फुलोंकी घाटी अर्थात व्हॅली ऑफ फ्लॉवर्स - घागरिया
बसने आम्हाला गोविंदघाटाला नेऊन सोडले. हा रस्ताही आधीच्या रस्त्यासारखा डेंजर आहे.
वळणे घेत जाणारा रस्ता:
बाकी शिळा वगैरे नेहमीची दृश्ये:
गोविंदघाट हे जोशीमठ इतकेच म्हणजे साधारण 6,000 फुट उंचीवर आहे. तिथून 13 किलोमीटर चालत आम्हाला घागरियाला जायचे होते जे साधारण 10,000 फूट उंचीवर होते. म्हणजे आज पायी 4,000 फूट उंच चढायचे होते. हा चढ कसा असणार याची काहीच कल्पना नव्हती. चढून गेल्यावर कळले की पहिल्या 8,9 किलोमीटर मध्ये आपण फारतर 1000-1500 फूट चढून जातो व खरा चढ शेवटच्या 4 किमिला लागतो. आधीचे 9 किमी चालून आपण दमलेलो असतो आणि ह्या दमलेल्या जीवाला अकस्मात 45 अंशाच्या कोनात चढणाऱ्या रस्त्याचा सामना करावा लागतो. 'कुठून झक मारली आणि ह्या भानगडीत पडले' वगैरे विचार भारी दाटून येतात व दमलेल्या जीवाचे अजून खच्चीकरण करतात.
आदल्याच आठवड्यात मायबोलीकर इंद्रा तिथे जाऊन आला होता, त्याने 13 किमी ट्रेकच्या भानगडीत न पडता सरळ हेलीकॉप्टरने घागरिया गाठ म्हणून सांगितले होते. दर साधारण 3200 रु प्रति व्यक्ती आहे. इंद्रा तिथे असताना पाऊस होता. पाऊस असला की रस्ता चिखल व खेचरांच्या मलमूत्र विसर्जनामुळे अतिशय गलिच्छ होतो. अशा रस्त्यावरून चालण्यापेक्षा कॉप्टर बरे. पण जेव्हा पाऊस असतो तेव्हा हेलिकॉप्टरसेवाही बंद असते. हेलिकॉप्टरने 5 मिनिटात तुम्ही घागरियाला पोचता.
आम्ही तिथे होतो तेव्हा ऐशू 'मला दरी पाहायचीय वरून, हेलिकॉप्टरने जाऊया' म्हणून कुरकुरत होती. पण 5 मिनिटात दरी कितीशी दिसणार, कप्पाळ? म्हणून 'आपण औलीला जाऊ तेव्हा दरी पाहू' सांगून मी तिला गप्प केले. पण ही खरेच उत्तम सोय आहे. तुमचा एक पूर्ण दिवस वाचतो जो तुम्ही घाटीत घालवू शकता. घागरिया घाट चढताना अजिबात रोमँटिक वगैरे नाहीये. जी काय मजा करून घ्यायची ती उतरताना घेऊ शकता.
गोविंदघाटावरून साधारण दीडेक किलोमीटर चालत खाली उतरून गेले की लक्ष्मणसेतू लागतो.
ही अंतरे गोविंदघाटावरून आहेत:
ही कच्ची सडक उतरून जावे लागते:
असाच टाइम पास:
घाटीत प्रवेश:
सेतूची माहिती:
सेतू:
हा सेतू हेमकुंड साहिब व फुलोनकी घाटी गोविंदघाटाला जोडतो. पूल मजबूत आहे, वरून गाडी जाते. हा पूल जर तुटला तर हेमकुंड व फुलोनकी घाटीचा जगाशी संबंध तुटेल. पुलाच्या खालून अलकनंदा नदी रोंरावत धावत असते. घाटीमधून उतरून घागरियावरून येऊन तिच्यात विलीन होणारी पुष्पावती नदी तिला अजून बळ देते. पूल नसला तर त्या नदीत पाय टाकायचे धाडस कोण करेल!!
आम्ही लक्ष्मणसेतुला पोचलो तेव्हा ऊन पडले होते, हवा कुरकुरीत होती, आभाळ स्वच्छ निळे होते, त्यावर पांढरे शुभ्र ढगांचे फुगे तरंगत होते, फुलपाखरे भिरभिरत होती, पाखरे गात होती व रस्ता कोरडा होता. एकूण पंछी बनू उडती फिरू गात फुलपाखरामागे धावण्यासाठी एकदम योग्य वातावरण! म्हणून आम्ही पायी चालण्याचा निर्णय घेतला.
पाठीवर सामान घेऊन चालणे आमच्याने जमण्यासारखे नसल्याचे आमच्या आधीच घोडेवाल्यांनी ओळखले व सामानासकट चालणे किती भारी पडणारे याचे भयानक वर्णन करून आम्हाला खेचरांवर सामान लादायला भाग पाडले. 1 बॅग 100 रुपये या दराने खेचरे तयार झाली. त्यात एक गडबड झाली, मी मोठी रॅकसक घेतलेली पण छोटी घ्यायची राहून गेली. आता खेचरांच्या पाठीवर सामान लादले तरी दुपारचे जेवण सोबत बाळगणे भाग होते, खेचरे काय आमच्या सोबत आमच्या वेगाने चालणार नव्हती. मग सामानातली एक प्लास्टिक पिशवी काढून त्यात जेवणाचे डब्बे भरले आणि बाकी सामान खेचराच्या हवाली केले. ही प्लास्टिक पिशवी हातात घेऊन चालणे जरा कष्टप्रद होते. कारण चालताना कुठे तोलबील गेला तर आपल्याला आधार घ्यायला हात दोनच असतात, त्यात एका हातात आधीच काठी घेतलेली असते. दुसरा हात मोकळा असणे अपेक्षित असते. त्या हातात काही सामान असेल तर चालताना आपल्यावर मनोवैज्ञानिक दबाव येतो. पडलो बिडलो तर आधार धरणार कुठल्या हाताने? त्यामुळे हातात सामान नकोसे वाटते. बाकी इथे आपले सामान कुणाच्या हाती देताना विश्वास अविश्वासाचा प्रश्न येत नाही. तुमचे सामान घेऊन कोणीही कुठेही पळून जात नाही.
गोविंदघाट ते घागरिया या रस्त्यावर छोटीमोठी खेडी आहेत.
इथवरच्या प्रवासात सुदधा दूरवर डोंगरात घरांचा पुंजका दिसायचा, एखादे छोटे खेडे किंवा वाडी असावी. शहरात, बंद दारामागच्या सुरक्षित वातावरणात वाढलेल्या मला असे डोंगरदरीच्या कुशीत राहणाऱ्या लोकांचे कायम कुतूहल वाटत राहिलेय. दूर कुठेतरी, जिथे वीजेचा कायम लपंडाव, जीवनावश्यक वस्तू, सोयी वेळच्या वेळी मिळतील याची अशाश्वती, नैसर्गिक प्रकोपाची धास्ती अश्या वातावरणात लोक कसे राहत असतील? पण ही काळजी फक्त मला. तिथले लोक आरामात होते, बाया एखादी गाय नाहीतर शेरडू हाताशी घेऊन शेजारणीशी निवांत गप्पा मारतांना दिसायच्या. गटागटाने शाळेत जाणारी किंवा येणारी मुले दिसायची. ती मंडळी बहुतेक आमच्याकडेही माझ्यासारखेच प्रश्न डोक्यात घेऊन बघत असतील. 'काय एवढे सोने लागलेय इथे की एवढया लांबून हे लोक कडमडतात इथे' म्हणत असतील मनात.
इथवरच्या प्रवासात सुदधा दूरवर डोंगरात घरांचा पुंजका दिसायचा, एखादे छोटे खेडे किंवा वाडी असावी. शहरात, बंद दारामागच्या सुरक्षित वातावरणात वाढलेल्या मला असे डोंगरदरीच्या कुशीत राहणाऱ्या लोकांचे कायम कुतूहल वाटत राहिलेय. दूर कुठेतरी, जिथे वीजेचा कायम लपंडाव, जीवनावश्यक वस्तू, सोयी वेळच्या वेळी मिळतील याची अशाश्वती, नैसर्गिक प्रकोपाची धास्ती अश्या वातावरणात लोक कसे राहत असतील? पण ही काळजी फक्त मला. तिथले लोक आरामात होते, बाया एखादी गाय नाहीतर शेरडू हाताशी घेऊन शेजारणीशी निवांत गप्पा मारतांना दिसायच्या. गटागटाने शाळेत जाणारी किंवा येणारी मुले दिसायची. ती मंडळी बहुतेक आमच्याकडेही माझ्यासारखेच प्रश्न डोक्यात घेऊन बघत असतील. 'काय एवढे सोने लागलेय इथे की एवढया लांबून हे लोक कडमडतात इथे' म्हणत असतील मनात.
घागरियाला पोचेपर्यंत वाटेत 3-4 बऱ्यापैकी मोठी खेडी लागतात. त्यातल्या पुलना गावापर्यंत गाडी जाते, पुढे मात्र फक्त घोडे, खेचरे आणि पालखी. लक्ष्मणसेतू ते पुलना गाव 4 किमी अंतर आहे, प्रति व्यक्ती 35 ते 50 रुपयात ते चार किमी अंतर गाडीने करून उरलेले 9 किमी अंतर पायी जाता येते. आम्हीही खरेतर जीप करायला हवी होती पण उत्साहाच्या भरात फारसा विचार न करता पायी निघालो. रमेस सुरेस दोघांनीही एक अख्खी जीप बुक केली व त्यात कोण कोण येतात याची चाचपणी सुरू केली. त्यांनीे प्रत्येकाला विचारले पण कोणीही गाडीने यायला तयार होईनात. सगळेजण ट्रेक म्हणजे चाली चाली करायचे या कल्पनेने भारले असल्याने पुढे काय वाढून ठेवलंय याचा विचार केला नाही. फक्त मिस्टर कुलकर्णींनी मिसेस कुलकर्णींना गाडीने जायला सांगितले. त्या कुरकुरत तयार झाल्या.
2013 चा महापूर येऊन गेल्यानंतर उत्तराखंड सरकारने घाटी व हेमकुंड साहिबला जाणाऱ्या सगळ्यांसाठी रजीस्ट्रेशन सक्तीचे केलेय. त्याचे केंद्र तिथेच सेतूच्या तोंडाशी आहे. आम्ही भराभर रेजिस्ट्रेशन केले व तिथल्या हॉटेलात येऊन इतरांची वाट पाहत टेकलो. मग कोणीतरी पराठा ओर्डर केला. त्या हॉटेलातले पराठे, दही व मॅगी एकदम जबरदस्त होते. एकाचे बघून इतर असे करत सगळेच तिथे नाश्ता करत बसले. तिथे तासभर घालवल्यावर लक्षात आले की ज्यांच्यासाठी थांबलेलो ते तिथे येऊन पुढेही निघून गेले. मग आम्हीही निघालो.
सेतू पार करून रमत गमत पुढे निघालो. तिघेही एकत्र राहूया म्हणून मी आरडाओरडा करत होते तरी शामली, नुपूरा, हरयानवी रिप्पन, अनिल यांच्याबरोबर ग्रुप जमवून पुढे गेली. ऐशूने मात्र शेवटपर्यंत आईची पाठ सोडली नाही. खरेतर मी तिची पाठ सोडली नाही कारण तिचा चालण्याचा वेग माझ्यापेक्षा कमी होता व ती लगेच दमत होती, पण हे नंतरचे. सुरवातीला आम्ही सगळे एकत्र चालत असताना एका उंच दगडी भिंतीसारख्या उभ्या असलेल्या डोंगरामागचे एक वळण आले आणि मोबाईल जगाशी सगळ्यांचा संपर्क तुटला. त्या वळणाच्या पुढे अचानक मोबाईल संपर्क तुटतो हे आम्हाला ऋषीकेशलाच सांगितलेले. आता पुढचे तीन दिवस जगाशी कुठलाही संपर्क नाही.
त्याच्या थोडेच पुढे शामली, नूपुरा, महेश वगैरे आमची वाट पाहत उभे दिसले. खरेतर ते आमची वाट बिट काही पाहत नव्हते तर तिथे दिसलेल्या एका शॉर्टकटने जायचे की नाही याचा विचार करत होते. आम्ही तिथे पोचेतो त्यांचा विचार पक्का झाला. शॉर्टकटने जाण्यासाठी आधी एक 3 फुटाचा उभा पत्थर चढणे भाग होते. मी काय करावे याचा विचार करत होते तेवढ्यात सगळा ग्रुप भराभर वर चढायला लागला. ऐशुने पण सोबत जायचे ठरवल्यावर मला दुसरा मार्ग उरलाच नाही. मी कशीबशी चढायचा प्रयत्न करू लागले, अर्धवट चढल्यावर आधी चढलेल्यानी मला हाताला धरून वर खेचून घेतले, माझ्यामागून ऐशू चढली. तिच्यामागे गुजराती मंडळातील उन्नती आणि अजून एक पोरगा चढले. आम्हाला बघून आमचा ग्रुपलिडर महेश 'कृपा करा आणि अजून कोणाला सोबत बोलवू नका' अशी तंबी देऊन पुढे निघून गेला. मला वर खेचून घेणारे 'आरामसे संभालके आवो' म्हणत भराभर पुढे गेले, त्यांच्यासोबत शामली आणि तिच्यासोबत आमचे दुपारचे जेवण.
शॉर्टकट कधीच व्यवस्थित नसतात. हा शॉर्टकट दगड धोंडे, चढ उतारानी भरलेला होता. दगडधोंढ्यातून नीट चालता येत नव्हते म्हणून मी वैतागले होते. आमच्या मागून येणारे गुजराती तर आमच्यापेक्षाही हळु चालत होते.
असेच 10 - 15 मिनिटे चालल्यावर अचानक 'मॅडम, डेंजर' अशी आरोळी ऐकू आली. पाहिले तर स्लेटी दगड एकावर एक रचून बनलेली साधारण 10 फुट उंच भिंत समोर उभी होती आणि त्या भिंतीवर आमचा ग्रुपलीडर बसला होता. खरेतर तो भिंतीवर बसला नव्हता तर वर रस्ता होता व तो रस्त्याच्या कडेला बसला होता हे मी वर चढून आल्यावर कळले. समोरची भिंत म्हणजे रस्त्याचा भराव होता. त्यावर चढून वर रस्त्यावर जाण्यासाठी म्हणून थोडया थोड्या अंतरावर भिंतीतले दगड पायऱ्यांसारखे बाहेर ओढून ठेवले होते. तिथे काम करणाऱ्या मजुरांचा हा शॉर्टकट होता व त्यांनी बाहेर ओढलेले दगड त्यांच्या उंचीचा विचार करून ओढले होते. मी स्वतःला कुठल्या संकटात लोटलेय याचा विचार करत क्षणभर उभे राहिले. आता मागे वळणेही शक्य नव्हते, परतीचा रस्ता किती चांगलाय त्याचा अनुभव घेऊन झाला होता.
'आई चढ आता, काही होत नाही' म्हणून ऐशु ओरडायला लागल्यावर हिम्मत करून पहिल्या दगडावर पाऊल टाकले. दोन तीन दगड वर चढून गेल्यावर मी 5 6 फूट वर आले. आता अजून 2 दगड आणि मी रस्त्यावर चढले असते. पण वरच्या दगडावर एक पाऊल ठेवले तर तो चक्क हलायला लागला. 'दगड हलतोय पण निघणार नाही, ठेवा त्यावर पाय' महेश वरून ओरडला. पण माझी हिम्मत थोडी डळमळीत झाली. आता इथून खाली उतरणे पण शक्य नव्हते. समजा खाली पडलेच तर कशावर आपटेन याचा अंदाज घेण्यासाठी खाली वाकून पाहिले तर सँड स्टोनची मोठी लादीच अंथरलेली दिसत होती. ऐशु माझ्यामागून चढत होती. मला वाकून खाली पाहताना बघून ती ओरडली, मौन्टेनिअरिंगचा पहिला नियम, वर चढताना अंग भिंतीला चिकटवून ठेवायचे. मनात म्हटले बघू, आता वर चढते का थेट वर ते. वरून महेश प्रोत्साहित करत होता पण हाताला धरून वर ओढेल इतकी उंची मी गाठली नव्हती. शेवटी सगळा धीर गोळा करून वरच्या दगडातल्या कपारींमध्ये बोटे अडकवून त्यांचा आधार घेत त्या डगमगत्या दगडावर पाय ठेवला आणि स्वतःला वर ढकलले. तिथून अजून 1 दगड आणि हुश्य... मी वर रस्त्यावर लोटून दिले स्वतःला. मी कशीबशी उठून बसत होते तेवढ्यात ऐशु वर चढून आली. दहावीत केलेला कोर्स ती अजून विसरली नव्हती. तिला आरामात चढता आले. दोघे गुजरातीही 2 मिनिटात तिथे पोचले. उन्नतीला चढायला खूप त्रास झाला. ती बारीक आणि उंच होती तरी भिंतीला पालीसारखे चिकटून स्वतःला वर ढकलायचे टेक्निक तिला जमत नव्हते. तिचा हा पहिलाच ट्रेक.
भिंत चढताना उन्नती:
शेवटी तिला महेशने वर खेचून घेतले :
रस्त्याच्या टोकाला लांब शामली दिसत होती. तिथे पोचलो तोवर शामली तिथल्या शॉर्टकटने चढून अजून वर जाऊन पोचलेली.. मी आता कुठल्याही शॉर्टकटच्या भानगडीत पडणार नव्हते. ऐशु शामलीच्या मागे शॉर्टकटने गेली व मी रस्त्याने. तेवढाच वेळ लागला.
असेच टाइम पास करत चालत पुलना गावात येऊन पोचलो. तिथे सगळे सुमोवाले लोकांना आणून सोडत होते. बहुतेक सगळे हेमकुंड साहिबला जाणारे सरदारजी होते. फार थोडे घाटीवाले. साठी सत्तरीच्या घरातले वृद्धही आले होते. काही खेचरांवर स्वार झाले तर काही चालत निघाले.
इथून पुढे सगळा रस्ता पायऱ्या पायऱ्यांचा आहे. दगडाने बांधून काढलेल्या पायऱ्या. रस्ता बऱ्यापैकी रुंद आहे, 6-7 फूट तरी असेल.
एका बाजूला डोंगर तर दुसऱ्या बाजूला रस्त्याशी काटकोन करून खाली असलेली दरी. तळाशी रोंरावणारी नदी. समोरून खेचरे आली की डोंगराच्या बाजूला व्हायचे. तरीही एखादे खेचर अंगावर आले तर 'बाहर बाहर!!' म्हणून ओरडायचे. तेवढे हिंदी खेचराला कळते. त्या खेचरांची मला कमाल वाटायची. मुले जशी मस्ती करत मुद्दाम कडेने धावतात तशी ही खेचरे रस्त्याच्या अगदी कडेने चालत. बरे, आपण चालताना आपल्याला आपले पाय दिसतात, खेचरांना कसे दिसणार त्यांचे पाय? तरीही हे बेटे अगदी कडेने चालत जात. मला ते बघून भीती वाटे, न जाणो, पाय घसरला आणि वरच्या माणसासकट खेचर खाली पडले तर? पण असे सहसा होत नाही. उनकोभी अपने जान की चिंता होती है इति घोडेवाला.
सामान व माणसे वाहून न्यायला इथे घोड्यापेक्षा खेचरे जास्त वापरली जातात. वजन वाहुन न्यायची त्यांची क्षमता घोड्यांपेक्षा जास्त असते असे एका घोडेवाल्याने सांगितले. खेचरे गाढवासारखी दिसतात असे मला उगीच वाटायचे. इथली खेचरे घोड्यांसारखी चांगली उंच व तगडी होती. मला त्यांच्यात व घोड्यात फरक सांगताच येणार नाही. शेजारून घोडा जातोय की खेचर मला ओळखता यायचे नाही तरी पण माझ्या मते घोडा खूप हँडसम दिसतो. खेचरांमध्ये तो गुण नाही.
चालताना हे घोडे/ही खेचरे सतत लीद टाकत जात. त्यांची लीद रस्त्यावरून झाडून दरीत टाकायला हेमकुंड साहिब किंवा सरकारी व्यवस्थापनाने माणसे नेमलीत. त्यामुळे रस्ता एकदम चकाचक राहतो. आणि त्यामुळेच रस्त्यावर कोणी रिकामे स्नॅक्स पाकीट टाकलेले डोळ्यात एकदम खुपते.
दर 400-500 फुटांवर रस्ता झाडणारी दुकली दिसायची. चालणारे लोक दिसले की दोघेही रस्ता झाडायचे थांबवून चहासाठी पैसे मागायचे. मी पहिल्या दुकलीच्या हातावर 10-10 रुपये ठेवले, चांगले काम करताहेत म्हणून. थोडे पुढे गेल्यावर कळले की इथे सगळ्यांनाच चहा प्यायचाय! मग सरळ दुर्लक्ष करायला लागले. आमच्या समोरच एका सरदारजीने पैसे मागणाऱ्या एका दुकलीला चांगलेच झाडले. हेमकुंडसाहिब पैसे देतंय व्यवस्थित तरी भीक मागायला लाज वाटत नाही का वगैरे वगैरे बरेच बोलला. पण त्यांना काय त्याचे?
रस्त्याने चालताना वाट्टेल तिथे लीद टाकणाऱ्या खेचरांना सुसू करायला मात्र विशिष्ट जागाच लागे. सगळी खेचरे एकाच जागी जमून सुसू करायची. त्या जागी एक छोटे तळे तयार व्हायचे व ते ओलांडून जाताना त्या वासाने जीव नकोसा व्हायचा.
वाटेवर सर्वत्र फुलेच फुले होती. सर्वात जास्त प्राबल्य बालसम म्हणजे आपण ज्याला तेरडा म्हणतो त्या वनस्पतींचे. जवळ जवळ 7 प्रकारचे बालसम त्या भागात फुलतात. रंग प्रामुख्याने पांढरा, गुलाबी व पिवळा. फुलांच्या आकाराची रेंज आपल्या हाताच्या बोटाच्या नखापेक्षाही लहान ते पूर्ण बोटापेक्षाही लांब इतकी.
अजून एक:
अजून एक :
पूर्ण गुलाबी, पूर्ण पांढरी व पूर्ण पिवळी अशी एक रेंज. यात सुद्धा गडद गुलाबी व थोडा फिका, गडद पिवळा व थोडा फिका असे उपप्रकार. मग पुढचा भाग गुलाबी व मागे हळूहळू पांढरा पडत गेलेला भाग, पुढचा पिवळा व मागचा पांढरा असे प्रकार. त्यांच्या शेंगांचे आकारही वेगवेगळे. एका प्रकारात आपल्या टाचणीसारखी बारीक शेंग पाहिली. तिला हळूच दाबली की फटकन वरच्या बाजूने चार भागात उकलुन उलटी गुंडाळी करत ते चार भाग खाली वळायचे. तर असाच टाइमपास करत, फोटो काढत, खेचरे अंगावर आदळणार नाही याची काळजी घेत आमचा प्रवास सुरु होता.
तिथे सर्वत्र दिसणारी बिच्चूबुटी ही वनस्पती. हिचा स्पर्श झाला तर तुम्ही नाचू लागता असे जोशींमठला कॅम्पलीडरने सांगितले होते. तो स्पर्श होऊ नये म्हणून फुल टी शर्टस व पॅन्टस घाला , हाफ घालू नका म्हणून त्यांनी बजावले होते. याच्या सोबत याचा उतारा असलेली वनस्पतीही कायम आढळते असेही ते म्हणाले होते पण मला तो उतारा काही ओळखता आला नाही.
अजून एक:
वाटेत इतके धबधबे लागतात की तुम्ही शेवटी तिकडे पहायचे सोडून देता. अमर्याद पाणी वरून खाली ओतत असते. हे सगळे वाया जाते की पुढे धरणे वगैरे बांधून अडवलेय याची काही कल्पना नाही. पण सार्वत्रिक पाणी टंचाई लक्षात घेता याचे काहीतरी करायला हवे. हल्ली सर्वत्र बोलबाला होत असलेला नदी जोड प्रकल्प, त्यात त्रुटी असल्या तरी पूर्ण करायला हवा, नदी वाचवा प्रकल्प तडीस न्यायला हवा. एका भागात पाणी वाहून जातेय तर दुसऱ्या भागात टँकरने पाणी पुरवठा करावा लागतोय हे किती काळ पाहत बसणार?
अजून एक:
आमच्या ह्या एकला चलो रे कार्यक्रमात आमच्या ग्रुपमधले कोणी न कोणी अधून मधून भेटत होते. ग्रुपलीडर महेश अधून मधून सगळा ग्रुप आहे न व्यवस्थित हे पाहत होता. जागोजागी टपरीवजा हॉटेलात फळे, थंडपेये, चहा, सरबत, मॅगी, पराठे वगैरेची सोय केलेली होती. किमती तिथल्या मानाने ठीकठाक. आता इतक्या उंचावर तुम्हाला गरमागरम काही खायचे असल्यास तेवढी किंमत देणे भाग आहेच.
आमच्या ग्रुपमधले पुढे गेलेले रस्त्यावरच्या हॉटेलात कधी थांबलेले दिसायचे. आम्ही तिथून पुढे जायचो. मग थोड्या वेळाने ते परत आम्हाला मागे टाकून पुढे जायचे. शामली मात्र खूप पुढे निघून गेली. ती वाटेत कुठेही भेटली नाही. दुपार झाली तशी भूक लागल्याची जाणीव व्हायला लागली. आमचा डब्बा शामलीबरोबर पुढे गेलेला त्यामुळे वाटेवरच्या हॉटेलमध्ये खाणे हा एक मार्ग होता. पण काही खायची इच्छा नसल्याने वाटेत मिळणाऱ्या झऱ्यांचे पाणी पित आम्ही चालत होतो.
वाटेत ठिकठिकाणी थांबून फोटो काढणेही सुरू होते. आमच्यासोबत वर चढणाऱ्या सहप्रवाशांशी गप्पा मारत प्रवास सुरु होता. एका दिल्लीवालीने ट्रेक करून झाला की वजन कमी होते ही सुखद बातमी दिली. तिच्या बहिणीने आदल्या वर्षी हा ट्रेक केलेला व तिचे वजन एका महिन्यात पाच किलोने कमी झालेले म्हणे! तेवढेच एक मोटिवेशन!!!
पूर्ण रस्ताभर पुष्पावती नदी आपल्या सोबत राहते. मुख्य रस्त्यावरून खाली नदीकिनारी जाण्यासाठी अधून मधून मातीचे फाटे टाकलेले आहेत पण आपल्या रस्त्यापासून दोन अडीज किमी खाली चालत जावे तेव्हा कुठे नदीकाठ लागतो. मला एकदा वाटले जावेसे पण अडीज किमी खाली जाणे व परत तेवढेच वर येणे लक्षात घेऊन मी विचार दडपून टाकला. अडीच किमी आरामात खाली उतरून जाईन पण परतीचा चढ कोण चढेल? आणि जाऊन करणार काय? नदीचा वेग व बर्फ़ाळ पाणी पाहता पायाचे बोटही बुडवले जाणार नाही पाण्यात.
वर खाली वर खाली चालत चालत संध्याकाळी चार-साडेचारच्या सुमारास आम्ही वरच्या अंगाला असलेल्या पुष्पावती नदीकाठी पोचलो. नदीवरचा आधीचा पूल 2013ला वाहून गेला. आता नवा बांधायचे काम सुरू आहे. तोवर वापरायला म्हणून कच्चा पूल आहे. एका वेळेस एकानेच जायचे त्याच्यावरून. घोडा सवारीला बरोबर सांभाळून नेतो व त्याला सांभाळणारा मागून येतो.
नदी यायच्या थोडा वेळ आधी एका वळणावर एका उंच दगडी पहाडाच्या बाजूने रस्ता जातो तिथे दिसलेली ही अवाढव्य मधमाश्यांची पोळी. फोटोत खूप लहान दिसताहेत कारण खूप उंचावर होती व मोबाईल ने फोटो काढलेत.
त्यांचे निरीक्षण करत असताना अचानक एक पोळे हलल्यासारखे वाटले. लक्ष ठेऊन बघितल्यावर कळले की पोळ्यांच्या पृष्ठभागावर अधून मधून लाटा उठत होत्या. माश्या
अधून मधून मेक्सिकन वेव्ह करत होत्या बहुतेक. ते दृश्य मला खूप थरारक वाटले.
अधून मधून मेक्सिकन वेव्ह करत होत्या बहुतेक. ते दृश्य मला खूप थरारक वाटले.
नदी पार केल्यावर खरा चढ सुरू होतो. तिथवर पोचेपर्यंत आम्ही दोघीही चालून चालून दमलेलो. ग्रुपमधले कोणी दिसत नव्हते. तिथवर मी ऐशूला कसेबसे आणले पण तीव्र चढ सुरू झाल्यावर ऐशूला चालवेना. दोन पावले चालून गेल्यावर ती बसत होती. इतक्या उंचीवर तिला आणल्याचा मला पश्चाताप होऊ लागला. बरे आता खेचर वगैरे करावे तर बहुतेक सगळे घोडेवाले खाली जात होते. खेचरेही खाली जाऊन आराम करायच्या मूडमध्ये होती. तेवढ्यात गुजराती सुरेस खेचरावरून जाताना भेटला. तोही बरेच चालून शेवटी खेचराला शरण गेला होता. तो चढच बेक्कार होता. ऐशूला चालवत नाहीय पाहून त्याने स्वतःचे खेचर देऊ केले. पण मी नको म्हटले. आमची अवस्था वाईट होतीच पण त्याचीही अवस्था दयनीय झालेली दिसत होती.
मीही ऐशुसाठी खेचर करायचे ठरवले, पण कोणी घोडेवाला दिसेना. 2 मिनिटे चाला 5 मिनिटे बसा करत प्रवास सुरु होता. पाच दहा मिनिटांनी एकजण वरून येताना दिसला. घोडेवाले नेहमी कमीतकमी 2 खेचरे घेऊन फिरतात. त्याच्याकडेही दोन खेचरे होती, एक बुक केले तर पाचशे, दोघांचे सहाशे. तो म्हणाला दोन्ही घ्यावी लागतील, मी एकाला सोडून देऊ शकत नाही. मी आयुष्यात कधीही घोड्यावर बसलेले नसल्याने फक्त ऐशुसाठीच खेचर करायचे ठरवले. पण घडाळ्यात बघितले तर तोवर 5 वाजत आलेले. माझ्या स्पीडने वर जाईपर्यंत 7 वाजले असतेे. घोडेवाला काही माझ्यासोबत थांबला नसता. ऐशू व रिकामे खेचर घेऊन तो भराभर पुढे गेला असता. अजून अर्ध्या तासाने मला चालणे अशक्य झाले असते तर परत खेचर कुठून मिळणार? हा सगळा विचार करून मीसुद्धा खेचरावर स्वार झाले. खेचरावर बसणे हा अतिशय तापदायक अनुभव आहे. पायऱ्यांवर चढताना अधून मधून त्याचे पाय घसरत होते. रस्त्याच्या कडेला गेला की माझ्या पोटात गोळाच यायचा. पुढे इतका खतरनाक चढ लागला की खेचर केले ते बरेच केले असे वाटायला लागले. एकदाचे कसेबसे घागरिया हेलीपॅडपर्यंत पोचलो. आमच्या ग्रुपमधले काही जण तिथे भेटले. मला वाटले आले घागरिया पण ते तिथून अजून दोन किमी दूर होते. अजून एक किमी गेल्यावर खेचरावरून पायउतार झालो व अजून थोडे चालत हॉटेलात पोचलो.
हॉटेलात आमच्या बॅगा आणि शामली पोहोचले होते. खोलीत जाऊन कधी एकदा अंग टाकते असे झाले होते. आमच्या टीममधले बहुतेक जण पोहोचले होते. फक्त गुजराती मंडळ अजून पोचले नव्हते. ते रात्री उशिरा 8 वाजता पोचले, उन्नतीला इतका त्रास झाला की दुसऱ्या दिवशी ती बेडमध्येच पडून राहिली. तिची फुलोनकी घाटी चुकली.
घागरियाला गरम पाणी मिळणार नाही त्यामुळे अंघोळीचा विचार अजिबात करू नका असे ऋषीकेशला मॅनेजर साहेबांनी सांगितले होते. पण हॉटेल नंदलोकपाल पॅलेस चक्क अपवाद निघाले. तिथे उकळते पाणीही होते आणि एक मसाजवालाही फिरत होता. मी त्याला बोलावून पायाचे तळवे चांगले रगडून घेतले. बिहारमधून आलेला पोरगा होता, चार महिने इथे राहून जितकी होईल तितकी कमाई करायची. ऑक्टोबरनंतर परत बिहार.
आमची खोली दुसऱ्या मजल्यावर होती पण उत्तराखंडाच्या विशिष्ट भूगोलामुळे आमच्या मजल्याच्या टोकाची मोठी खोली
तळमजल्यावर होती, म्हणजे खोलीचा दुसरा दरवाजा बाहेरच्या बाजूने जमिनीवर उघडत होता. त्या खोलीत एक भले मोठे गॅसचे चुलाणे आणि त्यावर भला मोठा 1 मीटर व्यास असलेला पाण्याचा टोप ठेवलेला होता. सकाळ संध्याकाळ हे चुलाणे सुरू असलेले पाहिले, कदाचित दिवसभरही असेल पण दिवसा तिथे राहायची वेळ आली नाही. भल्या पहाटे 5 वाजताही गरम पाणी मिळत होते. 50 रुपयात मोठी बादलीभर रनिंग हॉट वॉटर!
तळमजल्यावर होती, म्हणजे खोलीचा दुसरा दरवाजा बाहेरच्या बाजूने जमिनीवर उघडत होता. त्या खोलीत एक भले मोठे गॅसचे चुलाणे आणि त्यावर भला मोठा 1 मीटर व्यास असलेला पाण्याचा टोप ठेवलेला होता. सकाळ संध्याकाळ हे चुलाणे सुरू असलेले पाहिले, कदाचित दिवसभरही असेल पण दिवसा तिथे राहायची वेळ आली नाही. भल्या पहाटे 5 वाजताही गरम पाणी मिळत होते. 50 रुपयात मोठी बादलीभर रनिंग हॉट वॉटर!
फ्रेश होईपर्यंत सूपची वेळ झाली. सूप गच्चीवर मिळणार होते, गच्ची पाचव्या मजल्यावर होती. तिथपर्यंत पोचणे अजिबात सोपे नव्हते. हॉटेल बहुतेक कायमचेच इन द मेकिंग असल्यामुळे गच्चीपर्यंत जाणाऱ्या जिन्याचे रेलिंग अजून बनलेले नव्हते, पायऱ्या मात्र एक दोन ठिकाणी तुटलेल्या होत्या. त्यामुळे अगदी जपुन वर जावे लागायचे. ह्या हॉटेलात आम्ही तीन दिवस राहणार होतो. तीन दिवस मुक्काम असल्यामुळे yhai चे तीन ग्रुप्स एका वेळी तिथे वास्तव्य करणार होते. आज आलेला आमचा ग्रुप, फुलोनकी घाटीला आज गेलेला एक ग्रुप व हेमकुंडला आज गेलेला एक ग्रुप. प्रत्येक ग्रुपमध्ये तीसेक लोक म्हणजे 90 लोक आमचेच. बाकी इतर लोकही होते.
सूप घेऊन आल्यावर मी थोडा वेळ झोपले. खरेतर खाली जाऊन घागरिया बघावेसे वाटत होते पण अंगात त्राणच शिल्लक नव्हते. त्यात बारीक पाऊस सुरू झाला. त्यामुळे जायची इच्छा जिरून गेली. रात्री जेवायला परत उठावे लागले. सकाळच्या पराठ्यानंतर पोटात काहीही नव्हते त्यामुळे जेवणे भाग होते. इतक्या दुर्गम भागातही yhai ने जेवणाची व्यवस्था अतिशय छान केलेली. त्या दिवशी जेवणात गट्टे की सब्जी होती. अतिशय सुरेख बनवलेली!
हॉटेलला अगदी चिकटून एक बिल्डिंग होती. जेवणाची व्यवस्था त्या बिल्डिंगमध्ये होती आणि तिथे जाण्यासाठी काय व्यवस्था असावी? तर आमच्या दुसऱ्या मजल्याच्या एका बाजूच्या दीड फुटी कठड्यावर आणि बाजूच्या बिल्डिंगच्या आम्हाला समांतर असलेल्या कठड्यावर मिळून एक आडवी पायऱ्यावाली आणि रेलिंगवाली लोखंडी शिडी टाकलेली. आपला जीव सांभाळून त्या शिडीवरून तिकडे उतरायचे. रोज संध्याकाळचे सूप आमच्या गच्चीवर असायचे आणि सकाळचा नाश्ता व रात्रीचे जेवण त्या दुसऱ्या बिल्डिंगमध्ये.
जिथे जेवण बुफेसारखे ठेवायचे तिथल्या चिंचोळ्या जागेत उभे राहून जेवायचे नैतर शिडीवरून परत आपल्या भागात येऊन कुठेही बैठक मारून बसून जेवायचे. खूप लोक तिथेच गर्दी करून जेवायचे. मी हवे तितके ताटात वाढून घेऊन खोलीत ताट घेऊन यायचे व आरामात जेवायचे. जेवण झाले की त्या बिल्डिंगच्या एका लाम्बलचक गॅलरीच्या टोकाला असलेल्या एका नळावर जाऊन आपली भांडी घासण्यासाठी रांग लावायची. पाण्याची व्यवस्था म्हणून कुठूनतरी उगवलेला एक पाइप घेऊन त्याच्या टोकाला एक नळ बसवलेला. तो गॅलरीच्या बाहेर होता, आत असता तर वाहत्या पाण्याने मजल्यावर सगळा चिखल झाला असता. त्यातून वाहणारे पाणी बहुतेक थेट नदीतून येत होते कारण ते बर्फापेक्षाही थंडगार असायचे.
मी पहिल्या दिवशी उगीच पाणी वाया जाते म्हणत नळ बंद करण्यासाठी तोटी फिरवल्यावर नळाने अचानक आकाशाच्या दिशेने तोंड केले आणि माझ्या हाताला थंड पाण्याचा प्रसाद मिळाला. समोरच नदी धो धो वाहून मिनिटाला हजारो लिटर पाणी वाया घालवत असताना एक नळ बंद करून उगीच पाणी बचाव प्रयत्न करण्यात अर्थ नाही असा विचार करून मी त्यानंतर नळ बंद करायचा प्रयत्न केला नाही. तसेही त्यानंतर भांडी घासायची ड्युटी मी दोन्ही पोरींच्या गळ्यात टाकुन दिली. मात्र मला त्यांच्यासोबत तिथे जाऊन रांगेत उभे राहावे लागायचे. कारण आम्ही तिघी असल्याने भांडी जास्त असायची, धुतलेली भांडी ठेवायला त्या गॅलरीचा चिंचोळा काठ हीच जागा होती. मी पहिल्याच दिवशी वाकून पाहिले तर खाली घाणीचे साम्राज्य होते. आपले एखादे भांडे खाली पडले तर तिथे जाऊन आणणार कोण? एक पोरगी भांडी घासणार, एकजण धुणार आणि एकेक भांडे माझ्या हातात देणार अशी ड्युटी आम्ही लावून घेतली.
दुसऱ्या दिवशी फुलोनकी घाटीला जायचे होते. आम्ही आता गोविंदधामला होतो जे 10,000 फुटांवर होते आणि फुलोनकी घाटी 12,000 फुटांवर. म्हणजे उद्या 4 किमी अंतर चालून हे 2,000 फूट चढायचे होते. आणि वर घाटीत फुले बघत चालायचे ते वेगळेच. ऐशुसाठी काय व्यवस्था करावी या चिंतेत मी होते. आजची हालत पाहता तिला उद्या अजिबात जमणार याची मला खात्री होती.
टिप्पण्या