आनंदाचे फळ
आज मला आनंदी आनंद गडे असे झालेय. लेक व मी दोघींनी आनंद साजरा करूनही तो अजून भरपूर उरलाय. तो आता सर्वत्र वाटतेय.
घरचा सगळा कचरा घरच्या कुंड्यांमध्येच जिरवायची सवय. त्यामुळे माझ्याकडे कायम पपई, सीताफळ, आंबा वगैरे मंडळी रुजून येतात. त्यात पपई व सीताफळ तर भरपूर, आज बिया टाकल्या की आठवड्यात रोप हजर.
माझ्याकडे आता फारसे ऊन नसल्याने मी ही रोपे अगदी लहान असतानाच काढून टाकते, तरी काही चुकार रोपे तशीच राहतात. ही सगळी जनता स्वतःहून उगवलेली असल्यामुळे कुंडीमालक वेगळे झाड असते आणि हे पोट भाडेकरू.
असेच कण्हेरीच्या कुंडीत एक सिताफळाचे रोप राहून गेले. कण्हेरीच्या पसाऱ्यात मला ते आधी दिसले नाही, फूटभर वाढल्यावर दिसायला लागले आणि इतके वाढलेले काढायला जीव झाला नाही. मग ते तसेच राहिले. किती वर्षे झाली देव जाणे. चार पाच वर्षे नक्की झाली असतील. मी त्याला कितीदा छाटलेही असेन. झाड साधारण तीन फूट उंच व चारपाच फांद्या असे रूप आहे. कण्हेरीसोबत राहतेय.
गेल्या वर्षी सीताफळाला फुले लागली होती पण ती सगळी बारकुंडी नर फुले होती. त्यांना सिताफळे लागणार नव्हती.
यंदा मार्च- एप्रिलपासून मांसल पाकळ्यांची मोठी फुले यायला लागली आणि माझ्या आशेचे अंकुर पालवले. पण हाय रे दैवा, फुले जळून जात होती. यंदा ऑक्टोबरपासून मी माझ्या कुंडीतल्या सगळ्या झाडांना अधून मधून जीवामृत पाजत होते, घनजीवामृतही देत होते. पावसाळ्याआधीची सफाई म्हणून मे मध्ये एकदा सगळ्या कुंड्या साफ केल्या, उरलेले घनजीवामृत दिले. बाकी झाडांसाठी करण्यासारखे काहीही हातात नव्हते.
तरी लॉकडाऊनमध्ये माझ्या शेवग्याने 10 शेंगा दिल्या, भाजीचे अळू दर दोन आठवड्याने चार पाच पाने देत होते, त्यात भोपळ्याची तीनचार पाने व अंबाडीची सात आठ पाने टाकली व मूठभर शेंगदाणे ढकलले की मस्त अळूचे फतफते तयार होत होते. दिनेशदांनी दिलेल्या अबईच्या बीनेही सुंदर वेलीचे रूप धारण करून दोन शेंगा दिल्या. मी आंबोलीला आले तेव्हा वेलीला दोन छोट्या शेंगा व भरपूर फुले होती. शोभेचे कृष्णकमळ दर दिवशी दोन तीन फुले देत होते. पॅशनफ्रुटचे मात्र अजून लहान असल्यामुळे नुसतेच वाढत होते. एडिनियम त्याला जमेल तितके फुलत होते, इकडून तिकडून आणलेल्या गुलबक्षीला फुले येत होती.
कोरोनाचा कहर वाढल्यावर आणि ऑफिसचे काम अनिश्चित काळापर्यंत घरूनच करावे लागणार हे लक्षात आल्यावर गावी यायचा निर्णय घेतला. इकडेही भरपूर कारणे वाट पाहात होती पण इतके दिवस ऑफिसमुळे जमत नव्हते तो अडथळा दूर झाल्यामुळे गावी येणे सुकर झाले.
गावी गेल्यावर माझी बाई बाग बघणार होती पण ती मार्चपासून कोरोना सुट्टीवर होती. कॉलनीत अजून कामवाल्या बाया येत नव्हत्या. शेवटी शेजाऱ्यांना सांगितले, माझी बाई सकाळी लवकर येऊन पाणी देईल, कोणाला तिचा संसर्ग होणार नाही. तसेही शेजारी अगदीच घराला घर लागून नसल्यामुळे त्यांनाही त्रास नव्हता, त्यामुळे बागेचा निरोप घेऊन आम्ही गावी आलो.
काल बाईला म्हटले बागेचे फोटो दे. तिने आज फोटो दिले आणि काय गम्मत... सिताफळाला पिटुकले सीताफळ लागलेले.... बघितल्यापासून माझा आनंद गगनात मावत नाहिये...
टिप्पण्या