जीव्ह्जचे आगमन!!

आता जीव्हजबद्दल बोलायचे म्हणजे, जीव्हज म्हणजे  माझी  व्यक्तिगत कामे पाहणारा हो,  आमचे संबंध नेमके कसे  आहेत? -याच लोकांचे असे म्हणणे आहे की मी त्याच्यावर नको तितका विसंबुन आहे.  माझी ॅगथा मावशी तर त्याला चक्क माझा मालक म्हणते. पण मी म्हणतो, का नाही? तो माणुस विलक्षण प्रतिभावंत आहे. तो आल्याच्या आठवडाभरात  दैनंदिन आयुष्यातल्या कटकटींवर स्वतः डोकेफोड करणे मी सोडुन दिले. तो आल्याला आता साधारण सात आठ  वर्षे झाली असतील. साधारणपणे फ्लॉरेन्स क्रेय, माझ्या विलोबीकाकांचे पुस्तक अणि स्काऊट एडवीन प्रकरणावेळी तो माझ्याकडे  आला.
खरी सुरवात झाली ती मी काकांच्या श्रॉपशायर मधल्या ईजबीला परतलो तेव्हा. साधारण एखादा आठवडा मी तिथे घालवणार होतो; दरवर्षी उन्हाळा लागला की मी एखाद्या आठवड्यासाठी तिथे जातो. तिथे असताना मला अचानक लंडनला नवा नोकर बघण्यासाठी परत जावे लागले.  ईजबीला सोबत नेलेल्या मिडोज ह्या माझ्या नोकराला माझे रेशमी मोजे ढापताना मी रंगे हात पकडले. आणि तुम्हाला माहित आहेच असल्या गोष्टी मीच काय कोणीही अजिबात खपवुन घेता कामा नयेत. त्याला ऊचलेगिरी करायची सवय होती आणि  माझ्याकडेही तो हात बराच साफ करुन घेतोय हे लक्षात आल्यावर त्याला नोकरीतुन लगेच डच्चू देणे आणि नवा नोकर बघणे मला क्रमप्राप्त झाले.  लंडनला रजिस्ट्री ऑफिसात नव्या नोकरासंबंधी कळवल्यावर त्यांनी लगेच जीव्हजला माझ्याकडे पाठवुन दिले.

तो माझ्याकडे आला ती सकाळ माझ्या कायम स्मरणात राहिल. त्याचे असे झाले होते की आदल्याच संध्याकाळी मी एका खास पार्टीला गेलो होतो  आणि परिणामी सकाळी उठताच माझे डोके -यापैकी जड झाले होते.  भरीस भर म्हणुन फ्लॉरेन्स क्रेयने दिलेले एक पुस्तक वाचायचा मी प्रयत्न करत होतो. ती सुद्धा माझ्यासारखीच ईजबीला पाहुणी होती आणि साधारण तीन-चार दिवसांपुर्वी आम्ही दोघे प्रेमात पडलो होतो. मी ह्या आठवड्याच्या अखेरीस ईजबीला परतणार होतो आणि त्याआधी मी ते पुस्तक वाचुन संपवावे ही तिची अपेक्षा होती.  त्याचे काय आहे, मी बौद्धिकदृष्ट्या तिच्या पातळीवर यावे अशी तिची इच्छा होती. फ्लॉरेन्स दिसायला खुप सुंदर होती, बाजुने पाहताना तर ती अशक्य सुंदर दिसायची  पण ती विदुषीटाईप काहीतरी गंभीर अशी मुलगी होती. तिने मला दिलेल्या पुस्तकाचे नाव 'नैतिकतेचे प्रकार होते यावरुन ती कशा प्रकारची मुलगी असेल हे तुम्ही ओळखा. मी पुस्तकाचे एक पान उघडुन वाचायला सुरवात केली.
'भाषणाचा खरा किंवा गर्भित मतितार्थ खुपच व्यापक आहे, त्यात एक अपेक्षित असे बंधन आहे, सामाजिक घटकांसाठी आवश्यक अशा भाषेचा तो संकेतार्थ आहे आणि सरतेशेवटी हे सगळे एकत्रितपणे पुढे घेऊन जाण्याचा तो एक प्रयत्न आहे.'
आता हे खरे असेलही पण सकाळीसकाळी डोके जड झाल्यावर वाचण्यालायक प्रकरण नक्कीच नाही.
 
तर अशा ह्या सुंदर पुस्तकाला चाळण्याचा मी प्रयत्न करत असताना बेल वाजली. मी सोफ्यावरुन कसेबसे उठत दरवाजा उघडला. एक -यापैकी सभ्य दिसणारा गृहस्थ उभा होता.
'मी एजन्सीतर्फे आलोय, सर!' तो म्हणाला, 'मला असे कळलेय की तुम्हाला वॅलेची गरज आहे?'
ला याक्षणी अंडरटेकरची जास्त गरज होती.  पण तरीही मी त्याला आत यायला सांगितले. तो चक्क एखाद्या पिसासारखा तरंगत आत आला. मी पाहातच राहिलो.  मिडोजला पाय घासत चालायची घाणेरडी सवय होती आणि हा तर जणू चालत नसुन तरंगत होता. त्याच्या चेह-यावर गंभीर आणि समजुतदार भाव होते; जणू त्यालाही मित्रांबरोबर उशीरापर्यंत पार्टीचे परिणाम माहित होते.
'एक मिनीट, सर.'  तो हलकेच म्हणाला.
आणि तो जणू अदृश्यच झाला. थोडा वेळ किचनमध्ये खुडबुडण्याचे आवाज आले आणि ट्रेमध्ये एक ग्लास घेऊन तो परत अवतिर्ण झाला.
राजवैद्याने राजकुमाराला ज्या अदबीने औषधाचा डोस द्यावा नेमक्या त्याच अदबीने तो मला म्हणाला, 'हे पेय जर तुम्ही घेतले तर बरे होईल. मी स्वतः ह्याचा शोध लावलाय. वॉर्सेस्टर सॉसचा रंग, कच्च्या अंड्याची पौष्टिकता आणि लाल  मिरचीचा झणझणीतपणा यात आहे. उशीरापर्यंतच्या पार्टीवर एकदम जालिम उतारा असे  हे घेणा-या -याचशा सद्गृहस्थांनी मला सांगितलेय.'
बुडत्याला काडीचा आधार अशी माझी स्थिती झाली होती. मी निमिषार्धात ते पेय घशाखाली ढकलले. माझ्या मस्तकात एक प्रचंड मोठा बाँब फुटलाय आणि तो घरंगळत माझ्या घशाच्या दिशेने येतोय असा मला क्षणमात्र भास झाला पण पुढच्याच क्षणी सारे  काही शांत शांत झाले. खिडकीतुन कोवळे उन आत झेपावु लागले, पक्षी झाडांवर मधुर किलबील करु लागले आणि एकंदर दिवस नव्याने सुरू झाल्याचा भास झाला.
'तुझी नोकरी पक्की." बोलण्याच्या परिस्थितीत येताच मी लगेच सांगुन टाकले.
माझ्यासमोरचा इसम हा एक नाणावलेले रत्न आहे आणि असल्या रत्नाविना कुठलेही घर आधेअधुरे आहे हे ओळखण्याचा चाणाक्षपणा अर्थातच माझ्याकडे आहे.
"धन्यवाद, सर.  माझे नाव जीव्हज."
"कामाला सुरवात लगेच करणार ?"
"अर्थातच सर!"
" मला परवाच श्रॉपशायरमधल्या ईजबीला परत जायचे आहे."
"उत्तम, सर?"  त्याची नजर माझ्या मागच्या टेबलावर खिळली होती. "टेबलावरच्या फोटोतली व्यक्ती हुबेहुब लेडी फ्लॉरेन्स क्रेयसारखी दिसतेय सर.  मॅडमना भेटुन मला जवळजवळ दोन वर्षे होत आली. तेव्हा मी लॉर्ड वॉर्पल्स्डॉनच्या सेवेत होतो.  राजीनामा दिला मी त्या नोकरीचा.  जेवताना पँट, फ़्लेनेल शर्ट  आणि शुटींग कोट घालायची त्यांची सवय मला अजिबात सहन होत नव्हती.
आता या म्हातारबुवाच्या विक्षिप्तपणाबद्दल जीव्हज मला काय नविन सांगणार होता? हे लॉर्ड वॉर्पल्स्डॉन फ्लॉरेन्सचे बाबा होते. हे तेच सद्गृहस्थ,  जे एकदा सकाळी न्याहारीला परत अंडी बघुन "अंडी.. अंडी.. रोज रोज ती अंडी.. खड्ड्यात गेली सगळी अंडी!!! म्हणत रागाने तडक फ्रान्सलाच निघुन गेलेले. तिथे गेल्यावर कित्येक वर्षे त्यांनी लंडनमधल्या  गोतावळ्याकडे ढुंकुनही पाहिले नव्हते.  अर्थात हा देशत्याग इथल्या गोतावळ्याच्या पथ्यावरच पडला म्हटले पाहिजे कारण ते शीघ्रकोपी होते आणि त्यामुळे सगळेजण कायम त्यांना टरकुन असत.
 मी लहानपणापासुन ह्या कुटूंबाला ओळखत होतो आणि लहानपणापासुनच मला ह्या म्हातारबुवांची  दहशत वाटत होती.   काळ हे सगळ्या दु:खांवरचं जालिम औषध आहे म्हणतात. पण हा काळही माझ्या मनातुन अवघ्या पंधराव्या वर्षी म्हाता-याची स्पेशल सिगार ओढताना त्याच्या हातुन पकडले जाण्याची  दु:खद आठवण पुसू शकला नव्हता.   निवांतपणे सिगारचा आस्वाद घ्यावा म्हणुन मी थोडा एकांत शोधत असताना हातात चाबुक घेऊन म्हातारा कुठुनतरी अचानक उगवला आणि खडकाळ दगडाळ रस्त्यावरुन त्याने जवळजवळ मैलभर तरी माझा पाठलाग केला.
 फ्लॉरेन्सशी एंगेज झाल्याच्या स्वर्गीय आनंदात एकच बाधा होती आणि ती ही की फ्लॉरेन्स तिच्या वडलांसारखीच शीघ्रकोपी होती.  कुठल्या गोष्टीवरुन तिचा भडका उडेल  हे कधीच सांगता यायचे नाही.  पण दिसायला मात्र ती.....  हाय..
"लेडी फ्लॉरेन्स आणि मी एंगेज्ड आहोत, जीव्हज." मी म्हणालो.
"अस्सं!!!"
त्याच्यात काहीतरी फरक नक्कीच पडला होता. म्हणजे वरवर दिसायला तसे काहीच नाही पण काहीतरी नक्कीच.  बहुतेक फ्लॉरेन्सबद्दल त्याचे मत चांगले नसावे. अर्थात मला त्याचे काय म्हणा? बहुतेक लॉर्ड वॉर्पल्स्डॉनकडे नोकरी करताना फ्लॉरेन्सचे आणि त्याचे काहीतरी वाजले असणार.  फ्लॉरेन्स खुपच गोड मुलगी होती,  दिसायला तर अतिशय देखणी,  पण घरातल्या नोकरांसोबतचे तिचे वागणे अतिशय कडक होते. 
तर आमचे असे बोलणे चालु असताना दारावरची बेल परत वाजली.  जीव्हज अलगद बाहेर गेला आणि हातात तार घेऊन परत आला.  मी ती उघडली. 
'लगेच निघ. अतिशय अर्जंट. पहिलीच ट्रेन पकड - फ्लॉरेन्स'
"अरे देवा !!!!"
"सर?"
"काही नाही."
मी जीव्हजसोबत या प्रकरणाच्या मुळाशी गेलो नाही यावरुनच मी त्याला तेव्हा अजिबात ओळखले नव्हते हे सिद्ध होते.   आता मी  त्याचा सल्ला घेतल्याशिवाय काही करण्याचा विचार स्वप्नातही करु शकत नाही.  फ्लॉरेन्सचा आदेश कोड्यात टाकणारा होता.  म्हणजे मला असे म्हणायचेय की मी परवा परततोय हे तिला माहित होते,  मग आजच बोलवायची घाई कशाला?   नक्कीच काहीतरी गडबड झाली असणार पण ती काय असावी याचा कयास बांधणे अवघड होते.
"जीव्हज,  आपण दुपारीच ईजबीला जायला निघतोय. जमेल ना?"
"हो सर"
"तुझे सामान वगैरे सगळे जमेल ना?"
"काहीच  त्रास नाही सर.  तुम्ही प्रवासात कुठला सुट घालणार आहात?"
"हाच!!!"
मी त्या सकाळी एक मस्त सुट घातलेला.  मला तो सुट खुप आवडलेला, त्याच्या प्रेमातच पडलो होतो म्हणाना.   म्हणजे प्रथमदर्शनी तो जरासा भडक वाटे पण थोड्या वेळाने छान वाटायला लागे.  माझ्या क्लबमधल्या सगळ्यानी त्याची खुप तारीफ केली होती.
"ठिक आहे सर."
परत मला त्याच्यात काहीतरी फरक जाणवला.  तो ज्या -हेने बोलला त्यावरुन तुमच्या लक्षात नाही आले? त्याला तो कोट अजिबात आवडला नव्हता.  माझ्या तत्काळ लक्षात आले की या इसमाला त्याची जागा जर आताच दाखवली नाही तर तो लवकरच माझ्या डोक्यावर मिरी  वाटणार.  तो जरा अतिशहाणा आहे हे चेह-यावरून दिसत होतेच म्हणा.   पण मीही  काय  कच्चा गुरूचा चेला नाहीये, बच्चंमजी.  आजवर  कित्येक जणांना त्यांच्या वॅलेचे गुलाम  झालेले मी पाहिलेत.   बिचारा ऑब्रे फॉदरगिल! एके दिवशी डोळ्यात पाणी आणुन त्याने  मला सांगितलेले  की केवळ नोकराला आवडत नाहीत  म्हणुन तो त्याचे आवडते तपकीरी शुज घालु शकत नाही. या लोकांना वेळीच वेसण घालणे जरुरीचे असते.  खूप हुशार असतात हे लोक.  बोट पकडायला दिले तर सरळ  हात पकडून मोकळे होतील.

"हा सुट तुला आवडला नाही , जीव्ह्स?", मी मुद्दाम  विचारले.

" अं, हो सर."

"ठिक आहे.  तुला काय आवडले नही यात?"

"तसा बरा आहे सुट, सर."

"काय बिघडलेय यात? सांगूनच टाक आता."

"मी सुचवलेले फारचे अनुचित नसेल तर एखादा साधा खाकी किंवा निळा सुट,  हलक्या लाईन्स असलेला…… "

"यक्क , फालतू!!!"

"ठिक आहे सर."

"अतिशय आचरट !!"

"जसे तुम्ही म्हणाल तसे."


मला पुढे काही बोलताच येईना.  वरच्या पायरीवर ठेवण्यासाठी म्हणुन पाऊल उचलून टाकावे आणि ती पायरीच नसल्याने पाय धाडकन जमीनीवर आपटावा तसे माझे झाले. मी बचावाच्या तयारीत पण समोरून हल्लाच नाही तर बचाव कसला?

"ठिक आहे तर."

"हो सर."

मग तो त्याचे सामान आणायला गेला.  मी "नैतिकतेचे प्रकारां"कडे वळलो आणि "मानसिक  विधितत्त्वमीमांसा" हे प्रकरण काढुन वाचायचा प्रयत्न करू लागलो. 
***************

प्रवासाचा पुर्ण वेळ मी ईजबीला काय  झाले असावे  हा विचार करण्यात घालवला. खूप डोकेफोड करुनही काय झाले असावे ते लक्षात येईना.   तरुण मुलीना भुरळ घालून लुटण्याचे प्रकार खूप ठिकाणी होतात असे मी वाचलेले. पण ईजबी ही त्यातली जागा नव्हती.  आणि मी घरी सोडुन आलेल्या पार्टीतले लोकही  माझ्यासारखेच कायद्याला घाबरून  असणारे सज्जन  होते.

आणि तसेही माझे काका असले काही चालवून  घेणा-यातले नव्हते.  ते खूप  कडक शिस्तीचे होते.   सध्या ते कौटुंबिक इतिहास की असेच काहीतरी लिहिण्यात मग्न होते.  गेले वर्षभर त्यांचे लिखाण चालू होते आणि  ते कायम लायब्ररीतच पडलेले असत.   सौ चुहे खाकर….  चे ते एक उत्तम  उदाहरण होते म्हणे.  त्यांच्या तरुणपणी ते खूप रंगेल होते असे मी कधीतरी कौटुंबिक चर्चेत ऐकलेले.  पण आता त्यांच्याकडे पाहून कोणीही त्यावर विश्वास ठेवला नसता हेही तितकेच खरे.

मी घरी पोचलो तेव्हा  तिथल्या  बटलर ओकशॉटने मला सांगितले की फ्लॉरेन्स तिच्या खोलीत आहे आणि तिची मदतनीस तिची बॅग भरत आहे.   तिथेच बाजूच्या कुठल्यातरी वस्तीवर काहीतरी जलसा होता म्हणे आणि फ्लॉरेन्स व इतर काहीजण थोड्या दिवसांसाठी तिथे जाणार होते.  मी आल्याचे  तिला लगेच कळवण्याबद्दल तिने ओकशॉटला बजावलेले.  म्हणुन मी स्मोकिंगरुममध्ये गेलो आणि तिची वाट पाहात बसलो.  थोड्या वेळाने ती आली.   तिच्याकडे पाहताच ती  थोडी वैतागलेली वाटली. डोळे थोडे सुजट वाटत होते. नक्कीच कायतरी बिनसलेले होते.

"डार्लिंग!"  मी तिला जवळ घ्यायचा प्रयत्न करत म्हणालो पण तिने मला बाजूला ढकलले.

"दूर हो!"

"काय झाले काय?"

"काय झाले नाही ते विचार!!!  बर्टी, तूला आठवते जाण्यापुर्वी तू मला तुझ्या काकांसोबत जरा गोड राहायला  सांगितलेलस?"

"हो."

आता खरी गोष्ट ही होती की मी त्या वेळेला पैशांच्या बाबतीत काकांवर बराचसा अवलंबुन होतो आणि त्यामुळे त्यांच्या मर्जीशिवाय लग्न करणे शक्य नव्हते.   काकानी  तसा या लग्नाला आक्षेप घेतला नसता म्हणा.  काका आणि फ्लॉरेन्सचे बाबा ऑक्सफर्डला  एकत्र होते. तेव्हापासूनची दोस्ती  होती दोघांची.  पण मला उगीच कसलाही धोका पत्करायचा नव्हता.  म्हणुन मी फ्लॉरेन्सला जरा काकांची मर्जी संभाळायला सांगितले होते.

"तू म्हणालेलास की मी जर कौटुंबिक इतिहासात थोडा रस दाखवला तर काकांना ते खूप आवडेल."

"मग? त्यांना नाही आवडले?"

"आवडले ना! खूपच आवडले. कालच त्यांचे  शेवटचे पान लिहून झाले आणि त्यांनी रात्री ते मला जवळजवळ पूर्णच वाचून दाखवले. मला आयुष्यात इतका मोठा  धक्का कधी बसला नाही.  ते पुस्तक भयंकर आहे!  अति भयंकर!!! भयानक!!!!!!"

"  पण… पण….  हे कसे  आहे?  माझे कुटुंबीय  आणि  भयानक? असे नसणार गं  !!!!"


"तुला कोणी सांगितले त्यांनी कुटुंबाबद्दल लिहिलेय?  काकांनी स्वत:च्या आठवणी लिहिल्यात.  "दीर्घायुष्याच्या प्रदीर्घ आठवणी"  म्हणे.   श्शी……  ".

माझ्या डोक्यात थोडा थोडा प्रकाश पडु लागला.  मी आधी म्हटल्याप्रमाणे विलोबी काका तरुणपणी थोडेफार रंगेल होते आणि त्या रंगेलपणाच्या आठवणी  जर ते लिहू लागले तर त्या अर्थातच तशाच असणार नाही का?

"त्यानी जे काही लिहिलेय त्याच्या अर्धा  टक्काही सत्य असेल तर तुझे काका तरुणपणी अतिशय रंगेल होते म्हणावे लागेल.  त्यांचे पुस्तक वाचायला सुरवात केली आणि पहिलेच प्रकरण १८८७ मध्ये कसे त्यांना आणि माझ्या बाबांना एका संगिताच्या कार्यक्रमातुन उचलुन बाहेर फेकण्यात आले होते विषयावर!!!!!"

"का फेकले?"

"मी ते सांगुन आपले तोंड विटाळू इच्छित नाही!"

१८८७ मध्ये अगदी हॉलमधुन उचलुन बाहेर फेकण्यात आले होते म्हणजे नक्कीच काहीतरी भयंकर असणार.  त्या काळी अशा घटना फारशा घडत नसत.

"कार्यक्रमाला जाण्याआधी बाबांनी शँपेनची पाऊण बाटली रिचवलेली हेही काकांनी अगदी ठळकपणे नमुद केलेय!!!!.  पुस्तक नुसते असल्याच गोष्टींनी भरलेय.  लॉर्ड एम्सवर्थबद्दलतर यापेक्षाही भयानक लिहिलेय."

" लॉर्ड एम्सवर्थ????  आपले लॉर्ड एम्सवर्थ तर नाही ना?? ब्लँडींग्सचे???"

तुम्हाला माहित आहेच लॉर्ड एम्सवर्थ किती साधे आहेत ते.  हल्ली तर बागेत खुरपणी घेऊन बसण्याशिवाय दुसरे काहीही करत नाहीत ते.

"तेच ते.  म्हणुन तर मी ह्या पुस्तकाच्या विरुद्ध आहे.  आज आपण ज्यांची नावे अतिशय आदराने घेतोय अशा प्रत्येकाबद्दल काहीनाकाही पुस्तकात आहेच.  आणि तेही काय? तर वाचुन वाटावे की आज समाजात प्रतिष्ठित म्हणुन वावरणारे हे लोक ऐशीच्या दशकात अगदी ओवाळून टाकलेले होते.  तुझ्या काकांच्या स्मृतीची पण कमाल आहे.   जवळजवळ प्रत्येक घटना अगदी बारिकबारिक तपशीलासकट त्यांच्या लक्षात आहे.   रॉशर्विल गार्डनच्या सर स्टॅन्ले गेर्वास्-गेर्वासबद्दल वाचशील तर चक्कर येईल.  म्हणे सर स्टॅन्ले ----   जाऊदे, मला नाही माझे तोंड विटाळायचे!!!

"सांग ना, सांग ना."

"अजिबात नाही."

"जाऊदे ना.  कशाला काळजी करतेस?  पुस्तक खरेच इतके ओंगळ असेल तर ते छापायला कोण भेटणार आहे त्यांना?"

"हो का?  काकांची रिग्स आणि बॅलिंजरशी बोलणीही झालीत आणि उद्याच्या डाकेने त्यांचे हस्तलिखितही पोहोचतेय तिथे.   लगेच प्रसिद्धही होईल.   असल्या पुस्तकांना म्हणे हल्ली खुप मागणी आहे.  त्यांनी हल्लीच लेडी कार्नेबीच्या  "ऐंशी दशकांच्या रोचक आठवणी" प्रसिद्ध केल्यायेत."

"मी वाचल्या त्या!!"

"हो?  मग त्या रोचक आठवणी तुझ्या काकांच्या प्रदीर्घ आठवणींसमोर क्षणात विसरल्या जातील इतके जहाल हे पुस्तक आहे असे मी म्हटले तर? आणि वर बाबा जवळजवळ प्रत्येक प्रकरणात आहेतच.  तरुणपणी त्यांनी केलेले एकेक धंदे वाचुन मला असा जबरदस्त धक्का बसलाय, काय सांगु?"

"मग आता काय करायचे?"

"रिग्स आणि बॅलिन्जरपर्यंत पोचायच्या आधीच ते हस्तलिखित हस्तगत करायचे आणि नष्ट करायचे."

मी एकदम ताठ बसलो. 

प्रकरणाने अचानक उत्कंठावर्धक वळण घेतले होते.

"आणि तु हे कसे काय करणार आहेस?"  मी उत्सुकतेने विचारले.

"मी कसे काय करणार आहे हे???  मी तुला सांगितले ना की ते पार्सल उद्या पोस्टात जाणार आहे म्हणुन?  मी आज रात्रीच जलशासाठी निघतेय व  सोमवारपर्यंत येऊ शकणार नाही.    तुला हे काम करायचे आहे.  आणि
म्हणुनच मी तुला तार करुन बोलावले."

"क्काय??????"

तिने माझ्याकडे रोखुन पाहिले.

"बर्टी, तु मला मदत करायला नकार देतोयस?"

"नाही, पण --  मी काय म्हणतो ----"

"इतकं सोप्पं काम!!!!!"

""पण जरी मी ----  म्हणजे मला असे म्हणायचे --- अर्थात मी तुझ्यासाठी काहीही ---- पण पण ---  तुला कळतेय ना मला काय म्हणायचेय ----"

"तुला माझ्याशी लग्न करायचेय असे तु म्हणालेलास, बर्टी???"

"हो,  अर्थात...... पण तरी -----"

अकस्मात, क्षणभर ती मुर्तिमंत तिच्या वडलांसारखी दिसली.

"त्या आठवणी जर प्रसिद्ध झाल्या तर मी तुझ्याशी लग्न करणार नाही!."

"पण फ्लॉरेन्स, ऐक ना...."

"मी खरे तेच बोलतेय. ह्याच्याकडे तू तुझी सत्वपरिक्षा म्हणुनही पाहु शकतोस. तुझ्याकडे जर हे काम  यशस्वी करण्याइतपत धैर्य आणि बुद्धिमत्ता असेल तर मी असे समजेन की लोक समजतात तितका तु  शुंभ आणि
 नालायक नाहीयेस.  आणि जर का तु अयशस्वी झालास तर मात्र मी समजेन की तुझ्या अ‍ॅगथा मावशीचेच बरोबर होते जेव्हा तिने तुझी तुलना गांडूळाशी केलेली आणि तुझ्याशी लग्न न करण्याचा सल्ला मला दिलेला.   ते हस्तलिखित मधल्यामध्ये उडवणे ही एक अतिशय सोपी गोष्ट आहे.  पण अर्थात जर इच्छा असेल तरच मार्ग दिसेल."

"पण विलोबी काकांनी मला पकडले तर?  माझा भत्ता ते तात्काळ बंद करतील."

"आता माझ्यापेक्षा तुझे काकांच्या पैशांवर जास्त प्रेम असेल तर मात्र......"

"नाही नाही,  मुळीच नाही."

"ठरले तर मग.  ते हस्तलिखित असलेले पुडके काका उद्या सकाळी हॉलमधल्या टेबलावर ठेवतील.  इतर पत्रांसोबत ओकशॉट ते घेऊन पोस्टात जाईल.  तुला एवढेच करायचे आहे की त्या आधीच ते तिथुन उचलायचे आणि नष्ट करायचे.  पुडके पोस्टात गहाळ झाले असा काकांचा समज होईल."

मला काही हे पटले नाही.

"त्यांच्याकडे दुसरी प्रत नाही काय?"

"नाही,  त्यांनी ते टाईप केले नाही.  हाताने  लिहिले आणि तसेच ते पाठवताहेत."

"पण मग ते परत लिहितील ना...."

"हो,  एवढी ताकद आहे ना त्यांच्यात या वयात!!!!!"

"पण----"

"बर्टी, तु जर काही न करता मुर्खासारख्या शंका काढत बसलास तर ---------"

"मी फक्त काय काय शक्यता आहेत त्या दर्शवीत  होतो."

"काही गरज नाही.  शेवटचे विचारते,  तु माझ्यासाठी हे एक छोटेसे सोप्पे सत्कृत्य करणार आहेस की नाही?"

तिच्या त्या शब्दांवरुन मला एकदम काहीतरी सुचले.

"अरे मग तु एडविनलाच का नाही हे काम देत?  म्हणजे घरातल्या सगळ्यांचाच हातभार लागल्यासारखे होईल.  आणि त्या पोरालाही मदत होईल."

माझ्या मते ही एक अतिशय सुंदर कल्पना होती.  एडविन तिचा धाकटा भाऊ होता आणि तिच्यासोबत  ईजबीला आला होता.  मला जन्मापासुन त्याच्याबद्दल चिड होती.  आता आठवणींचा विषय निघालाय आहे तर, नऊ वर्षांपुर्वी ह्याच नालायक एडविनमुळे मी त्याच्या बाबाच्या सिगार्स चोरुन फुंकताना रंगे हाथ पकडलो गेलो होतो.  आता तो चौदा वर्षांचा होता आणि नुकताच बॉय स्कॉऊट बनला होता.  काही मुले असतात ना,  प्रत्येक गोष्टीत जरा जास्त गांभिर्याने करायची सवय असते त्यांना.  हा त्यापैकीच एक होता.  बॉय स्कॉऊटची नियमित सत्कृत्ये करण्यात तो सतत मागे पडत होता आणि त्यामुळे तो सतत कातावलेला दिसे .  त्याने कितीही प्रयत्न केले तरी काही ना काही कारणामुळे त्याची सत्कृत्ये ठरलेल्या वेळेनुसार होत नसत आणि मग ती पुरी करण्यासाठी तो घरभर जे उद्योग करत फिरे त्यामुळे ईजबी म्हणजे सगळ्यांसाठीच एक नरक बनलेला होता.

फ्लॉरेन्सला ही कल्पना अजिबात  आवडली नाही.

"बर्टी, मी असे काहीही करणार नाही.   मला तुझे आश्चर्य वाटतेय.  तुला मी इतकी छान कॉम्प्लिमेंट देतेय - तुझ्यावर विश्वास टाकुन.  आणि तुला ते कळतही नाहीय."

"मला ते कळतंय गं राणी.  पण मला असे म्हणायचे होते की एडविन हे काम माझ्यापेक्षा जास्त चांगले करु शकेल.  हे बॉय स्काऊट अशा कामात पारंगत असतात.  हुलकावणी द्यायची,  माग काढायचा,  लपुनछपुन दबक्या पावलांनी सावजाला हेरत फिरायचे.   हे सगळे शिकवतात ना त्यांना."

"बर्टी,  ही एक अतिशय क्षुल्लक अशी गोष्ट तु माझ्यासाठी करणार आहेस की नाही?  करणार नसशील तर तसे आत्ताच सांग म्हणजे मग तुला माझ्याबद्दल अगदी आभाळाएवढे काहीतरी वाटते वगैरे वगैरे ढोंग आपण इथेच संपवुया."

"राणी,  मी तुझ्यावर अगदी मनापासुन प्रेम करतो."

"मग तु करणार की नाही?"

"ठिक आहे, मी म्हणालो,  "मी करतो, करतो, करतो."

आणि मग मी काय करावे याचा विचार करत दरवाजाच्या दिशेने लडखडलो.  दरवाजाच्या बाहेर जीव्ह्स उभा होता.

"माफ करा सर, पण मी तुम्हालाच शोधत होतो."

"का? काय झाले?"

"तुमच्या कानावर घालणे मला जरुरीचे वाटले म्हणुन सांगतोय की कोणीतरी आपल्या तपकिरी बुटांवर काळे पॉलिश केलेले आहे."

"काय!! कोणी? का?"

"मी सांगु शकत नाही, सर!"

"आता त्या बुटांचे काही करता येईल का?"

"काही नाही, सर."

"ह्म्म"

"उत्तम, सर!"

*****************

मी तेव्हापासुन सतत विचार करत होतो की ही खुनी वगैरे मंडळी एकीकडे खुनाचा बेत आखत असताना दुसरीकडे नेहमीच्या आयुष्यात अगदी नॉर्मल माणसासारखे कसे काय राहु शकतात?    त्या तुलनेत माझ्यावर सोपवलेले काम अतिशय सोपे असुनही कामाच्या विचाराने मला रात्रभर नीट झोप आली नाही आणि सकाळी उठल्यावर माझी अवस्था अतिशय वाईट झाली.    डोळ्याखाली काळी वर्तुळे वगैरे... कळलं ना काय ते?  शेवटी जीव्ह्जला बोलावुन त्याचे ते फेमस रामबाण पेय बनवायला मला सांगावे लागले.

नाश्ता केल्यानंतर तर मला रेल्वे स्टेशनवरचा पॉकेटमार असल्यासारखे वाटायला लागले.  हॉलमधल्या टेबलावर पार्सल ठेवले जाण्याची वाट पाहात उगीचच रेंगाळत बसावे लागले आणि काही केल्या ते पार्सल ठेवले जाईना.  विलोबीकाका लायब्ररीमध्येच चिकटुन बसलेले.  बहुतेक त्यांच्या त्या बहुमोल कामावरुन शेवटचा हात फिरवीत असावेत.  माझ्यावर सोपवलेल्या कामाचा मी जितका विचार करत होतो तितके मला ते काम आवडेनासे होत होते.  घड्याळाच्या सरकत्या काट्याबरोबर माझा आत्मविश्वास ढासळत होता.  पकडला गेलो तर काय या विचाराने अंगाचा थरकाप उडत होता.  विलोबीकाका जरी शांत स्वभावाचे असले तरी ते खुप कडक होते आणि त्यांच्या सध्याच्या बहुमोल कामात खोडा घालताना त्यांनी जर मला पकडले असते तर माझी अजिबात खैर नव्हती.

साधारण चारच्या सुमारास काखेत पार्सल मारुन ते लायब्ररीबाहेर पडले; लुटूलुटू चालत त्यांनी ते पार्सल टेबलावर ठेवले आणि परत तसेच लायब्ररीत गडप झाले.  मी त्यावेळी साधारण आग्नेय दिशेला, टांगलेल्या एका चिखलतामागे दडलो होतो.   एका उडीत मी टेबल गाठले आणि लगेच लुट घेऊन वरच्या मजल्यावर प्रयाण केले.  माजलेल्या वळूसारखा मुसंडी मारत माझ्या खोलीत घुसलो आणि एडविनवर जवळजवळ आपटलोच.  तो नालायक माझे ड्रावर्स उघडुन आतले टाय उचकटत होता.

"हेलो!" तो म्हणाला.

"तू काय करतोयस इथे?"

"तुझी खोली आवरतोय.  माझे गेल्या शनवारचे सत्कृत्य."

"गेल्या शनवारचे!!"

"हो. मी आता फक्त पाच दिवस मागे आहे.  काल रात्रीपर्यंत मी सहा दिवस मागे होतो, पण आज सकाळी मी तुझे बुट पॉलिश केले."

"म्हणजे तो तु  ---- "

"हो.  तु पाहिलेस  का ते बुट? मला अचानक ते काम सुचले.  मी सकाळी इथे सहजच आलेलो.  तु नसताना  बर्कलेना ही खोली देण्यात आलेली.  ते आज सकाळी परत गेले.  म्हटले त्यांचे काही सामान चुकुन मागे राहिले असल्यास मला ते त्यांना पाठवुन देता येईल.   अशी खुप कामे मी केलेली आहेत."

"तुझ्यामुळे सग़ळ्यांना किती प्रचंड समाधान  मिळत असणार, मला कल्पना आहे."

ह्या हरामखोराला शक्य तितक्या लवकर इथुन कटवणे मला भाग होते.  पार्सल मी माझ्या पाठीमागे लपवलेले  होते आणि त्याला ते अजिबात दिसण्यासारखे  नव्हते.  पण दुसरे कोणी खोलीत येण्याआधी ते लपवण्यासाठी मला ड्रॉवरपर्यंत पोचणे भाग होते.

"मला काही खोली आवरण्याची गरज वाटत नाहीय."  मी म्हणालो.

"पण मला हे काम करायला आवडते.  मला अजिबात त्रास होत नाहीय या कामाचा."

"पण खोली ब-यापैकी आवरलेली आहे."

"पण मी अजुन छान आवरेन."

गोष्टी आता हाताबाहेर जाऊ पाहात होत्या.  त्या पोराचा खुन करण्याची मला अजिबात इच्छा नव्हती पण दुसरा काहीच इलाज नाही असे वाटायला लागले.  मी मेंदूवर  इतका ताण दिला  की तो अक्षरक्षः ताणाखाली हडबडला आणि त्यातुन एक कल्पना निघाली.

"याच्यापेक्षा जास्त चांगले काम तुझी वाट पाहतेय.  तो सिगार्सचा डब्बा पाहिलास.  तो खाली स्मोकिंग रुममध्ये घेऊन जा आणि त्यांची टोके कापायचे काम कर. मला खुप मदत होईल.  जा, पळ लवकर."

त्याला काम फारसे आवडलेले दिसले नाही पण तो एकदाचा कटला.  मी पार्सल ड्रॉवरमधे टाकले, चावी फिरवली, खिशात टाकली आणि सुटकेचा श्वास सोडला.    असेन मी थोडा बावळट पण म्हणुन काय?  आज मी एका मुलाला हातोहात फसवले होते.   मी परत खाली गेलो.  स्मोकिंग रुमच्या दारासमोरुन जात असताना एडविन अचानक दारात हजर झाला.  त्या क्षणी मला असे वाटले की त्याला खरेच सत्कृत्य करायचे असेल तर त्याने आत्महत्या करावी.

"मी टोके कातरतोय."

"कातर, कातर."

"तुला कशी कातरलेली आवडतात?  जराशीच की जरा जास्त?"

"मध्यम."

"ठिक आहे. मी तसेच करतो तर."

"नक्कीच."

 आणि आम्ही आमच्या कामांकडे वळलो.

*******************
ज्यांनी डिटेक्टिव कथा वगैरे चवीने वाचल्या आहेत ते एक गोष्ट अगदी आवर्जुन सांगतील की जगात सगळ्यात कठिण गोष्ट कोणती असेल तर ती खुन केल्यानंतर प्रेताची विल्हेवाट कशी लावावी ही.  मला आठवतेय, लहानपणी मला एक कविता पाठ करावी लागलेली ज्यात युजिन अ‍ॅरम नावाच्या एक माणसावर हे काम कठिण काम येऊन पडलेले.  मुळ कवितेतले मला फक्त एवढेच आठवतेय -

       'टम टम, टम टम, टम टमी टम.
       मी त्याला संपवले, टम टम टम!' 

पण मला लख्ख आठवतेय की त्या बिचा-या अ‍ॅरमचा बहुमोल वे़ळ ते प्रेत विल्हेवाट लावण्यासाठी पाण्यात टाकण्यात किंवा  जमिनीत पुरण्यात गेला आणि दरवेळी ते प्रेत  परत त्याच्यासमोर दत्त म्हणुन उभे राहात गेले.  पार्सल ड्रॉवरमध्ये टाकल्यानंतर तासाभरात माझ्यासमोर हाच प्रश्न दत्त म्हणुन उभा राहिला.

फ्लॉरेन्सने हस्तलिखित नष्ट कर असे नुसते म्हटलेले.  पण प्रत्यक्षात ती वेळ आल्यावर मला कळेना की भर उन्हाळ्यात एवढे मोठे बाड कोणा दुस-याच्या घरात बसुन मी नष्ट तरी कसे करु?  उन्हाळा असल्याने मी माझ्या खोलीत शेकोटीची व्यवस्था करुन घेऊ शकत नव्हतो.  आणि जर ते कागद जाळू शकलो नाही तर मग ते नष्ट तरी कसे करु?  युद्धभुमीवर आपली कागदपत्रे शत्रुच्या हाती लागु नयेत म्हणुन सैनिक ती खाऊन टाकत  असे मी खुप ऐकलेले.  पण विलोबीकाकांच्या आठवणींचा साठा खाऊन नष्ट करायला मला कमीतकमी एक वर्ष तरी लागले असते.

मला मान्य करायलाच हवे की ते बाड कसे नष्ट करावे हे मला उमजेना.  शेवटी ते बाड तसेच ड्रॉवरमध्ये पडू द्यायचे आणि जे होईल ते पाहात बसायचे असे मी ठरवले. 

तुम्हाला माहित आहे का ते माहित नाही पण कुठल्याही अपराधाचे ओझे आपल्या विवेकबुद्धीवर घेऊन जगणे खुप कठिण आहे.  संध्याकाळपर्यंत तो ड्रॉवर मला नजरेसमोरही नको असे वाटायला लागले.  कुठल्याही लहानसहान गोष्टींनी मी दचकु लागलो.  स्मोकिंगरुममध्ये बसलो असताना विलोबीकाका मागुन येऊन माझ्याशी काहितरी बोलले तेव्हा तर मी दचकुन तिन ताड उडालो.

हस्तलिखित हरवले हे काकांच्या लक्षात कधी आणि कसे येईन हाच विचार माझ्या डोक्यात कायम घोळत राहिला.  माझ्या मते शनिवार सकाळपर्यंत त्यांना काहीही कळाले नसते कारण हस्तलिखित पोचल्याची पावती उलटडाकेने शनिवारी  मिळण्याची अपेक्षा त्यांनी ठेवलेली असणार.    पण शुक्रवारी दुपारनंतर ते लायब्ररीबाहेर आले आणि तिथुन जाणा-या मला त्यांनी बाजुला बोलावले.  ते अतिशय चिंताग्रस्त दिसत होते.

"बर्टी," ते म्हणाले - ते बोलताना कायम काहीतरी महत्वाची गोष्ट सांगितल्यासारखे बोलत - "एक अतिशय गंभीर अशी घटना घडली आहे.  काल दुपारी मी माझे हस्तलिखित रिग्स आणि बॅलिन्जरना पाठवले.  आज सकाळच्या डाकेने ते त्याना मिळायला हवे होते.  मला का असे वाटत होते माहीत नाही पण पार्सलसंबंधी काहीतरी गडबड होणार असे मला सतत आतुन वाटत होते.  म्हणुन मी आत्ताच त्यांना चौकशीचा फोन केला आणि काय सांगु तुला,  त्यांना ते पार्सल अजुन मिळालेच  नाही असे ते म्हणाले."

"कमाल आहे!"

"मला स्पष्ट आठवतेय की मी ते पार्सल इथे हॉलमध्ये टेबलावर आणुन ठेवले होते आणि तेही पत्रे पोस्टऑफिसात घेऊन जायच्या वेळेच्या ब-याच आधी.  आणि इथेच कुठेतरी पाणी मुरतेय.  मी ओकशॉटशीही बोललो.  तो बाकीची पत्रे पोस्टात घेऊन गेला पण त्याला कुठलेही पार्सल पाहिलेले आठवत नाही असे तो म्हणतोय.  त्याच्या मते तो जेव्हा पत्रे घ्यायला हॉलमध्ये गेला तेव्हा तिथे कुठलेही पार्सल नव्हते."

"ही तर खरोखरच कमाल झाली!!"

"बर्टी,  मला काय संशय येतोय हे सांगु का?

"कसला?"

"मला ज्याचा संशय येतोय त्यावर तु अर्थातच विश्वास ठेवणार नाहीस पण माझी पुर्ण खात्री आहे की ते पार्सल चोरीला गेलेय."

"अरे बापरे!  खरे की काय?"

"थांब! मध्ये बोलु नकोस.  मला पुर्ण करु दे.  मी जरी तुला काही सांगितले नाही तरी माझ्या लक्षात आलेय की गेल्या काही दिवसात घरातील वस्तु नाहिशा होताहेत.  काही किंमती, तर काही साध्या.  माझी पुर्ण खात्री झालीय की आपल्या घरामध्ये कोणीतरी क्लेप्टोमॅनियॅक राहतोय.  तुला कदाचित माहित असेल की क्लेप्टोमॅनिअ‍ॅकची ही खासियत आहे की त्याला माहित नसते की त्याच्या हातुन चोरी होतेय ते आणि तो काय चोरतोय हेही त्याला माहित नसते.  एखादा जुना कोट तो जितक्या आत्मियतेने चोरेल तितक्याच आत्मियतेने तो हि-याची अंगठीही चोरेल.  मातीमोल किमतीचा  तंबाखुचा पाईप जितक्या सफाईने चोरेल तितक्याच सफाईने दागिन्याची पेटीही उडवेल.  माझे हस्तलिखित तसे कोणाच्याही कामाचे नाही हे लक्षात घेता माझी खात्री आहे की -----"

"पण काका,  एक मिनिट.  तुम्ही ज्या वस्तु चोरीला गेल्यात म्हणताहात त्या मला माहित आहेत.  माझा नोकर मिडोज हे चोरीचे काम करत होता. माझे रेशमी मोजे चोरताना मी त्याला रंगेहात पकडले."

काका अतिशय उत्साहित झाल्यासारखे वाटले.

"तु किती हुशार आहेस, बर्टी.  लगेच बोलाव त्याला आणि विचार लगेच."

" पण तो आता इथे नाहीय.  त्याची ही सवय माझ्या लक्षात येताच मी त्याला डच्चू दिला आणि नवा नोकर ठेवला.  त्यासाठीच तर मी लंडनला गेलेलो."

"जर मिडोज घरातच नाहीय तर मग तो माझे हस्तलिखित कसे काय चोरणार?   हा प्रश्न आता खुपच गुंतागुंतीचा होत चाललाय."

यानंतर आम्ही अजुन थोडा वेळ या विषयावर चिंतन केले.  विलोबीकाका तोंडातल्या तोंडात पुटपुटत खोलीत येरझा-या घालु लागले आणि मी एका कोप-यात सिगरेट फुंकत बसलो.  मला सतत मी वाचलेल्या एका गोष्टीतल्या माणसासारखे वाटत होते जो खुन करुन प्रेत डायनिंग टेबलाखाली लपवतो आणि नंतर ते प्रेत तिथेच लपवलेले असताना तिथे झालेल्या एका डायनिंग पार्टीत अगदी उत्साहाने भाग घेतो.   माझा अपराधगंड मला इतका छळू लागला की मी शेवटी अजुन एक सिगारेट पेटवुन बाहेर बागेत जाऊन येरझा-या मारायला लागलो.

उन्हाळ्यातली ती एक अतिशय शांत संध्याकाळ होती. इतकी शांत की एखाद्या गोगलगाय जरी  खाकरली तरी  मैलभर आवाज ऐकु जाईल.   सुर्य पार दुर तिकडे टेकडीमागे बुडत होता,  चिलटांची नेहमीची लगबग चालु होती,  हवेत एक सुखद गारवा पसरत होता  आणि एकुण वातावरण अतिशय प्रसन्न होते.  या अशा हवेत मलाही थोडे बरे वाटु लागत होते तोच माझे नाव घेतलेले माझ्या कानावर पडले.

"बर्टीबद्दल सांगायचे होते."

हा आवाज त्या तिरस्करणीय एडविनचा होता.   मला क्षणभर कळेना की आवाज कुठुन येतोय ते.  नंतर लक्षात आले की चालत चालत मी लायब्ररीच्या खिडकीजवळ येऊन पोहोचलेलो. 

सामान्य माणसाला ज्या गोष्टी करायला साधारण दहा मिनिटे तरी लागतील त्या गोष्टी कथेतले हिरो निमिषार्धात कसे काय करतात हा प्रश्न मला नेहमी पडायचा.  मात्र माझ्यावर प्रसंग येताच निमिषार्धात मी सिगारेट फेकुन दिली,  तोंडातल्या तोंडात एक शिवी हासडली,  कमीतकमी दहा यार्डभर अंतर दोन उड्यात पार केले आणि लायब्ररीच्या खिडकीखालील झुडपात स्वतःला लपवुन कान देऊन आतले संभाषण ऐकु लागलो.  माझ्याबद्दल शक्य तितके वाईट ऐकायला मिळणार यात तिळमात्रही शंका नव्हती.

"बर्टीबद्दल?"  विलोबीकाकांना विचारताना मी ऐकले.

"बर्टी आणि तुमचा पार्सलबद्दल.  तुम्हाला त्याच्याशी बोलताना मी नुकतेच  ऐकले.  माझी खात्री आहे की ते त्याच्याकडे आहे."

 जर मी तुम्हाला सांगितले की नेमके हे वाक्य ऐकत असताना एक मोठा किडा  झुडपावरुन माझ्या मानेवर पडला आणि तिथुन घसरत तो माझ्या पाठीवर जाऊ लागला आणि तरीही काहीही हालचाल करण्याची ताकद माझ्यात राहिली नाही, तर तुमच्या लक्षात येईल माझी परिस्थिती किती वाईट झालेली ते.  असे वाटत होते की सगळे जगच माझ्याविरुद्ध कट करायला लागलेले.

"तुला काय म्हणायचे आहे, मुला? मी आत्ताच त्याच्याशी पार्सल गडप झाल्याबद्दल बोलत होतो आणि त्याने असे भासवले की तोही या प्रकरणाने माझ्याइतकाच गोंधळून गेलाय."

"मी काल दुपारी त्याच्या खोलीत, त्याच्यासाठी एक सत्कृत्य करत होतो आणि तेव्हा तो एक पार्सल घेऊन तेथे आला.  त्याने ते पाठीमागे लपवलेले पण मी ते बरोब्बर पाहिले.  मग त्याने मला स्मोकिंग रुममध्ये जाऊन सिगार्सची टोके कातरायला सांगितले.  दोन मिनिटातच तो परत खाली आला तेव्हा त्याच्या हातात पार्सल नव्हते.  म्हणजे ते त्याच्या खोलीतच असायला हवे."

बॉय स्कॉउट्सना निरिक्षण आणि अनुमान आणि काय काय कसे करायचे ह्याचे अगदी खोलात जाऊन शिक्षण देतात असे मी ऐकलेले.  हा असला अभ्यासक्रम  मुलांना शिकवणे अतिशय अविचारी आहे हे माझे मत आहे.  हे बघा त्याचे परिणाम!

"मला खरे नाही वाटत."  विलोबीकाकांच्या ह्या उद्गारांनी माझ्या जीवात थोडा जीव आला.

"मी जाउन त्याच्या खोलीत पाहुन येऊ काय?"  अतिशहाण्या एडविनने विचारले.

"पण तो कशाला ह्या असल्या भानगडीत पडेल?"

"कदाचित तो --- ते  असेल --  तुम्ही आत्ता काहीतरी म्हणालेलात ना?"

"क्लेप्टोमॅनिअ‍ॅक?? छे छे!!"

"कदाचित बर्टीच आधीपासुन इथल्या वस्तु चोरत असेल, तो कदाचित रॅफल्ससारखा असेल."

"रॅफल्स??"

"एका पुस्तकात आहे तो,  चो-या करत फिरत असतो."

"बर्टी अशा - अशा   चो-या करत फिरत असेल असे मला नाही वाटत."

"ठिक.  पण माझी खात्री आहे की पार्सल त्याच्याकडेच आहे.  मी सांगतो तुम्ही काय करा ते.  तुम्ही सांगा की मिस्टर बर्कलेंची तार आलेली की त्यांचे काहीतरी राहिलेय म्हणुन.  तो नसताना बर्कले राहात होते त्याच्या खोलीत. आणि मग त्या निमित्ताने तुम्ही त्याची खोली तपासा."

"हे करता येण्यासारखे आहे.  मी -----"

पुढचे ऐकायला मी तिथे थांबलो नाही.  गोष्टी अतिशय वेगाने हाताबाहेर जात होत्या.  मी आवाज न करता झुडपातुन बाहेर पडलो,  तिथुन धावतच पुढच्या दरवाजाकडे गेलो,  तिथुन वायुवेगाने माझी खोली आणि तिथुन ज्या ड्रॉवरमध्ये मी पार्सल ठेवलेले तिथे पोचलो.  आणि तेव्हा माझ्या लक्षात आले की माझ्याकडे चावीच नाहीय.  चावी कुठे असेल यावर बराच वेळ डोकेफोड केल्यावर लक्षात आले की आदल्या रात्री मी चावी पँटीच्या खिशात टाकलेली आणि नंतर ती तिथुन काढुन घ्यायची राहुन गेली.

देवा, माझे रात्रीचे कपडे मी कुठे ठेवले?  संपुर्ण खोली पालथी घातल्यावर मला आठवले की मी ते ब्रशिंगसाठी जिव्ह्सला दिले होते.  आता फक्त बेल दाबायची खोटी की तो आलाच.  मी बेल दाबतच होतो तेवढ्यात बाहेर पावलांचा आवाज आला आणि दार उघडुन विलोबीकाका आत आले. 

"अरे, बर्टी !!" अजिबात न गोंधळता ते म्हणाले," मी --- मला आत्ताच बर्कलेची तार आली.  तु नसताना तो तुझ्या खोलीत राहिलेला.  त्याची तार आली की तो त्याची--- त्याची  सिगारेटकेस इथे विसरलाय बहुतेक.  मी खाली शोधली पण सापडली नाही.  म्हणुन मी तुझ्या खोलीत आलो शोधायला.  मी -- मी जरा बघतो कुठे सापडते का ते."

काय लाजिरवाणे दृष्य होते ते -  अर्ध्या गोव-या स्मशानात गेलेला हा म्हातारा,  आपल्या उरलेल्या दिवसांची चिंता करायची सोडुन एखाद्या कसलेल्या नटासारखा धडधडीत खोटे बोलत माझ्यासमोर उभा होता.

"मी तरी कुठे पाहिली नाही."  मी म्हणालो. 

"तरीही,  मी शोधतो.  मला शोधायलाच हवी. "

"इथे असती तर मला नक्कीच दिसली असती ना?"

"तुझ्या लक्षात नसेल आली.  कदाचित ती एखाद्या --  एखाद्या ड्रॉवरमध्ये राहिली असेल."

आणि काका शोधाशोध करु लागले. 

एखाद्या शिकारी कुत्र्यासारखा वास घेत ते ड्रॉवरमागुन ड्रॉवर उघडत होते आणि तोंडाने उगीच बर्कले आणि त्याच्या सिगरेटकेसबद्दल बडबडत होते.  जे चाललेले  ते पाहात मी कणाकणाने संपत होतो. 

सरतेशेवटी ज्यात पार्सल होते त्या ड्रॉवरपाशी ते आले.

"ह्याला बहुतेक चावी केलीय."  ड्रॉवरची मुठ खेचत ते म्हणाले. 

"त्याला राहुदे, त्याला राहुदे.  त्याला चावी केलीय.  उगीच कशाला वेळ घालवता त्याच्यावर."

"तुझ्याकडे चावी असेल ना?"

माझ्या मागुन एक कोमल, अदबशीर आवाज आला, "सर,  तुम्हाला बहुतेक ही चावी हवीय.  तुमच्या काल रात्रीच्या पँटीच्या खिशात ही होती."

जीव्हज अवतिर्ण झाला होता,  माझे काल संध्याकाळचे कपडे तो घेऊन आला होता आणि त्याच्या हातात ती चावी होती.  आईशप्पथ,  त्याचा गळा घोटण्याची अनिवार इच्छा मला झाली.

"धन्यवाद."  काका म्हणाले.

"कसचे कसचे , सर."

पुढच्या क्षणी काकांनी ड्रॉवर उघडला आणि मी डोळे मिटुन घेतले. 

"नाही,"  काका म्हणत होते, " या ड्रॉवरमध्ये तर काहीच नाही.  हा तर रिकामा आहे.  धन्यवाद बर्टी.  मी तुला फारसा त्रास दिला नसेल अशी आशा आहे.  मला वाटते  बर्कले.... बर्कलेने त्याची केस बहुतेक सोबत नेलेली असणार."

ते गेल्यानंतर मी दरवाजा काळजीपुर्वक लावून घेतला.  नंतर मी जीव्हजकडे वळलो.  तो माझे संध्याकाळचे कपडे खुर्चीवर नीट लावत होता.

"अं.. जीव्ह्ज!"

"सर?"

"काही नाही!"

कुठुन सुरवात करावी ते मला सुचेना.

अं... जीव्ह्स!"

"सर?"

"तु --  त्या तिथले --  तुच तर नाही ना ---- "

"मी ते पार्सल आज सकाळी तिथुन हलवले सर."

"ओह -   आह  -  का?"

"मला ते उचित वाटले सर."

मी थोडा विचारात पडलो.

"अर्थात, हे सगळे काय चालले आहे असे तुला वाटत असेल,  नाही?"

"नाही सर.  तुमचे आणि लेडी फ्लॉरेन्सचे त्या संध्याकाळचे बोलणे माझ्या कानावर पडलेले सर."

"तु ऐकलेस, खरेच?"

"हो सर."

"मग .. अं --- जीव्हज, मला वाटते  आता....  आता जर तू  --  म्हणजे आपण लंडनला जाईतो ते पार्सल 
तुझ्याकडेच -- समजले ना?"

"हो, सर."

"आणि मग आपण --  मग बघुया -  त्याचे काय करायचे ते मग बघुया. काय?"

"अगदी बरोबर, सर."

"मी मग ते तुझ्यावरच सोपवतो."

"पुर्णपणे, सर."

"जीव्ह्स, तुला माहित आहे तु किती हुशार आहेस ते?"

"मी पुरेपुर सेवा द्यायचा प्रयत्न करतो सर."

"लाखात एक,  खरेच!"

"तुमची कृपा, सर!"

"मग,  ठिक आहे तर,  मला वाटते."

"ठिक सर."

**********


फ्लॉरेन्स सोमवारी परतली.  पण दुपारच्या चहाच्या वेळेपर्यंत आम्ही भेटू शकलो नाही.  चहानंतर माणसे थोडी पांगली तेव्हा कुठे आम्हाला एकांत मिळाला.

"मग, बर्टी?"  ती म्हणाली.

"ठिक ठिक..."

"हस्तलिखित नष्ट केले?"

"म्हणजे केलेच असे नाही, पण...."

"म्हणजे?"

"म्हणजे मी तसे केलेय पण अजुन केले नाहीय."

"बर्टी,  तु काहीतरी लपवतोयस!"

"अगं तसं काहीच नाही,  म्हणजे असे बघ------"

मी तिला काय काय झाले ते सांगायला सुरवात करत होतोच तेवढ्यात लायब्ररीतुन विलोबीकाका धावत बाहेर आहे.  चेह-यावर अगदी लहान मुलासारखा आनंद झळकत होता.

"अहो आश्चर्यम, बर्टी, अहो आश्चर्यम!!!.  मी आताच रिग्सला फोन लावलेला आणि मला काय ऐकायला मिळाले असेल असे तुला वाटते?  अरे, माझे हस्तलिखित आज सकाळच्या डाकेने त्यांना मिळाले!   देव जाणे ते पार्सल पोचायला एवढा उशीर का झाला.   पोस्टाचा कारभार दिवसेदिवस ढिसाळ होऊ लागला आहे.  मी लवकरच त्यांच्या हेड ऑफिसला पत्र लिहुन तक्रार करणार आहे.  महत्वाची कागदपत्रं अशी उशीराने पोचतात म्हणजे काय?"

यादरम्यान मी  फ्लॉरेन्सकडेच पाहात होतो आणि अचानक  तिने गरकन वळून माझ्याकडे अशा नजरेने पाहिले की ती नजर माझे काळीजच जणू चिरत गेली.

बोलून झाल्यावर विलोबीकाका लायब्ररीत परतले आणि आम्ही दोघे जिथे होतो तिथे स्मशानशांतता का काय म्हणतात ती  पसरली .

"मला काहीच कळत नाही."  सरतेशेवटी मी उद्गारलो. " मला काहीच कळत नाहीये."

"पण मला सगळे कळून चुकलेय, बर्टी.  तु भेकडासारखी माघार घेतलीस.  काकांचा रोष ओढवुन घेण्याऐवजी तुला ------"

"नाही! नाही!  तसे अजिबात नाही!"

"पैसे गमावण्यापेक्षा मला गमावणे तुला जास्त सोयीचे वाटले.  कदाचित मी माझे शब्द खरे करणार नाही असे तुला वाटले असेल.  पण मी माझ्या शब्दांवर ठाम आहे.  आपले लग्न मोडले!"

"पण--  मी काय म्हणतो--"

"एक शब्दही बोलू नकोस."

"फ्लॉरेन्स,  ऐक ना!"

"मला काहीही ऐकायचे नाही.  तुझी अ‍ॅगाथामावशीचेच बरोबर होती.  माझी थोडक्यात सुटका झाली म्हणायची . मला वाटलेले नेटाने प्रयत्न करुन मी तुला थोडेफार सुधारु शकेन.  पण नाही. आता कळतेय की तुला सुधारणे अशक्य आहे."

आणि  माझे  हृदय शतशः विदीर्ण करत ती तिथुन निघुन गेली.  थोड्या वेळाने मी हृदयाचे तुकडे कसेबसे गोळा करुन माझ्या खोलीत गेलो आणि जीव्हजसाठी बेल वाजवली.  तो अगदी नेहमी येतो तसाच आला.  जणु इतक्यात इथे काही झालेलेच नव्हते आणि घडणारही नव्हते. 

"जीव्हज!"  मी किंचाळलो, " जीव्हज,  ते पार्सल लंडनला पोचले."

"होका, सर?"

"तु ते पाठवलेस?"

"हो सर.  मी उचित तेच केले सर.  मला वाटते लेडी फ्लॉरेन्स आणि तुम्ही सर विलोबींच्या आठवणी वाचुन लोकांना काय वाटेल याचा उगीचच मोठा बाऊ करताहात.  माझा अनुभव सांगतो की लोकांना त्यांचे नाव छापुन आलेले पाहायला आवडते, मग भले ते कशाही संदर्भात का असेना.  माझी एक मावशी होती जिचे पाय खूप सुजायचे.  तिने वॉकिनशॉचे मलम वापरले आणि तिला खुप आराम पडला.  ती त्या मलमाने एवढी प्रभावित झाली की तिने चक्क पत्र लिहुन त्यांचे आभार मानले.  त्यानंतर त्या मलमाच्या जाहिरातीतला तिचा फोटो आणि सोबत मलम लावण्याआधीच्या तिच्या पायांच्या ओंगळवाण्या स्थितीचे वर्णन वाचुन तिचा उर अभिमानाने भरुन यायचा.  ते पाहुन माझी खात्री पटली की प्रसिद्धी मिळणे माणसाला खुप अभिमानाचे वाटते,  प्रसिद्धीचे कारण दुय्यम ठरते.  शिवाय तुम्ही जर मानसशास्त्राचा अभ्यास केला असेल तर तुमच्या लक्षात येईल की म्हातारे होईतो खुप नाव आणि आदर कमावलेल्या लोकांना त्यांच्या तरुणपणी ते किती वाया गेलेले होते याची जाहिरात करण्यात खुप सौख्य लाभते.  माझे एक काका होते ------"

मी त्याच्या सगळ्या मावश्या, मामा, काका, त्याला आणि एकुण कुटूंबाला शक्य तितक्या शिव्या घातल्या.

"तुला माहिताय की लेडी फ्लॉरेन्सने लग्न मोडले?"

"खरेच, सर?"

थोडी तरी सहानुभूती?  छे!   जणु मी काही खुशखबरच देतोय.

"चालता हो.  उद्यापासुन कामावर येऊ नकोस."

"उत्तम, सर."

तो किंचित खाकरला. 

"मी आता तुमच्या सेवेत नसल्यामुळे मोकळेपणाने बोलू शकतो.  सर, तुम्ही आणि लेडी फ्लॉरेन्सची जोडी अजिबात अनुरुप नव्हती.  बाईसाहेबांचा स्वभाव अतिशय हट्टी आणि एककल्ली आहे, जो तुमच्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध असा आहे.  मी जवळजवळ वर्षभर लॉर्ड वॉर्प्लस्डॉनच्या सेवेत होतो आणि त्या काळात बाईसाहेबांच्या स्वभावाचा बारकाईने अभ्यास करायच्या भरपुर संधी मला मिळाल्या.  बाईसाहेबांबद्दल नोकरवर्गाचे मत चांगले नव्हते.  त्यांच्या लहरी स्वभावाचा सगळ्यांनी धसका घेतला होता आणि खासगीत त्यावर भरपुर टीकाही होत असे.  तुम्ही त्यांचे अजिबात जुळले नसते, सर."
 
"आधी चालता हो!"
 
"आणि त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीही तुम्हाला खुप जड गेल्या असत्या, सर.  बाईसाहेबांनी तुम्हाला दिलेले पुस्तक - आपण परतल्यापासुन ते तसेच टेबलावर पडलेय -  मी उगीचच चाळले.  माझ्या मते ते पुस्तक तुमच्या डोक्यावरुन जाणारे आहे.   तुम्हाला ते अजिबात झेपणार नाही.  आणि बाईसाहेबांच्या सेविकेकडुन मी असे ऐकलेय की लवकरच त्या निट्झेही सुरू करणार होत्या.  सेविकेने बाईसाहेब आणि इथे आलेले  मि. मॅक्स्वेल यांच्यातले यासंदर्भातले संभाषण ऐकले होते.  हे मि. मॅक्स्वेल एका वृत्तपत्रात अग्रलेख विभागात काम करतात.  तुम्हाला निट्झे अजिबात आवडला नसता सर.  तो माणुस मुळापासुनच बिघडलेला आहे."
 
"चालता हो!!!"
 
"अतिउत्तम, सर."
 
**********

किती विचित्र आहे ना की जसजसा काळ लोटतो तसतसे एखाद्या गोष्टीबद्दलचे आपले मत बदलु लागते.   माझे तर असे कित्येकदा झालेले आहे.  आता का ते माहित नाही, पण सकाळी उठल्यानंतर काल भंगलेल्या हृदयाच्या कळा तितक्याश्या जाणवेनाश्या झाल्या.   उजाडलेला दिवस अगदी उत्तम असा दिवस होता.   आणि मग खिडकीतुन येणा-या सोनेरी किरणांची जादू की खिडकीबाहेर चाललेली पक्ष्यांची मंजुळ किलबील,  नक्की कशाने ते माहित नाही पण मला वाटायला लागले की जीव्हजचे बरोबर असणार बहुतेक.
 
सरतेशेवटी,  केवळ सौंदर्यावर भाळून मी तिच्या प्रेमात पडलो हे किती बरोबर किंवा चूक? जीव्हजने तिच्या स्वभावाबद्दल जे उद्गार काढले तेही खरे नव्हते काय?   मला वाटायला लागले की माझी होणारी बायको मला खुप वेगळी हवीय,  माझ्यावर विसंबणारी,  माझ्या अवतीभवती बागडणारी  आणि बरेच काही.
 
मी यावर अजुन थोडा विचार करत होतो तेवढ्यात माझे लक्ष "नैतिकतेचे प्रकार" वर पडले.  मी सहजच ते हातात घेतले आणि शप्पथ सांगतो,  नेमके हे पान उघडले.
 
ग्रीक तत्वज्ञानामधल्या दोन परस्परविरोधी बाबीपैकी फक्त योग्य आदर्श विचार ही एकच खरी आणि टिकावू आहे ज्याविरोधी दुसरी ही लादु आणि बदलू पाहणारी अशी आहे.  अर्थात आपला नैसर्गिक कल लक्षात घेता, ही दुसरी इंद्रियगोचर, अवास्तव, कसलाही स्थिर पाया नसलेली,    क्षणभरही टिकेल असे कुठलेही विधेयक नसलेली अशी आहे.  थोडक्यात कधीही पुर्तता  न होऊ शकणा-या शक्यतांवर ही उभारलेली आहे."
 
"जीव्हज,"  माझा सकाळचा चहा घेऊन तो येताच मी म्हटले, " मी थोडा विचार करत होतो.  तुला मी परत घेतोय."
 
"आभारी आहे, सर."
 
मी दोनचार सुंदर घोट घेतले.  प्रत्येक घोटानिशी या माणसाच्या निर्णयक्षमतेबद्दल माझा आदर बळावत होता.
 
"जीव्ह्स,  त्या चेक्सच्या सुटबद्दल बोलायचे होते."
 
"सर?"
 
"तो खरेच का इतका वाईट आहे?"
 
"माझ्या मते जरा जास्तच भडक आहे, सर."
 
"पण खुपजणांनी त्याच्या शिंप्याची चौकशीही केली होती."
 
"अर्थात त्याच्याकडे चुकुनही न जाण्यासाठीच असणार."
 
"पण तो लंडनमधला सगळ्यात उत्तम असा सद्गृहस्थ आहे."
 
"त्याच्या चारित्र्याबद्दल मी काहीच बोलत नाहीये सर."
 
मला क्षणभर काय करावे ते कळेना.  मी अलगद या माणसाच्या कह्यात जातोय आणि काही कळायच्या आत माझी अवस्था ऑब्रे फॉदरगिलसारखी होईल यात काहीच संशय नव्हता.   त्याचवेळी हेही खरे होते की  हा माणुस अतिशय कुशाग्र बुद्धीमत्ता असलेला एक विरळा नमुना होता आणि त्याच्या सल्ल्याने चालल्यास आयुष्य अतिशय सोपे गेले असते.
 
मी क्षणात निर्णय घेतला.
 
"ठिक आहे तर मग," "मी म्हणालो, "देऊन टाक तो फालतु कोट कोणालातरी."
 
आपल्या लहरी मुलाकडे प्रेमाने पाहणा-या बापाच्या नजरेने माझ्याकडे पाहात तो म्हणाला, "आभारी आहे, सर.  मी काल रात्रीच तो माळ्याच्या पो-याला देऊन टाकला.  अजुन थोडा चहा घेणार का, सर?"

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लघु अजान वृक्ष - Ehretia Laevis

गारंबीची बी

फाईकस लाइरटा Ficus lyrata

बालपणीचा काळ सुखाचा.........

अडुळसा Justicia Adhatoda

मग मी मूर्ख कसा?