नि:शंक - मायबोलीवरून
मायबोलीवर वाचताना बहुतेक वेळा माझ्याकडून लेखकाचे नाव आधी पाहिले जाते. नंतर लेखन प्रकार पाहिला जातो. मग हाती असलेल्या वेळानुसार याआधी ज्यांचे लिखाण वाचलेय आणि आवडलेय अशांचे वाचले जाते.
कधीतरी सहज म्हणून पण काहीतरी वाचले जाते. लेखनप्रकार गजल किंवा कविता असेल तर सहसा उघडले जात नाही. पण ललित असेल आणि शीर्षक थोडे वेगळे वाटले तर कधीकधी उघडले जाते.
"नि:शंक" हे नाव शीर्षक वाचून काही बोध होईना. बघू तरी काय आहे हे ललित म्हणून लेख उघडला.
पहिले दोन तीन तुकडे वाचून काहीतरी प्रेमाचे आहे असे वाटले आणि मधले सोडत भरभर खाली आले. प्रेमाचे काहीतरी वाचायचा आता कंटाळा आलाय. म्हणजे लिहिणा-यांनी लिहू नये असे काही नाही. काही जण खरेच चांगले लिहितात. पण मी आता ते वाचायच्या कक्षेतून बाहेर आलेय बहुतेक. प्रेमाच्या गोड गोड गोष्टी वाचताना मला त्यानंतरच्या कडू कडू गोष्टी जास्त आठवायला लागतात. आणि मग ते सगळेच हास्यास्पद होऊन जाते माझ्यासाठी.
म्हणुन मग मधला मोठा भाग वाचलाच नाही आणि तसेच शेवटाला पोचले. शेवटीही वर एकदा आधी आलेले एक गोड वाक्य होते. त्यामुळे पुर्ण गोष्ट तशीच मधुमेही गोड असणार असा मनाशी अंदाज बांधत खाली असलेल्या दोन चार प्रतिक्रियांवर उडती नजर फिरवली.
एका प्रतिक्रियेवर मात्र अडखळले. प्रतिक्रियेत वरचे काहीतरी कॉपी पेस्ट केलेले. ते वाचून धक्का बसला. हे इतके सुंदर कुठे लिहिलेय? मला कसे दिसले नाही? परत वर गेले आणि एकेक वाक्य वाचून काढले.
बापरे, कसले भन्नाट लिहिलेले लेखकाने.
"ते बघ आपले पाणी, खालून किती अमर्याद विशाल वाटते, पण इथून त्याची सीमा स्पष्ट दिसतेय. ती देवदाराची झाडे...काठावरून दूरवर म्हणून इवली दिसतात...पण वरून त्यांची इतरांपेक्षा कितीतरी जास्त पटीने असलेली उंची कळते आहे. सगळा खेळ आहे तो आपल्या दृष्टीच्या मर्यादेचा...मग ती लौकिक असो वा अलौकिक. हे ज्ञान ज्ञान म्हणून जो जयघोष चालतो ते तरी पूर्णार्थाने कोणा शहाण्याला कळले आहे? हजारो वर्षांपूर्वी काही पूर्वपीठीका होत्या, आज काही जुन्या पुसून नव्या बनत आहेत, उद्या काही तिसरेच उजेडात येईल आणि आतापर्यंतचे सारे विसरले जाईल. हे सर्व "आहे", हा वर्तमान खरा कारण भूत वाहून गेलाय आणि भविष्याला पाहणारी नजर माणसाकडे तरी नाही.
तेव्हा.... कशासाठी आहे आणि काय नाही पेक्षा आहे म्हणून त्याचा उत्सव कर. एका तुटपुंज्या आयुष्यात इतके घडले तरी पुरे आहे."
वाचून थक्क झाले आणि परत परत दोनचारदा वाचले. माझ्या डोळ्यावरचा पडदाही विरतोय आणि समोरचे लख्ख दिसतेय असे वाटायला लागले.
कधीकधी असे काहीतरी अप्रतिम वाचायला मिळते.
इथे वाचा - http://www.maayboli.com/node/53772
टिप्पण्या