सुभाषितमाला



लभेत सिकतासु तैलमपि यत्नतः पीडयन्
पिबेच्च मृगतृष्णिकासु सलिलं पिपासार्दितः।
कदाचिदपि पर्यटञ्छशविषाणमासादयेन्
न तु प्रतिनिविष्टमूर्खजनचित्तमाराधयेत्॥

                               नीतीशतक,  राजा भर्तृहरी.

{राजा भर्तृहरिकृत नीतीशतक मूर्खपद्धति विषयविभाग.}

वृत्त : पृथ्वी

अर्थ :-

              (मनुष्याने एकवेळ) प्रयत्नपूर्वक वाळू रगडली अथवा पिळली तर त्यातून कदाचित तेलही मिळेल, (अथवा) तहानेने व्याकूळ झालेला माणूस आपली तहान मृगजळाच्या पाण्याने देखील भागवू शकेल, वणवण भटकणार्‍या (एखाद्याला) फिरतां फिरतां चुकून कदाचित सशाचें शिंगसुद्धां सापडेल. (इतक्या सर्व अशक्य गोष्टी वाटणार्‍या गोष्टीही कदाचित साध्य होतील) परन्तु पुर्वाग्रही, हट्टी, हेकट अश्या मूर्खाची समजूत घालणे मात्र (कधीही, कोणालाही) शक्य होणार नाही.


हे सुभाषित वाचताच मराठी बांधवांना वामनपंडिताने या श्लोकाचा मराठीत केलेला काव्यानुवाद लगेच आठवतो. तो म्हणजे, 'प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलहि गळे'.
   मूळ श्लोक भर्तृहरीने 'पृथ्वी' वृत्तात लिहिलेला असला तरी गंमत अशी की वामनपंडितांना काव्यानुवाद मात्र 'शिखरिणी' वृत्तात सुचला.
_प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलहि गळे |_
_तृषार्ताची तृष्णा मृगजळ पिऊनीहि वितळे_
_सशाचे दीसावे विपिन फिरता शृंगहि जरी।_
_परंतू मूर्खाचे हृदय धरवेना क्षणभरी॥_
              वामनपंडितांनी भर्तृहरीच्या श्लोकांची मराठी भाषांतरे केली आणि त्यांतून अनेक काव्यपंक्ती मराठी माणसाच्या ओठावर खेळू लागल्या. त्या आपण यथाकाल, यथाशक्य त्या त्या श्लोकाबरोबर संदर्भ देताना पहाणार आहोतच.

नीतीशतकातील हा श्लोक 'पृथ्वी' या अक्षरगणवृत्तामधे रचला गेला आहे.
गणक्रम : ज स ज स य लगा
लघुगुरूक्रम - लगाल ललगा लगाल ललगा लगागा लगा.
    याच 'पृथ्वी' वृत्तामध्ये मयूरपंताने मराठीत केकावली हे काव्य रचले आहे.


(संकलित)


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लघु अजान वृक्ष - Ehretia Laevis

गारंबीची बी

फाईकस लाइरटा Ficus lyrata

बालपणीचा काळ सुखाचा.........

अडुळसा Justicia Adhatoda

मग मी मूर्ख कसा?