हते. त्याचे बोलणे ऐकुन मी भरपुर बक्षिसे मिळवणारा कुत्रा आहे असेच कोणालाही वाटले असते. पण माणसावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. तो तोंडातुन शब्दही काढत नव्हता.
मी लाजेने मरुन जाईपर्यंत माझी स्तुती करुन झाल्यावर मालक बोलायचा थांबला आणि माणसाने तोंड उघडले.
‘बस्स झाले,’ तो म्हणाला, 'मी याच्यासाठी अर्धा क्राऊन देईन आणि हा अगदी स्वर्गातुन जरी अवतरलेला असला तरी यापेक्षा एकही छदाम मी देणार नाही. बोला, आहे कबुल?’
काय चाललेय ते माझ्या लक्षात आले नी माझ्या अंगातुन परत एकदा शिरशिरी लहरत गेली. माणुस मला विकत घेऊन जायला आला होता. मी आता मालकाकडे आशेने बघायला लागलो.
‘माझ्या मुलासारखा समजतो मी याला.’ मालक उगीचच जराश्या भिजल्या स्वरात म्हणाला.
‘तोंडावळा तुमच्यावरच गेलाय.’ माणुस कायच्या काय बडबडला.’ तुम्हाला मुलगा असता तर असाच दिसला असता. मी अर्धा क्राऊन देईन आणि माझ्याकडे जास्त वेळ नाहीय.’
‘ठिक आहे,’ मालकाने उसासा टाकला,’ त्याला अगदी फुकटातच दिल्यासारखे आहे हे. द्या पैसे.’
माणसाने एक दोरी काढली आणि माझ्या गळ्याभोवती गुंडाळली.
आई जोरजोरात ओरडुन मला सुचना देत होती आणि घराण्याचे नाव रोशन करण्याबद्दल सांगत होती, पण मला आता काहीही ऐकायला येत नव्हते.
‘गुडबाय आई, गुडबाय मालक, गुडबाय फ्रेड, सगळ्यांना माझा शेवटचा टाटा. मी आता इथुन बाहेर दुनिया बघायला चाललो. बुज-या माणसाने मला अर्ध्या क्राऊनला विकत घेतलेय. इतके छान वाटतेय.’
माणसाने मला लाथ घालुन गप्प बसायला सांगेपर्यंत मी गोलगोल फिरत ओरडत होतो. त्याने सांगितल्यावर मी गप्प बसलो.
आम्ही कुठे चाललेलो माहित नाही पण आम्ही खुप चाललो. मी कधीच आमची गल्ली सोडुन बाहेर पडलो नव्हतो त्यामुळे बाहेरचे जग एवढे मोठे असेल याची मला कल्पना नव्हती. आम्ही चाल चाल चालत होतो आणि मी जरा कुठे रेंगाळलो की माणुस लगेच माझी दोरी ओढुन मला खेचत होता. रस्त्यावर फिरणा-या एकाही कुत्र्याची मला साधी विचारपुसही करता आली नाही.
असेच मैलोनमैल चालत चालत आम्ही शेवटी एका अंधा-या घराच्या दारात आलो. आत शिरणार तोच कुठून कसा देव जाणे पण एक पोलिस तिथे उपटला. त्याला पाहताच माणसाने ज्या चपळाईने घरात घुसायचा प्रयत्न केला त्यावरुन पोलिसाचे तिथे येणे त्याला फारसे आवडले नाही हे माझ्या लक्षात आले. हळुहळू तो किती संकोची आणि बुजरा आहे ते माझ्या लक्षात येत होते.
‘नमस्कार…..’ पोलिस म्हणाला आणि आम्हाला नाईलाजाने थांबावे लागले.
‘तुझ्यासाठी एक निरोप आहे मित्रा.’ पोलिस म्हणाला, 'थेट आरोग्य खात्याकडुन. तुला हवापालटाची गरज आहे, कळलं का?’
‘ठिक!’
‘शक्य तितक्या लवकर हवापालट कर, नाहीतर तुझ्या हवापालटाचा आम्हाला बंदोबस्त करावा लागेल, काय?’
मी माणसाकडे अतीव आदराने पाहिले. पोलिसांनाही त्याच्या तब्येतीची इतकी काळजी? हा नक्कीच कोणीतरी मोठा माणुस असणार.
‘रात्रीच गावाला निघतोय.’ माणुस म्हणाला.
‘गावाचे नशीब भारी दिसतेय! जा तर, लौकर फुट.’
आम्ही दरवाजातुन आत गेलो आणि हजारो पाय-या चढुन एका अंधा-या खोलीत गेलो. उंदरांचा भयानक वास सुटलेला. माणुस आत जाऊन बसला आणि तोंडातल्या तोंडात कोणालातरी शिव्या देऊ लागला. मी त्याच्याकडे बघत बसलो.
पण जास्त वेळ गप्प बसणे माझ्या स्वभावातच नाहीय ना…
मी परत तोंड उघडले, ‘आता इथेच राहायचे?? आपण खरेच बाहेरगावी जाणारोत का? तो पोलिस खुप चांगला होता ना? तुला पोलिस आवडत नाय काय? गुत्त्यात माझी खुप पोलिसांशी ओळख होती. आज जेवायला काय हाय? त्या कपाटात काय हाय मी बघु? तु मला परत खाली घेऊन जाणार काय? मी बाहेर जाऊन कोणी मांजर भेटते का बघुन येऊ?’
‘बोंबाबोंब एकदम बंद’ माणुस ओरडला.
‘गावी गेल्यावर आपण कुठे राहणार? त्या घराला केअरटेकर असणारेय? फ्रेडचे बाबा केंटमधल्या एका मोठ्या घराचे केअरटेकर हायेत. फ्रेड नेहमी सांगतो त्यांच्याबद्दल. तु फ्रेडला भेटला नाय्येस. तो खुप चांगला आहे. मला, आईला सगळ्यांना तो खुप आवडतो.’
मी फ्रेडबद्दल अजुन सांगणार होतो, फ्रेड माझा तसा खास मित्र आहे. पण तेवढ्यात माणसाने एक काठी काढली नी मला झोडपायला सुरवात केली.
‘गप्प बस बोल्लं की गप्प बसायचं’ तो परत ओरडला.
हा माणुस म्हणजे बुजरेपणाची हद्दच होती अगदी. त्याच्याशी नुसते बोललो तरी त्याला त्रास होत होता. पण शेवटी तो बॉस. म्हणुन मी गप्प बसलो.
पोलिसाला सांगितल्याप्रमाणे आम्ही त्या रात्री खरेच बाहेरगावी गेलो. मला इतका आनंद होत होता की काय सांगु… फ्रेड गावाबद्दल इतके बोलायचा की मलाही गाव एकदा पाहावा असे वाटायचे. वडलांना भेटण्यासाठी फ्रेड अधुन मधुन मोटरसायकलने केंटला जायचा. एकदा माझ्यासाठी एक खार घेऊन आलेला. मला वाटले मला खाण्यासाठीच घेऊन आलाय की काय! पण आई लगेच म्हणाली, 'कुत्र्याने एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, जगातली प्रत्येक वस्तु काय त्याच्या खाण्यासाठी बनली नाहीय.'
आम्ही पोचेतो खुप अंधार पडला. पण माणसाला रस्ता माहित होता बहुतेक. माझ्या गळ्यातल्या दोरीला एक हिसका देऊन त्याने एक निर्मनुष्य रस्ता पकडला नी आम्ही परत चालु लागलो. कितीतरी वेळ आम्ही चालतच होतो. पण एकुणच मी इतका उत्साहित झालो होतो की मला अजिबात थकवा जाणवत नव्हता. प्रत्येक पावलाबरोबर आपले जग विस्तारतेय ही भावना प्रबळ होत होती.
चालताना मधुन मधुन मोठ्ठी घरे लागत होती. ती बंद आहेत असे बाहेरुन वाटत होते. पण फ्रेडच्या बाबांमुळे मला माहित होते की या अशा मोठ्ठ्या घरांमध्ये आत कुठेतरी एक केअरटेकर राहात असतो. ही घरे खुप श्रीमंत माणसांची असतात नी ते या घरांमध्ये फक्त सुट्ट्यांमध्येच राहायला येतात. बाकीचा वेळ केअरटेकर राहतो नी त्याच्याकडे राखणीसाठी मोठ्ठा कुत्राही असतो. माझीही निवड अशीच राखणकुत्रा म्हणुन झालीय का हा विचारही माझ्या मनात एकदा येऊन गेला.
‘तु पण केअरटेकर आहेस काय?’ मी माणसाला विचारले.
‘गप्प बस.’ तो खेकसला. म्हणुन मग मी गप्प बसलो.
बराच वेळ चालल्यावर आम्ही एका लहानशा घराजवळ पोचलो. आमची चाहुल लागताच एकजण बाहेर आला. माणुस त्याला बहुतेक ओळखत होता कारण त्याने लगेच बिल म्हणुन हाक मारली. आणि सगळ्यात मोठी आश्चर्याची गोष्ट म्हणजे माणुस बिलबरोबर अगदी चांगला बोलायला लागला. बुजरेपणा कुठे गेला कुणास ठाऊक? ते दोघे एकमेकांना चांगलेच ओळखत होते बहुतेक.
‘ह्योच का त्यो बाबा?’ बिल माझ्याकडे पाहात म्हणाला.
‘दोपारला घेतला याला.’ माणुस म्हणाला.
‘हम्म.. दिसाला लईच भारी. अगदी फायजे तसंच कुत्रं हाय हे.. पर काय कामाचं राव? उगा नस्ती बिलामत कशापाई घ्याची म्या म्हंतो? एकडाव म्या म्हंतो तसं करुन का बगु ने? कुत्र्याला गप कराचं नी गुमान आपलं काम कराचं.’
‘तसं नाय करता येत बाबा,’ माणुस म्हणाला,’ कुत्रा रातीचा घरातच आस्तो. मंग त्याला गप कराचं तर ते दिसाचं करावं लागतं. आन मग होतं काय? सांजपावेतो एकतं नवं कुत्रं तरी येऊन लागतं, नायतं ते बेणं रातभर बंदुक घेऊन जागत तरी बसतं. तेबी साधे लोक नायहेत बा. रखवालीचे मोजुन घेतात पैकं. कामात खोटी करुन चालत नै….
माणसाला एवढे मोठ्ठे भाषण देताना मी पहिल्यांदाच ऐकले. बिललाही बहुतेक पटले. तो गप विचार करु लागला.
‘तेबी खरंच म्हना.. आता याला तैयार करुया नीट.’ तो म्हणाला.
मी जगाचा अनुभव घ्यायची गोष्ट करू लागलो की आई नेहमी म्हणायची, 'उगाच पश्चाताप होईल. डोंगर दुरुनच साजरे दिसतात.' आणि आईचे हे म्हणणे अगदी बरोबर होते याचा प्रत्यय मला लगेचच यायला लागला.
खरेतर सगळ्यात मोठा त्रास माणसाचा बुजरेपणा हाच होता. त्याची दखल घेतलेलीही त्याला आवडत नसे.
पहिल्या दिवसापासुनच याची सुरवात झाली. दिवसभरच्या घडामोडींनी दमुन सैपाकघरात गाढ झोपलो असताना अचानक कसल्यातरी आवाजाने मी दचकुन जागा झालो. कोणतरी खिडकीबाहेर काहीतरी खटपट करत होतं. बहुतेक आत यायचा प्रयत्न चाललेला.
आता मला सांगा, माझ्या जागी तुम्ही असता तर काय केले असते? मला समजायला लागायच्या आधीपासुनच आईने अशा वेळी काय करायचे ते शिकवायला सुरवात केली होती. ती आमची बाराखडीच आहे असे समजा ना. ‘तु एखाद्या खोलीत आहेस आणि कोणी आत यायचा प्रयत्न केला तर आधी भुंकायला लागायचे. भले त्या माणसाला खोलीत काही काम असेलही, पण आधी भुंकायचे नी मग विचारायचे. कुत्रे घरात शोभेसाठी ठेवलेले नसतात हे कायम लक्षात ठेवायचे.
मी मान वर केली आणि जोरात भुंकायला सुरवात केली. माझा आवाज घराण्याच्या नावाला साजेसा असा मोठ्ठा होता. पौर्णिमेच्या रात्री पुर्णचंद्र आकाशात वरती आला की मी असा मस्त आवाज लावायचो की पुर्ण गल्लीतले लोक खिडक्या उघडून माझ्या नावाने ओरडायचे.
‘माणसा, धाव. बिल, धाव. धावा लौकर. खिडकीतुन चोर शिरतोय.’
तेवढ्यात कोणीतरी दिवे लावले आणि मला माणुस दिसला. खिडकीतुन तोच आला होता.
एक काठी उचलुन त्याने मला झोडपायला सुरवात केली. मला काही समजेचना. मी काय चुक केली तेही कळेना. पण तो मालक होता, त्यामुळे मी गप्प बसलो.
तुमचा विश्वास बसणार नाही पण त्यानंतरच्या प्रत्येक रात्री हेच घडत गेले. कधीकधी तर एका रात्री दोन-तिनदा! मी आपला जोरात भुंकायला लागायचो, मग माणुस दिवा लावायचा नी मला झोडपायला लागायचा. मी चक्रावुन गेलो. आईने हेच शिकवले होते याची मला खात्री होती. मी ऐकण्यात एवढी मोठी चुक नक्कीच केली नव्हती. भुंक... भुंक... आईच्या शिक्षणपद्धतीचा भुंकणे हा पाया होता. आणि इथे मला भुंकल्याबद्दल रोज मार पडत होता.
डोके फुटुन जाईपावेतो विचार केल्यावर अचानक माझ्या डोक्यात प्रकाश पडला. आईच्या विचारातल्या तृटी माझ्या लक्षात येऊ लागल्या. आईने सांगितलेले बरोबर होते पण कुठे? तर जिथे माणसे अशी बुजरी नसतात तिथे. पण प्रसंगानुरूप आपल्याला बदलावे लागते. इथे हा माणुस म्हणजे बुजरेपणाची कमाल होती. जराजरी ठुस्स झाले तरी तो चार फुट उडायचा. आईने शिकवलेले सगळे कितीही शहाणपणाचे असले तरी इथे गरज होती ती माझ्या मालकाला जसे हवे तसेच वागण्याची. आईने सांगितल्याप्रमाणे वागुन मला मारच मिळाला होता. आता स्वतःचे डोके चालवणे भाग होते.
म्हणुन मग त्या रात्री खिडकी उघडल्याचा आवाज आल्यावर मी अजिबात लक्ष न देता पडुन राहिलो. साधे गुरगुरलोही नाही. तो जो कोणी होता तो आत आला नी हातात कंदिल घेऊन इकडे तिकडे फिरू लागला. तो माणुसच आहे हे मी वासावरुन ओळखले पण एकही प्रश्न विचारला नाही. आणि मग त्याने दिवा लावला आणि माझ्याजवळ येऊन मला चक्क थोपटले. एवढ्या दिवसात पहिल्यांदाच!
‘शाब्बास!’ तो म्हणला,’ हे घे बक्षिस.’
आणि त्याने मला रात्रीच्या जेवणाचे भांडे चाटायला दिले.
त्यानंतर आमचे मस्त जमले. प्रत्येकवेळी खिडकीकडे खुडबुड ऐकु आली की मी अजिबात लक्ष न देता पडुन राहायचो आणि दर वेळी मला हाडूक किंवा तसेच काहीतरी चांगले मिळायचे. एकदा का सवय झाली, की सगळे कसे सोप्पे होऊन जाते.
जवळजवळ आठवडाभराने माणसाने मला सकाळीच घराबाहेर नेले. बराच वेळ चालल्यावर आम्ही एका मोठ्या गेटपाशी आलो. आतला गुळगुळीत रस्ता आम्हाला थेट एका मोठ्या घरापाशी घेऊन गेला. किती सुंदर घर होते ते! घराच्या समोर मस्त हिरवळ होती, आजुबाजुला शिस्तबद्ध झाडे उभी होती आणि लांबवर मागे जंगलही दिसत होते.
माणसाने घराची बेल वाजवली. एका म्हाता-या माणसाने दरवाजा उघडला.
‘कोण पाहिजे?’
‘तुम्हाला चांगला राखणीकुत्रा हवाय असे कानावर आले म्हणुन आलोय.’
‘कमालाय!! मी आता बाहेर जाऊन चांगला कुत्रा कुठे मिळतो का तेच पाहणार होतो. माझ्या कुत्र्याने सकाळीसकाळी बाहेर जाऊन काय खाल्ले कोणास ठाऊ़क. गेला बिचारा.’
‘हम्म. बिचारा... कुठलेतरी कुजलेले हाडबिड खाल्ले असेल.’
‘ह्याचे काय घेणार?’
‘पाच शिलिंग’
‘राखण करतो का बरी?’
‘एकदम...’
‘बघणारा एकदम घाबरेल असा दिसतोय खरा.’
‘हम्म.’
केअरटेकरने माणसाला पाच शिलिंग दिले आणि मला त्याच्याकडे सोडुन तो निघुन गेला.
आजुबाजुच्या नविन गोष्टी, नवे वास, केअरटेकरचे प्रेम इत्यादी गोष्टीत बराच वेळ गेल्याने मला माणसापासुन तोडले जाणे तितकेसे जाणवले नाही. पण दुपारनंतर मात्र माणुस मला कायमचा सोडुन गेला आणि आता परत कधीच भेटणार नाही या विचाराने खुप उदास वाटायला लागले. मी उगीचच घरभर फिरत राहिलो, विव्हळत राहिलो. घर मात्र एकदम मस्त होते. मला वाटलेले त्यापेक्षा बरेच मोठे होते. पण माझे मन मात्र तेथे लागेना. तुम्हाला आश्चर्य वाटलं ना? माणसाने मला माराशिवाय काहीच दिले नव्हते तरी त्याच्या आठवणींनी मी व्याकुळ झालो होतो. पण आम्हा कुत्र्यांचं असंच असतं राव.. संध्याकाळ होईतो मी पुर्णपणे उदास होऊन गेलो. मला चावण्यासाठी एक चप्पल आणि एक जुने ब्रशही सापडले. पण माझे कशातच मन लागेना. मी नुसता बसुन राहिलो.
एक गंमतीशीर गोष्ट मी नेहमी पाहिलीय. आपण असे वाकडे तोंड करुन बसलेलो असतानाच अचानक आपला मुड पार सुधारुन जाईल अशी घटना घडते. मी असा बसलेलो असताना बाहेर मोटरसायकलचा आवाज आला आणि नंतर कोणीतरी ओरडण्याचा आवाज आला.
तो आवाज दुस-या तिस-या कोणाचाही नसुन माझ्या लाडक्या फ्रेडचा होता. अगदी देवासारखा धावून आला तो माझ्यासाठी. म्हातारा उठुन दरवाजापर्यंत जाईतो मी तिथे पोचुन दारावर पायाने घासायलाही लागलो.
'वा! वा!! वा!!! काय मज्जा आहे ना!!' मी आनंदाच्या भरात बाहेरच्या हिरवळीवर चारदा फे-या मारल्या आणि मगच फ्रेडच्या अंगावर उडी मारली.
‘तू इथे काय करतोयस फ्रेड? केअरटेकर तुझे बाबा आहेत काय? मागच्या जंगलात मोठे ससे आहेत, तु बघितलेयस कधी? तु किती दिवस इथे राहणारेस?माझी आई बरी आहे ना? मला इथे खुप आवडले. तू आता थेट गुत्त्यातुनच आलायस का? तुझ्या बाबांनी मला पाच शिलिंगला विकत घेतले. इतक्यातच माझी किंमत दुप्पट झाली, तु पाहिलेस?' मला काय बोलू नी काय नको असे झाले होते.
‘अरे, काळ्या!!!’ मला ह्याच नावाने तिथे हाक मारायचे. ‘तू इथे काय करतोयस? हा कुठे भेटला तुम्हाला बाबा?’
‘एका माणसाकडुन घेतला याला आज सकाळी. बिचा-या बॉबने काय खाल्ले कोणास ठाऊक, गेला बिचारा. हा चांगला राखणकुत्रा आहे ना? तसा ब-यापैकी भुंकतो म्हणा…’
‘असायला हवा. त्याची आई अख्ख्या लंडनमधली सगळ्यात चांगली राखणी आहे. पण हा तर बॉसकडे असायचा. इथे कसाकाय आला बुवा....’
बोलतबोलत आम्ही घरात गेलो. नंतर जेवणं झाल्यावर गप्पा मारत बसलो. फ्रेड रात्रीपुरताच आला होता. त्याला बॉसने सकाळी परत बोलवलं होतं.
‘तसे मलाही इकडे आल्यावर कधी इथुन जातो एकदाचे असे होऊन जाते. काय भयाण जागा आहे ही! तुम्हाला चोरांची भीती वाटत नाही काय इथे?’
‘बंदुक आहे की माझ्याकडे. आणि हा कुत्रा आहे. एकट्याने कदाचित भीती वाटलीही असती, पण कुत्र्याची सोबत होते. बॉबपण चांगली सोबत करायचा. इथे कुत्रे खुप कामाला येतात.’
‘कधी कोणी भुरटा चोर फिरकलेला?’
‘आलेला की एक सकाळी. ह्याला विकणारा भुरटाच वाटत होता!’
ते माणसाबद्दल बोलायला लागल्यावर मी फ्रेडला तो माणसाला ओळखतो का म्हणुन विचारले. माणुस मला विकत घेताना फ्रेड कदाचित त्याला भेटला असल्याची शक्यता होती.
‘तुला तो खुप आवडेल. तू भेटायला हवं होतंस त्याला.’ मी म्हणालो.
‘आता हा कशाला गुरगुरतोय? कुठे काही गडबड तर नाही ना?’ फ्रेड म्हणाला.
म्हातारा जोरात हसला, ‘तो गुरगुरत नाहीय तर झोपेत बडबडतोय. तुला भास होताहेत. शहरात राहुन तू खुप भित्रा झालायस.’
‘भास होताहेत खरे. दिवसा तसे इथे काही वाटत नाही, पण रात्री खुप भीती वाटते. काय भयानक शांतता आहे इथे. तुम्ही कसे राहता इथे कळत नाही. मी दोनचार रात्री इथे काढल्या तर नक्कीच भुते दिसु लागतील मला.’
म्हातारा जोरात हसला. ‘तुला तसे वाटतेय तर ही बंदुक ठेव तुझ्याकडे आज. मला तशी काय गरज नाहीय तिची.’
‘आणा इकडे. अजुन असतील तर त्याही सोबत ठेवेन मी.’
ते दोघेही वर गेले आणि मी हॉलमध्ये. बॉबची बास्केट आता मला मिळाली. बास्केट एकदम चांगली होती, पण फ्रेड भेटल्याच्या आनंदात मला धड झोपही येईना. शिवाय कुठूनतरी उंदरांचा वास येत होता. कुठून ते शोधल्याशिवाय मला चैन पडले नसते.
मी असाच हुंगत होतो तेव्हा काहीतरी आवाज झाला. मला आधी वाटले उंदिरच आहेत पण नीट ऐकले तेव्हा लक्षात आले की खिडकीबाहेरुन आवाज येत होता. कोणीतरी खिडकी उघडण्याचा प्रयत्न करत होते बहुतेक.
माझ्या जागी आई असती तर एव्हाना तिने अख्खे घर दणाणुन सोडले असते. मीही तेच केले असते म्हणा, पण मला माणसाने वेगळे वळण लावलेले. अर्थात बाहेर माणुस असण्याची शक्यता फारच कमी होती कारण तो जाताना मला परत भेटण्याबद्दल काहीच बोलला नव्हता. तरीही मी भुंकलो नाही. आहे तिथेच उभे राहुन मी कान टवकारले. एवढ्यात खिडकी उघडली आणि कोणीतरी त्यावर चढायला लागले. मी एकदा नीट हुंगले आणि तो माणुसच आहे हे माझ्या लक्षात आले.
मी एवढा आनंदलो की एकदम जोरात ओरडलो. पण माणसाला असे केलेले आवडत नाही हे आठवताच एकदम गप्प झालो. तरी मी त्याच्याकडे धावत गेलो आणि त्याच्या अंगावर उड्या मारल्या. त्याने मला एका कोप-यात गुपचुप पडायला सांगितले. मला भेटुन त्याला अजिबात आनंद झाला नव्हता. मी गुपचुप कोप-यात जाऊन पडलो.
खोली अंधाराने भरलेली पण माणसाने सोबत एक कंदिल आणलेला. त्या प्रकाशात तो इकडेतिकडे फिरुन सामान गोळा करुन सोबत आणलेल्या बॅगेत भरत होता. मध्येच थांबुन तो काहीतरी ऐकतही होता आणि मग परत सामान भरायला सुरवात करत होता. तो जरी भराभर हालचाल करत होता तरी आवाज मात्र अजिबात करत नव्हता. फ्रेड किंवा त्याचे बाबा तिथे आलेले त्याला अजिबात आवडणार नव्हते हे तर स्पष्ट दिसत होते.
कोप-यात पडुन त्याच्याकडे पाहताना मी ह्या विचित्र वागणुकीचा विचार करत होतो. मी स्वतः जरा जास्तच मोकळा असल्याने इतर कोणाला असा मोकळेपणा आवडत नसेल तर त्याचे मला खुप नवल वाटते. अर्थात गुत्त्यामध्ये मला प्रत्येक माणुस हा प्रत्येक कुत्र्यासारखाच वेगळा असतो हे लक्षात आलेले. बॉसचा बूट कधी चघळायला लागलो की बॉस मला लाथ मारायचा. तेच फ्रेडचा चघळला तर तो गळ्याखाली खाजवायचा. माणसांचे हे असेच आहे. काही बुजरे असतात तर काही सगळ्यांमध्ये मिसळतात. ठिक आहे, पण माणसाच्या बाबतीत जरा अतीच झालेय असे मला वाटायला लागले. आणि वर तो स्वतः सुधरायचा प्रयत्नही करत नव्हता. आता हेच बघा ना.. एखाद्या माणसाला लोकांना प्रत्यक्ष भेटायला इतके जीवावर येते की तो त्यांच्या घरी ते आपापल्या बिछान्यात झोपल्यावरच मध्यरात्री येतो. काय हा मुर्खपणा! असला लाजाळूपणा माझ्या एकुण व्यक्तीमत्वातच नसल्याने मला हा प्रकारच कळत नव्हता. अर्थात प्रयत्न केल्यास कुठलीही गोष्ट जमु शकते. पण माणुस प्रयत्नच करत नव्हता. उलट जमेल तितके लोकांना टाळण्याकडेच त्याचा कल होता.
मला माणुस आवडत होता. अर्थात तो कोणालाही चटकन आवडेल असा नव्हता पण आम्ही दोघांनी काही काळ एकत्र घालवलेला होता आणि मग अशा वेळी त्याचा लळा लागला नसेल तर मग मी कुत्रा कसला?
कोप-यात पडुन पाहात असताना माणसाला मदत करण्याची एक भन्नाट कल्पना माझ्या डोक्यात आली. फ्रेड वरच्या मजल्यावर झोपला होता आणि शप्पथ सांगतो, फ्रेडसारखा कोणाशीही चटकन मैत्री करणारा दुसरा कोणी नसेल. फ्रेडची सगळ्यांशी लगेच मैत्री होते. मला वाटले की मी जर माणसाला आणि फ्रेडला एकत्र आणले तर दोघांचे कदाचित जमेल आणि माणसाला आपण उगीचच माणुसघाणेपणा करत होतो हे कळेल. फ्रेडमुळे त्याच्यात आत्मविश्वास जागा होईल. मी त्याला बिलबरोबर मोकळेपणे बोलताना पाहिले होते.
अर्थात माझा हा चोंबडेपणा माणसाला आवडणार नाही म्हणा, पण माझा विशुद्ध हेतू लक्षात आल्यावर तो माझे आभारच मानेल.
आता प्रश्न हा होता की माणसाला न घाबरवता फ्रेडला खाली कसे आणायचे? मी फ्रेडला इथुनच हाक मारली असती तर माणुस क्षणातच खिडकीतुन पसार झाला असता. त्यामुळे मी इथुन हळुच वर जाऊन फ्रेडला सगळे नीट समजावुन मग खाली आणायला आणि माणसाबरोबर मैत्री करायला लावायला हवे होते.
माणसाचे माझ्याकडे लक्ष नव्हते. माझ्याकडे पाठ करुन तो एका कोप-यात बसुन काहीतरी शोधत होता. मी ही संधी पाहुन हळूच वर पळालो.
फ्रेडचे दार बंद होते आणि आतुन घोरण्याचा आवाज येत होता. तो आवाज बंद होईपर्यंत मी दार आधी हलक्याने आणि नंतर जरा जोरात खरवडत राहिलो. फ्रेडने उठुन दार उघडले.
“आवाज करु नकोस, गुपचुप खाली ये. माझ्या एका मित्राशी तुला मला भेटवायचेय.” मी कुजबुजलो.
त्याला माझी कल्पना आवडली नसावी बहुतेक.
“काय नाटक हाय? इतक्या रात्री झोपमोड? चल फुट.”
“नाही, खरंच फ्रेड, मी खोटं नाही सांगत. खाली माणुस आहे. तो खिडकीतुन आलाय आणि खुपच लाजाळू आहे. तु खाली येऊन त्याच्याशी बोललास तर त्याला बरे वाटेल.”
“तु ही खुसरपुसर काय लावलीयस—–?” फ्रेड बोलताबोलता अचानक थबकला आणि कान देऊन ऐकु लागला. खालुन अगदी स्पष्टपणे माणसाच्या चालण्याचा आवाज येत होता.
फ्रेड खोलीत धावत गेला आणि काहीतरी घेऊन बाहेर आला. तो हलकेच खाली जाऊ लागला आणि त्याच्या मागुन मी जाऊ लागलो.
माणुस अजुनही पिशवीत सामान भरत होता. मी दोघांची ओळख करुन देणार तेवढ्यात मुर्ख फ्रेड जोरात ओरडला. इतक्या जोरात की मी घाबरुन चावणारच होतो त्याला.
“काय केलंस तु हे गाढवा? मी सांगितलेलं ना तो संकोची आहे? आता तो घाबरला असणार!”
आणि नेमके तेच झाले. डोळ्याचे पाते लवते न लवते तोच माणुस खिडकीतुन पसार झाला. मी त्याला ओरडुन सांगतच होतो की मी आणि फ्रेडच आहोत इथे, तर इतक्यात कुठुनतरी बंदुकीचा बार काढल्याचा मोठ्ठा आवाज झाला आणि माझा आवाज त्यात विरुन गेला. माणसाला काहीच ऐकु गेले नसणार.
मी फ्रेडवर खुप वैतागलो होतो. सगळा बट्याबोळ झाला होता. फ्रेड तर आचरटासारखा नाचत होता. निदान बाहेर जाऊन माणसाला तरी समजवावे म्हणुन मी खिडकीतुन बाहेर उडी मारली. फ्रेडनेही माझ्या मागुन उडी मारली ती थेट माझ्याच अंगावर.
बाहेर काळोख पसरला होता. काहीच दिसत नव्हते पण तरीही माणुस तिथेच असणार याबद्दल मला खात्री होती. तो लांब गेला असता तर मला तो पळताना ऐकु आले असते. मी वासावरुन त्याचा माग काढायचा प्रयत्न केला.
फ्रेडचे बाबाही आता खाली आलेले. त्यांच्या हातात बॅटरी होती आणि ते दोघेही माणसाला शोधत होते. मी वासावरुन हुंगत गेलो आणि थोड्याच वेळात माणुस आवारातल्या एका मोठ्या झाडावर असल्याचा वास मला लागला. मी झाडाखाली उभा राहुन वर पाहायला लागलो पण मला अर्थातच काही दिसत नव्हते.
'तु वर आहेस का?' मी ओरडलो, 'घाबरायचे काहीच कारण नाहीय. तो फ्रेड आहे, माझा जुना मित्र. तु मला जिथुन घेतलेस तिथेच तो कामाला असतो. त्याच्या बंदुकीतुन चुकून बार उडाला. तो तुला काही नाही करणार.'
वर काहीच हालचाल झाली नाही. माझा अंदाज बहुतेक चुकला.
'पळाला बहुतेक..' फ्रेड बाबांना सांगत होता एवढ्यात मला वर फांद्यांमध्ये काहीतरी हलल्याचा आवाज आला.
'नाही, पळाला नाही, तो वर आहे बहुतेक.' मी ओरडलो.
'कुत्र्याला सापडला वाटतं तो!'
'हो, वर आहे तो. इकडे ये लवकर आणि भेट त्याला.'
फ्रेड झाडाखाली येऊन वर पाहु लागला.
'अरे ए… मुकाट्याने खाली उतर!'
वर काहीच हालचाल दिसेना.
'अरे, तो वर आहे, पण तु जरा व्यवस्थित बोल. तो खुप लाजाळू आहे, त्याला परत सांग खाली यायला.' मी फ्रेडला समजावले.
'ठिक आहे, तुला वर बसायचे तर बस. मी आता फांद्यांवर उगीच गंमत म्हणुन बार टाकतोय.'
आणि मग माणुस हळुहळू खाली उतरु लागला. तो खाली येताच मी त्याच्यावर उडीच टाकली.
'सगळे ठिक आहे, तु घाबरु नकोस. हा माझा मित्रच आहे. तुला तो आवडेल.'
पण काहीही फायदा झाला नाही. त्यांचे एकमेकांशी अजिबात जमले नाही. मुळात ते एकमेकांशी काही बोललेही नाहीत. माणुस घरात गेला, त्याच्यामागुन फ्रेड बंदुक घेऊन घरात गेला, पण परिस्थिती मात्र जैसे थे! माणुस एका खुर्चीवर बसला, फ्रेड दुस-या खुर्चीवर बसुन राहिला. काही वेळाने मोटारीतुन अजुन काही माणसे आली आणि माणुस त्यांच्याबरोबर निघुन गेला. जाताना मला बायही केले नाही त्याने.
ती सगळी माणसे गेल्यावर फ्रेड आणि त्याच्या बाबांनी माझे इतके लाड करायला सुरवात केली की काय सांगु! मला तर काहीच कळत नव्हते. फ्रेडशी ओळख झाल्याचा माणसाला काहीच आनंद झालेला दिसला नाही पण फ्रेड मात्र या भेटीने अगदी भारावुन गेल्यासारखा वागत होता. माणसे अशी विचित्र का वागतात?
पण तेवढ्यात फ्रेडच्या बाबांनी माझी फेवरीट डिश माझ्या पुढ्यात ठेवली आणि मी उगीच डोक्याला शीण द्यायचे बाजुला ठेऊन माझ्या आवडत्या कोल्ड हॅमवर ताव मारायला सुरवात केली. आई नेहमी म्हणायची, 'ज्या गोष्टींशी आपला संबंध नाही त्याबद्दल उगीच विचार करुन डोके पिकवुन घ्यायचे नाही. कुत्र्याने नेहमी त्याच्या पोटाला दोन घास कसे मिळतील हा विचार करायला हवा. दुस-यांच्या भानगडीत उगीचच नाक खुपसण्यापेक्षा गुपचुन आपल्या वाट्याची भाकर खावी नी चुपचाप पडुन राहावे हेच बरे!' आई तशी खुपच नॅरो माईंडेड होती पण तिचा कॉमनसेन्स मात्र चांगला होता.
टिप्पण्या