बोरिवली नॅशनल पार्क - एक भेट

बोरिवली राष्ट्रीय उद्यानात शेवटचे गेल्याला 10 वर्षे तरी नक्कीच झाली असावीत. तिथे जायला हवे असे अधून मधून वाटत असले तरी बेलापूर ते बोरिवली अंतर लक्षात घेता ते वाटणे कायम मागे पडत गेले.

यावर्षी सुट्टीत मावसबहिण राखी तिच्या कुटुंबासोबत माझ्याकडे राहायला आली.  मग शनिवार रविवार मुंबई दर्शन  चुकवायचे नाही असे ठरवून शनिवारी संध्याकाळी तिच्या नवऱ्याला विमानतळावर सोडायच्या निमित्ताने आम्ही पश्चिम उपनगरात आगमन करते झालो.  (कसे भारी वाटते ना वाचायला? नाहीतर पहिला अर्धा तास नव्या मुंबईत झुर्रर्रर्रर्रकन व नंतरचा एक तास कुर्ल्याच्या ट्रॅफिकमध्ये क्लच ब्रेक करत गाडी चालवत, रस्त्यावरच्या लोकांना शिव्या घालत पारल्याला पोचलो हे किती बोरिंग वाटते वाचायला).

दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आज नॅशनल पार्कात जायचे हे घोषित केल्यावर लग्गेच 'तिकडे कशाला एवढ्या उन्हात? त्यापेक्षा इकडे अमुक्तमुक जागी जाऊ' वगैरे काथ्याकूट सुरू झाला.  आमच्याकडे असला काथ्याकूट एकदा सुरू झाला की फक्त मऊ कुटलेला काथ्या हाती लागतो, आमचे बुड घराबाहेर
 पडत नाही.

त्यामुळे त्या काथ्याकूटाकडे दुर्लक्ष केले. भराभर आवरून महत्वाच्या नातलगांची necessary evil भेट करून 11 च्या सुमारास घरी परतलो तेव्हा सैपाकिण बाईंनी मस्त चिकन शिजवून ठेवले होते.  आता जेवण तयार झालेच आहे तर जेवून जायचे का असा प्रश्न निर्माण होत असतानाच पुढचा धोका ओळखून आज वनभोजन करायचे हा प्रस्ताव मी मांडला व कुणी विरोधी सूर लावायच्या आधीच मी व शिल्पा भराभर चिकन डब्यात व ताटे पिशवीत भरायच्या कामी लागलो.  जर घरीच जेवलो असतो तर पुढचा कार्यक्रम पोटावर हात फिरवत हॉल मध्ये लोळत पडणे हाच असता.

तर, भराभर सामान घेऊन, पोराटोरांना सोबत घेऊन आमच्या दोन्ही टिम्स दोन गाड्यांतून निघाल्या.

 ट्रॅफिकमधून वाट काढत राष्ट्रीय उद्यानाच्या दारी पोचलो.  मुंबई दर वेळेस इतकी बदललेली दिसते ना! इतक्या वेळा त्या भागात जाऊनही मी चुकीचे वळण घेतले. ते सुधारून परत यु टर्न मारून पोचलो, तिकिटे काढली, आत गेलो व गाडी लावली तरी आमची टीम बी काही पोचायची लक्षणे दिसत नव्हती.  मग तो वेळ आजूबाजूला काय चाललंय हे पाहण्यात खर्ची घातला.

मुलांच्या उन्हाळी सुट्ट्या सुरू असताना पालकांच्या साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी सार्वजनीक स्थळी जी जत्रा भरलेली असते तशीच जत्रा राष्ट्रीय उद्यानात भरली होती.  जुन्या खुणा कुठे दिसताहेत का पाहण्यासाठी नजर भिरभिरत होती.  ते जुने मोकळे मैदान, बालपणी एकदा पिकनिकला आलो असता जिथे बॅटने टोलवलेला बॉल उकळत्या चहाच्या टोपात जाऊन पडलेला, त्या मैदानात सगळे पांढरे बगळे दिसत होते.  नीट निरखून पाहिले तेव्हा लक्षात आले की त्या मैदानात ब्रम्हकुमारी संस्थेचे मोठे शिबिर सुरू होते व आता जेवणाची वेळ झाल्याने शिबिरार्थी विखुरले होते.  पूर्ण मैदानावर त्यांनी कब्जा केल्याने तिथे जाऊन गतस्मृतींना उजाळा देत जेवण घेणे आता शक्य नव्हते.  म्हणून मग पुढे जाऊन गाड्या लावून जागा शोधायला निघालो. उद्यानात इतकी जागा असूनही कुठेही बसायला जागा नव्हती इतकी गर्दी होती.

बऱ्याच शोधाशोधीनंतर तलावाकिनारी एक चांगली जागा सापडली.  जागा सापडल्यावर लक्षात आले की आम्ही अंथरायला काहीही आणले नव्हते.  असो.  सगळे जेवण मध्ये ठेऊन आपापल्या चपलांवर बैठक मारली तोपर्यंत टीम बी सुद्धा दाखल झाली.


मग सगळ्यांनी भराभर चिकन व ब्रेडचा  आस्वाद घेतला.  आम्हाला जागा अगदी मस्त मिळाली होती.  सावली तर होतीच पण तलावाचे सुंदर दर्शन होत होते. टळटळीत उन्हात लोक बोटिंग करत होते.  आम्ही उगीच टीवल्याबावल्या करत वेळ काढला.


























तळ्याकाठी भरपूर टीपी करून झाल्यावर, उन्हे थोडी कलल्यावर आम्ही इकडे तिकडे फिरायचे मनावर घेतले.  रा.उ. मध्ये वनराणी, लायन सफारी वगैरे टाइम पासाचे उद्योग खूप आहेत, पण त्यात फारसा रस नव्हता. वनराणीत बसायचा विचार केला पण खूप गर्दी होती त्यामुळे गांधी स्मारकाकडे मोर्चा वळवला.  वरपर्यंत गाडी जाते पण थोडे खाल्लेले जिरुदे या उद्देशाने पायऱ्याकडे मोर्चा वळवला.  पण थोड्या वेळाने पायऱ्या सोडून उगीच दगडांवरून उड्या मारत ट्रेकिंगची हौस भागवत निघालो.  आमच्यासोबतच्या तरुण टीम अ ला या पायपीटीत रस नव्हता, ते गाडी घेऊन निघाले.

सुरवातीला हा एक प्रचंड वृक्ष दिसला, त्यावरून गुळवेलीच्या दोऱ्या खालीपर्यंत येऊन झोके घेत होत्या.

Tinospora cordifolia हे शास्त्रीय नाव असलेला गुळवेल खूप औषधी आहे.










हृदयाकृती पाने हे गुळवेलीचे वैशिष्टय.



हे वाकडेतिकडे खोड तिचेच, बाजूच्या वृक्षाच्या खोडाच्या आधाराने वर गेलीय.


याला अशी सुंदर फळे लागतात (फोटो रा.उ. मधला नाही)






गुळवेलीला वळसा घालून गांधी स्मारकाकडे निघालो



चालत जायचे असेल तर ह्या पायऱ्या वरपर्यंत सोबत करतात.

वर जाताना भरपूर वृक्ष भेटले.  हा बिवळा.  आजवर याला फक्त जंगलातच पाहिलेय.  Pterocarpus marsupium हे त्याचे शास्त्रीय नाव.



हे असेच आपले काढलेले फोटो







जंगलात अजून बरेच वृक्ष भेटले, सगळ्यांचीच नावे माहीत आहेत असे नाही. जंगलात जाताना कुणी जाणकार सोबत असला की खूप माहिती मिळते.  नाहीतर नुसते जंगल पाहून होते. काय पाहतोय ते कळत नाही.


























वर स्मारकात बघण्यासारखे काही आढळले नाही.

दारातच एक प्रचंड मोठे झाड दिसले, त्याचा फुलांचा बहर येऊन गेला होता व सुकलेली फळे झाडावर होती. फळे तामन वृक्षाच्या फळांसारखी दिसली पण पानांची रचना व खाली झुकलेल्या फांद्या अजिबात तामनशी नाते सांगत नव्हत्या. ऊन कलले असल्यामुळे फोटो नीट आले नव्हते.  त्यामुळे झाड ओळखणे कठीण झाले.  शेवटी इंडियन फ्लोराची मदत घेऊन झाड ओळखले. याचे नाव Duabanga grandiflora.  हे मूळचे उत्तरे व पूर्वोत्तरकडच्या थंडीतले.  इथे अभावाने आढळणारे, त्यामुळे स्थानिक नाव नाही.















वर सगळीकडे कुडा फुललेला.  झाडे फुलांनी भरून गेली होती.







सुकलेल्या उकशीची पुष्पदले पाण्यात पडून सुंदर नक्षी तयार झाली होती.



























गांधी स्मारकाच्या इथले मासे





टिप्पण्या

AR म्हणाले…
May I know your email id? Need to contact you for further information about one of the trees in your blog. Thanks
Sadhana म्हणाले…
You may send mail to.me on sadhanbaby@gmail.com

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लघु अजान वृक्ष - Ehretia Laevis

गारंबीची बी

फाईकस लाइरटा Ficus lyrata

बालपणीचा काळ सुखाचा.........

अडुळसा Justicia Adhatoda