धावती पुण्यनगरी भेट

मायबोलीवर ज्या काही हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या परंपरा शिल्लक आहेत त्यात गटगनंतर वृत्तांत लिहिणे ही एक परंपरा आहे. वृत्तांताचे  मावंदे घातले नाही तर गटगपुण्य आपल्या खाती जमा होत नाही अशी (अंध)श्रद्धा काहीजण अजूनही बाळगून आहेत.

आम्ही सर्वच बाबतीत कुंपणावर अडकून पडलो असल्यामुळे या बाबतीतही अंध असली तरी ती शेवटी श्रद्धाच आहे, उगीच आपल्या हातून कुणाची श्रद्धा का तोडा म्हणत शेवटी मावंदे घातले, ते गोड मानून घ्या.

तर टोमुच्या आगमनानंतर त्याला भेटायला जायचे असे बेत करणे सुरू झाले, पुढे टोमुचे अनुवेद असे नामकरण होऊन यथावकाश पहिला वाढदिवस थाटात पार पडला तरी बेत प्रत्यक्षात उतरले नाहीत.  तेवढ्यात आम्हीच मुंबईला येतो असे शांकलीने कळवले.  पण तिचाही तो पंचवार्षिक कार्यक्रम असल्याचे लक्षात आल्यावर मी जायचेच असे ठरवून  येत्या शनिवारी येते हे शांकलीला कळवले.  तिला वाटले की तिचा जायबंदी हात तोवर बरा होईल पण तसे झाले नाही.   त्यामुळे तिला जरा धाकधूक वाटायला लागली.  पण आता शेंडी तुटो वा पारंबी, मागे हटणे नाही असे मी एकदा ठरवल्यावर हाताचा काय पाड त्यासमोर?

तर नेहमीप्रमाणे पुण्याला काय काय घेऊन जायचे याचे बेत रचून मी शेवटी फक्त आंब्याचा रोट नेऊ शकले.  सकाळी 9ची बस पकडून मी पावणेबारा बाराच्या सुमारास शांकलीकडे डेरेदाखल झाले.  शांकली, शशांकदादा व शांभवी यानी जोरदार स्वागत केले.  इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर विभावरी व नीलिमा आगमनकर्त्या झाल्या.  आम्ही चौघीजनी मिळून हॉट हॉट गॉसिप करणार होतो पण शशांकदादांन्नी आम्हाला अजिबात मोकळीक दिली नाही.  त्यामुळे सगळी गॉसिपे मनातल्या मनात राहिली.  भरपूर सात्विक गप्पा मारल्यानंतर त्या दोघी परत गेल्या.  शशांकदादांची गाडी डॉक्टरकडे रेग्युलर चेकपसाठी गेली होती ती त्यांच्यामागे लागलागून शांकलीने परत आणवली.

एकदा गाडी हाती लागल्यावर आम्हाला कोण थांबवणार? शशांकदादांना सारथ्य करायला बसवून शांकलीने जवळच शेविंगब्रशचे झाड आहे ते बघून येऊया म्हणत मला बाहेर काढले.   शेविंगब्रशची ढिगाने झाडे मी पाहिलीत, पुण्याच्या झाडाला काय सोने लागले असणार असा विचार करत मी बाहेर पडले.  आता बाहेर पडलोच तर पहिल्यांदा तळजाईला जाउया म्हणून मोर्चा तिथे वळवला.

जाताना आमच्या गाडीसमोर एका धामणीला रस्ता ओलांडावासा वाटला.  अनुभवी दादांनी गाडी लगेच थांबवली पण शेजारून स्कुटीवरून जाणाऱ्या स्कार्फअवगुंठीत महिलेला कळलेच नाही. आता गेली धामण या विचाराने मी धास्तावले पण धामणही अनुभवी होती, तिने अतिशय वेगाने यु टर्न घेतला व ती आल्या वाटेला परत फिरली.  परत जाऊन आता काय करावे म्हणून ती खोळंबली. तोवर 4, 5 स्कुट्या तिथे गोळा झाल्या.  आता धामणीला इजा होते की काय ह्या विचाराने शांकली धाडकन गाडीचे दार उघडून बाहेर पडली.  तिचा तो आवेग पाहून हाताशी तापाने फणफणलेले मूल घेऊन पांडुरंगाच्या देवळात जाब विचारायला गेलेली जिजाच मला आठवली. शांकली दार एकदम फटकन उघडून बाहेर पडल्यामुळे जिजेवर आपटून रीबाऊंड होऊन उडणाऱ्या सालोमालोसारखी एकाची गत होता होता तो वाचला.  ते बघून अजून  काही व्हायला नको म्हणत दादांनी शांकलीला परत बोलाऊन बाहेरील जनतेला सेफ केले.


तळजाई आता पिकनिक स्पॉट झालीय पण अजून दाट जंगल व पक्षी बिक्षी बाकी आहेत.  उत्साही वीरांसाठी हिरवळही आहे. एका जागी जिथे 10 वर्षांपूर्वी ससे जमत ती जागा पाहून परत खाली उतरलो.  वाटेत एक फुललेले झाड बघून ते हिवर असे शांकली म्हणाली. मला ते निवर ऐकू आले व त्याच्या दश्या खाली न लोम्बता अश्या वर का वळल्यात हा विचार डोक्यात आला.  पण पुणे तिथे काय उणे? म्हणून गप्प राहणे भाग होते.  तिथून शेविंग ब्रश झाड बघायला गेलो.  झाड बघताच याची पाने इतकी मोठी व गोल कशी हा विचार डोक्यात वळवळत असतानाच अचानक मी बॉटल ब्रश व शेविंग ब्रश ह्या दोन नावात गल्लत केलीय हे लक्षात आले.  तरी मी विचार करतेय की मुंबईत बॉटल ब्रश जागोजागी पडला असतानाही पुणेकर मला तो परत का दाखवताहेत?  एकूण पुण्याच्या हवेने हुशार नमूकरांना गारद केले.

तर दुर्मिळ असा पांढरा शेविंगब्रश पाहत असताना एक सर्पमित्र व वृक्षमित्र तिथे भेटले.  त्यांच्याशी गप्पा सुरू असताना तिथल्या अजून एका झाडाकडे माझे लक्ष गेले.  नमुकर दिसतात तितके मठ्ठ नाहीयेत हे सिद्ध करायची खुमखुमी गेली नसल्याने मी लगेच तो बहावा आहे हे जाहीर केले.  निसर्गमित्र पुणेकर असल्याने बहावा असेल तर अजून कधी फुललेला बघितला नाही हा शालजोडीतला लगावला. जवळ जाऊन निरीक्षण केल्यावर तो बहावा नाही हे लक्षात आले.  पानांच्या रचनेवरून तो रिठा असावा की मोह की अजून कुणी यांच्या चर्चेत थोडा वेळ घालवला.  अजून थोडी झाडे पाहून घरी परतलो. शांकलीने बाळमोह म्हणून अजून वृक्ष दाखवला पण तो कुसुम्ब हे तिला नंतर आठवले.  नमूकरांबरोबर राहून पुणेकर बिघडले.

घरी येऊन परत थोड्या गप्पा हाणल्या.  पुण्याची हवा इतकी थंड की आदल्या दिवशी ठेवलेले डोस्याचे पीठ 24 तास उलटून गेल्यावरही अजिबात आंबले नव्हते. तरी त्याचे डोसे रुचकर झाले.  कु. शांभवीने एकदम मस्त बटाटा भाजी केली, सोबत चटणी व डोसे.  रात्रीचे जेवण पार पडले.

त्यानंतर परत गप्पा रंगल्या. शशांकदादा आम्हाला एकटे सोडत नव्हते म्हणून मग आम्ही फड वरच्या मजल्यावर हलवला. शांकलीचे क्रोशा नमुने बघितल्यानंतर तिने पुस्तके काढली. मला फ्लॉवर्स ऑफ सह्याद्रीत विशेष रस होता.  इंगळहळ्ळीकरांचे ट्रीज ऑफ पुणे पाहताना त्यात हिवर दिसल्यावर दुपारी उगीचच हिवराला निवर समजले हे लक्षात आले.  हिवर, तीवर, निवर.... एकुण नमूत वासरात बागडणारी लंगडी गाय पुण्यात गेल्यावर तिचे पितळ पदोपदी उघडे पडत गेले.

बऱ्याच गप्पा झाल्यावर झोप येऊ लागल्याने बेडवर आडवे झालो.  उद्या सकाळी तळजाईला जावेसे वाटले तर सांग असा निरोप शशांकदादानी दिला.   पण 'झोप ग तू व उठ आरामात, तळजाई कुठे पळून जात नाही' म्हणून शांकलीने आश्वस्त केले.

सकाळी जाग लवकर आली पण नाही म्हणता 6 ला उठलेच.  मग चहा वगैरे पिउन झाल्यावर 'मी सहापासून तयार होऊन बसलोय' असे दादांनी म्हटल्यावर 8 वाजताच्या रामप्रहरी तळजाईला पक्षी बघायला निघालो.  तळजाईला नुसती तरुणाई फुलली होती, पाय ठेवायला जागा नाही तिथे गाडी कुठे लावणार? शेवटी महत्प्रयासाने लांबवर जागा मिळाली.  शांकलीला जास्त चालणे शक्य नसल्याने ती गाडीत बसून राहिली व आम्ही दोघे तळजाईचे वृक्ष व पक्षीनिरीक्षण करू लागलो.

तळजाईला मुद्दाम लावलेले देशी विदेशी वृक्ष भरपूर आहेत.  रेंगाळणारे काही आळशी पक्षी ऐकू येत होते.  आदल्या दिवशी संध्याकाळी पिटुकले बार्बेट पाहिले होते पण परत काही दिसले नाही. वृक्ष भरपूर पाहिले. थोडा वेळ चालल्यावर परत फिरलो.  बाहेर चौपाटी करून स्टॉल लावले होते. चालण्याचा व्यायाम करून दमलेले पुणेकर स्टॉल्सवर श्रमपरिहार करत होते.  शेतकरी लोक भाजी विकत होते.   एक मोठा टेम्पो लोणची पापड वगैरे विकत होता.  मी माझे लाडके मिरची लिंबू लोणचे, शेंगा चटणी व सांडग्या मिरच्या घेतल्या.  भाजीही घेणार होते पण उगीच जड ओझे कोण घेऊन फिरणार म्हणून बेत रद्द केला.

घरी येऊन शांभवीने केलेल्या पोह्यांचा समाचार घेतला.  सकाळी नाश्त्यासोबत दादांनी थोडे पारमार्थिक अमृतही पाजले.  विवेकानंदांबद्दल इतके सांगितले की मला पूर्ण चरित्र वाचायची उत्सुकता निर्माण झाली.  दादांना खूप माहिती आहे या विषयात हे त्यांच्या कविता व अभंगांवरून कळतेच पण ते बोलतातही खूप भारी.

पारमार्थिक अमृतपान केल्यावर मला थोडी झोप येऊ लागली.  तासभर पडल्यावर 12 च्या सुमारास शांकलीने उठवले.  आज शांकलीच्या एका गुरुभगिनीने गौरीचे मेहुण म्हणून त्यांना जेवायला बोलावले होते.  शांकलीची मैत्रीण आलीय हे कळल्यावर तिने मैत्रिणीलाही जेवायला बोलावले होते (पुण्याबाहेरूची असणार नक्की).  उठल्यावर अंघोळ वगैरे आटपून बरोब्बर 1 वाजता यजमानांच्या दारात हजर झालो.  अतिशय सुरेख सजवलेल्या गौरी व सोबत गणपती.   दर्शन घेऊन आरती केली.  पुरणाची आरती पहिल्यांदा पाहिली.  जिने बोलावले ती अमृता भवाळकर उत्तम कीर्तनकार आहे. तिने रामाची व महालक्ष्मीची आरती एकदम सुरेल म्हटली.

नंतर जेवायला बसलो. गौरीचे जेवण साजेसे तर होतेच पण पुरणपोळ्या एकदम अफलातून होत्या.   सुरेख मऊसूत व योग्य त्या गोडीच्या पोळ्या व त्यावर शुद्ध देशी गाईच्या तुपाची धार.  अफलातून.  प्रसादाच्या जेवणाचा गोडवा किती भारी असतो.   जेवल्यावर थोडा वेळ गप्पा मारून निघालो.  अनुवेदला भेटायचा बेत होता पण त्याच्याकडे पाहुणे असल्यामुळे तो बेत बारगळला.

मग घरी येऊन परत थोड्या गप्पा मारून, चहापान करून मुंबईच्या दिशेने प्रस्थान ठेवले.

तीन तासांच्या प्रवासानंतर पुण्यात मजेत घालवलेल्या दोन दिवसांच्या रम्य आठवणी मनात घोळवत घरी परतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लघु अजान वृक्ष - Ehretia Laevis

गारंबीची बी

फाईकस लाइरटा Ficus lyrata

बालपणीचा काळ सुखाचा.........

अडुळसा Justicia Adhatoda

मग मी मूर्ख कसा?