फुलोनकी घाटी - जोशीमठ.



रात्री झोप अशी काही लागली नाही. तिनालाच जाग आली. साडेतिनला दरवाजावर थाप पडली, चहा घ्या म्हणून.   चहा घेऊन, सगळे आवरून, पॅक लंच घेऊन पावणे सहाला निघालो. ब्रेकफास्ट गाडीतच होणार होता.

उत्तराखंड हिमालयाचा पायथा व आजूबाजूला पसरलेल्या भागात आहे.  उत्तर बाजू हिमालयात येते, उत्तरखंडातली सगळी उंच शिखरे म्हणजे नंदादेवी, बद्रीनाथ, कामेत ह्या भागात येतात.  तिथले सगळ्यात उंच शिखर नंदादेवी साधारण 7800 मीटर उंचीवर आहे. म्हणजे जवळ जवळ 25,000 फूट.  दक्षिणेला शिवालीक रेंज आहे. जिम कॉर्बेटचा प्रसिद्ध कुमाऊं भाग यात येतो. याच्या खालच्या टोकाला दलदलीचा तराई भाग येतो.

आमच्या ह्या सफरीत आम्ही हरिद्वार-ऋषिकेश पासून सुरवात करून फुलोनकी घाटी-हेमकुंड साहिब करणार होतो व पुढे बद्रीनाथला जाणार होतो.  हरिद्वार-ऋषिकेश समुद्रसपाटी पासून साधारण 1,200 फूट उंचीवर आहे, फुलोनकी घाटी 12,000 फुट उंचीवर तर हेमकुंड साहिब 15,000 फूट उंचीवर आहे. चारधामातले बद्रीनाथ त्या मानाने खाली आहे,  10,800 फूट उंची.



1200 फुट उंचीवरून सुरवात करून आमचा पहिला टप्पा होता जोशीमठ 6,150 फूट उंचीवर.

ऋषिकेश ते जोशिमठ अंतर फक्त 250 किमी असले तरी रस्ते गोल गोल वळणे घेत वर चढत असतात त्यामुळे वेगावर बंधन येते. उत्तराखंडात बहुतांश सँड स्टोन व स्लेट स्टोनचे प्राबल्य आहे. हे दगड म्हणजे इथे दिसतात तसे दगड नाहीयेत तर आकाराने प्रचंड मोठे असे बोल्डर्स आहेत, शिळा म्हणता येतील.  याना धरून ठेवणाऱ्या मातीची सतत धूप होत असल्याने थोडा जरी पाऊस झाला तरी या शिळा खाली येतात गडगडत. एकेक खडक इतका मोठा की एकटा एका गाडीला आरामात दरीत घेऊन जाईल.



जून जुलै महिन्यात या भागात उन्हाळा असतो, चार धाम यात्री बहुतेक या महिन्यात येतात. ऑगस्टपासून मात्र पावसाला सुरवात होते व सोबत दरडी कोसळायलाही सुरवात होते.





कोसळलेली दरड



दरड दूर करून रस्ता साफ करताना बोर्डर रोड organisation.







उत्तराखंडातले रस्ते चांगले आहेत पण जागोजागी वरून येणाऱ्या पाण्यामुळे व कोसळणाऱ्या दरडींमुळे तेवढा रस्ता खराब होतो. या कारणामुळे 250 किमी पार करायला सहज 10 ते 12 तास लागतात. म्हणजे तेवढे लागले तर आपले नशीब फारच चांगले समजायचे. त्यापेक्षा जास्त वेळ लागणे नेहमीचे आहे तिथे.

आमच्या गटात 28 लोक होते, 15 स्त्रिया व 13 पुरुष. मिनीबसने गणपती बाप्पा मोरयाचा घोष करत निघालो.
गाडी गोल गोल फिरत जाते त्यामुळे पोटातही गोल गोल फिरायला लागते.  गाडीतल्या 1-2 सोबतीणी अधून मधून बस थांबवून उतरत होत्या बॉक बॉक करत. शामलीही  एकदा उतरली. हे सगळे पाहून मी घाबरून खाणेच टाळले.



मध्ये एकदा गाडी थांबली, आम्ही सगळे हात पाय मोकळे करायला उतरलो. होय ना करता नाष्टाही तिथेच करायचे ठरले व शेवटी तिथेच तासभर गेला.  मला नाश्ता करण्यात रस नसल्याने मी इकडे तिकडे झाडे पाहत वेळ काढला.



रस्त्यावर लिंबूसरबत, कणसे वगैरे विकणारे बरेच होते. आमच्या ग्रुपमधल्या काहींनी लिंबूसरबत घेऊन ते छान आहे असा निर्वाळा दिल्यावर मीही थोडे धाडस करून गेले सरबतवाल्याकडे.  रस्त्यावरचे खाणे म्हणजे पोट बिघडवून घेणे हे डोक्यात पक्के. प्रवासात पोट बिघडवून घ्यायची रिस्क कोण घेईल?  स्टॉलवर गेल्यावर आधी त्याला विचारले, भय्या पानी कहासे लाये? तो म्हणाला यहा नॅचरल मिनरल वाटर मिलता है, वोही हम लाते है।। मला आश्चर्य वाटले. म्हटले कहा है? त्याने थोड्या अंतरावरच्या एका पाइपकडे बोट दाखवले.  डोंगरावरचे पाणी घळीतून खाली येत होते, त्या घळीतच एक पाइपचा तुकडा घुसवून ठेवलेला. घळीतले थोडे पाणी त्या पाइपमधून येत होते, खाली बादल्या लावून हॉटेलवाले ते पाणी सैपाक व पिण्यासाठी वापरत होते.














ये पानी बहोत साफ है, इतना अच्छा पानी कही मिलेगा नहीं, पिके देखो जरा। म्हटल्यावर  मी सरबतही प्यायले व पाणीही पोटभर प्यायले. दोघांची चव अमृततुल्य! इथे मुंबईत क्लोरीनयुक्त पाण्याची चव तोंडात बसलेली.  तिथले डोंगरातून, दगड धोंड्यातून वाहत येणारे पाणी अगदी अमृताहून गोड लागले. नॅचरल मिनरल वॉटर ह्यापेक्षा वेगळे असूच शकत नाही. तिथे सगळ्यांनी आपल्या पाण्याच्या बाटल्या भरुन घेतल्या.  त्यानंतर पूर्ण ट्रेकभर असेच डोंगराचे पाणी आम्ही सगळे पित होतो. ट्रेक आटपून परत ऋषिकेशला आल्यावर विकतचे पाणी घ्यावे लागले.



 प्रवासात बसमधल्या लोकांचे नेहमीचे अंताक्षरीचे प्रयोग सुरू झालेले.  कोण कोण काय कसे आहेत याचा अंदाज यायला लागलेला.   2 मोठे ग्रुप होते. एक अमदाबादच्या मुलींचा ग्रुप व एक बेंगलोरच्या मुलींचा ग्रुप. मला गुजराती लोकांची थोडी ऍलर्जी आहे कारण स्थळ काळ न पाहता  गुजरातीत मोठमोठ्याने बोलणे ही त्यांची खासियत मला अजिबात आवडत नाही. गुजराती ग्रुपमधल्या 3 मुली रिपोर्टर होत्या, कुठल्यातरी दैनिकात काम करत होत्या.  मला त्या दैनिकाच्या वाचकांचे उगीचंच थोडे वाईट वाटले.  पूर्ण ट्रेकभर त्या मुलींनी त्यांच्या बडबडीने कानांवर व वागणुकीने डोळ्यांवर (सगळ्यांच्याच) अत्याचार केले. त्याउलट बंगलोरकर मुली. अगदी सॉफीसफिकेटेड वागणूक. थोडी शिष्टपणाकडे  झुकणारी.  पण इतरांना आपल्यामुळे त्रास होणार नाही याची काळजीही घेत होत्या. त्यांच्यासोबत 1 तरुण जोडपे होते जे हा ट्रेक आटपून पुढे लेहला जाऊन महिनाभर राहणार होते. ऐकल्यावर मी हेव्याने जळून मेले.  त्या जोडप्यासोबत एक गृहस्थ होते ज्यांना तो ग्रुप मामा म्हणून हाक मारत होत्या.



दोन हरयानवी मित्र व दोन गुजराती मित्र होते.  गुजराती एकमेकांना इतके चिकटलेले की मी त्यांचे नामकरण रमेस व सुरेस केले. ते स्वतः व त्यांचा बिंनेस यापलीकडे बोलायला त्यांच्याकडे दुसरे काहीही विषय नव्हते. ते बालपणापासून एकत्र होते म्हणे.   दोघा हरयानवीमधला एक बँकेत होता, प्रचंड बडबड्या, थोडा फ्लर्ट पण लाघवी. आवाज चांगला होता व सुरात होता. ऑफ बिट गाणी तोंडपाठ होती. त्याचा मित्र मात्र अबोल होता, हा आमचा को ग्रुप लीडर होता.



ऐशु पर्यावरण पर्यवेक्षक होती. म्हणजे ट्रेकदरम्यान कोणी कचरा इथे तिथे टाकत तर नाहीय ना हे बघणे तिची जबाबदारी होती.  बाकी उरलेल्यात एक धुळ्याचे
कुलकर्णी जोडपे होते, मुंबईची एक सीए मुलगी नूपुरा होती, शामली तिला लगेच चिकटली.   एक मुंबईचाच फोटोग्राफर अशोक होता जो मोठ्ठा कॅमेरा घेऊन अखंड फोटो टिपत होता.



आमचा ग्रुपलिडर महेशही मुंबईचाच होता.  त्याने सह्याद्रीत व सह्याद्रीबाहेर भरपूर ट्रेकबाजी केलेली होती.   एक  बंगलोरचे जोडपे होते जे कोणाशी तोंडदेखलेही काही बोलत नव्हते ना हसत होते.  बायकोला प्रत्येक गोष्टीचा त्रास होत होता व चेहरा सतत लटकावून नवरा मीही तुझ्यासोबत त्रासात आहे हे तिला दाखवत होता. बायको चुकून आजूबाजूला नसेल तेव्हा तो चेहरा थोडा हसरा करायचा. एक गुजराती जोडपे जे वयाने चाळीशीत होते पण एकमेकांचे नवरा बायको नव्हते  तेही कोणात फारसे मिसळत नव्हते. तरी ते नवरा बायको नसल्याने त्यांच्याबद्दल इतरांनी नसती कुजबुज करून घेतली, ज्यात गुजराती मंडळ आघाडीवर होते. कोण नवरा बायको, कोण फक्त मित्र ह्या चौकशा व चर्चा लोक का करतात देव जाणे.



कर्नाटकचे संजय होते जे वयाने माझ्याएवढेच होते पण माझे वय कोणाला माहीत नसल्याने एकटेच सिनियर सिटीझनचा मान मिळवून बसलेले. त्यांनी चारधाम याआधी दोनदा केलेले.  घरी इस्टेटीवरून वाद झाल्यामूळे नैराश्य आले, ते वातावरण नको म्हणून बाहेर पडले आणि मग प्रवासाला जाणे हा छंद झाला.  आम्ही दोघे सोडता बाकी ग्रुपचा वयोगट 20 ते 35 एवढा होता.



गाडीत अंताक्षरी सुरू झाल्यावर गुजराती मंडळ हिरीरीने पुढे झाले.   एक बाजू ते सांभाळायला लागले पण प्रॉब्लेम असा की गाणे कुठलेही असो, पहिल्या ओळीनंतरची चाल ते ओढून ताणून गरबा चालीवर नेत होते.

मीही सुरवातीला यात भाग घ्यायचा प्रयत्न करून पाहिला. पण एकतर मला नवीन गाण्यांपैकी एकही गाणे माहीत नव्हते आणि जी मला माहित होती ती गाणी कोणी गायला लागले की गुजराती मंडळ ती हायजॅक करून चुकीचे शब्द वापरून वर गरबा चालीत गात होते.  दोन्ही बाजूनी हाच ग्रुप गाणी रगडतोय आपला.  मी सहन करू शकत नाही अशा गोष्टींच्या लिस्टमध्ये गाण्याची चाल बदलून व चुकीचे शब्द वापरून गाणी गाणे हे टॉप 50 मध्ये येत असल्याने मी अंताक्षरीचा नाद सोडला व खिडकीबाहेर लक्ष केंद्रित केले.



खिडकीबाहेर जर जमिनीच्या लेवलच्या वर पाहिले तर उंचच उंच हिरवेगार डोंगर, डोंगरमाथ्यावरून खाली झेपावणारे मजबुत मोठ्ठाले धबधबे, कोणी फेकल्यासारख्या पडलेल्या शिळा, उंचच उंच वृक्ष, झाडे, झुडपे, डोंगर कापत निघालेले इवलुले रस्ते, मधूनच डोकावणारी घरे असा नयनरम्य नजारा दिसायचा व जमिनीच्या लेव्हलच्या खाली पाहिले तर रस्त्याशी काटकोन करत खाली झेपावलेली दरी,  दरीच्या तळाला रोंरावत धावणारी नदी आणि नदीपात्रात पडलेल्या प्रचंड शिळा हे अंगावर काटा आणणारे दृश्य दिसायचे.  मुंबईत असताना 'हिमाचल परिवहन मंडळाची बस दरीत कोसळून सगळे प्रवासी वाहून गेले' ही बातमी मी चहाचा घोट घेता घेता नुसती हेडलाईन वाचून बाजूला टाकायचे. इथे मात्र ती बातमी माझीही असू शकते याची सतत जाणीव होत होती.






























































मजल दरमजल करत शेवटी 4 वाजता जोशीमठ गाठले.  तिथला मुख्य रस्ता स्वातंत्र्यदिनी संचलन की तसल्याच काही निमित्ते बंद होता असे ऋषीकेशला मॅनेजरसाहेबांनी सांगितलेले.  तो आजही बंद असल्याचे दिसले. ड्रायवर तिथे ड्युटीवर असलेल्या पोलिसाशी वाद घालत बसलेला तेवढ्यात Yhai चे आजचे ग्रुप लीडर तिथे येऊन पोचले. त्यांना पाहताच हे गृहस्थ अतिउत्साही आहेत हे लक्षात आले. पोलिसाशी वाद घालण्यात काहीही अर्थ नाही, बस दुसऱ्या रस्त्याने नेऊन आपण आपल्या लिस्टवरची 2 देवळे पाहून घेऊ म्हणत त्यांनी ड्रायवरला आवरले व बस वळवून घेतली. लोकांना खरेतर बेस कॅम्पवर म्हणजेच हॉटेलवर जाऊन फ्रेश व्हायचे होते पण तसे केले तर देवळे पाहण्यासाठी परत चालत यावे लागेल, बस येणार नाही असे ग्रुपलीडर साहेबांनी म्हटल्यावर लोक गपचूप देवळे पाहायला राजी झाले.



बस आम्हाला एक छोट्याश्या देवळाकडे घेऊन गेली.  तिथे उतरून आजूबाजूचा परिसर पहात आम्ही नृसिंहाचे देऊळ पाहायला गेलो. हा नृसिंह म्हणजे आपला भक्त प्रल्हादवाला नृसिंह, विष्णूचा चौथा अवतार.  ह्या देवळात बद्रीविशाल ही बद्रीनाथमधील देवता थंडीच्या दिवसात राहायला येते. तिकडे वर बर्फ पडायला लागला की पुजारी तिथली एक मूर्ती घेऊन इथे येतात. नरसिंहाच्या देवळात मग दोन मूर्ती पूजल्या जातात.








अशी आख्यायिका आहे की नरसिंहाच्या मूर्तीचा उजवा हात दिवसेदिवस कृश होत चाललाय व एके दिवशी तो हात तुटून पडेल. कलयुगाच्या समाप्तीची सुरवात होतेय याची ती खूण असेल. नंतर खूप मोठी दरड कोसळून बद्रीनाथला जाणारा रस्ता कायमचा बंद होईल व कलयुग संपेल. परत सत्ययुग सुरू होईल व बद्रीविशाल आपला मुक्काम इथून  20 किलो मीटर वर असलेल्या भविष्य बद्रीनाथ मंदिरात हलवतील.



या प्रवासादरम्यान बद्रीनाथच्या वाटेवर इतक्या खतरनाक दरडी कोसळलेल्या बघितल्या की ही आख्यायिका एके दिवशी खरी होणार याबद्दल माझ्या मनात कुठलाही संशय राहिला नाही.  फक्त ते घडताना मी त्या भागात नसावे ही प्रार्थना मी मनातल्या मनात केली.



नृसिंहाच्या देवळाची व मूर्तीची स्थापना आदी शंकराचार्यांनी केलेली आहे.  देऊळ परिसरात अजून काही मंदिरे आहेत ज्यांना मी बाहेरूनच नमस्कार केला.  आदी शंकराचार्यांचे देऊळही या मंदिरांच्या परिसरात आहे. तिथेच केदारनाथसारखे दिसणारे एक खूप मोठे दगडी देऊळ बांधून पूर्ण झालेले आहे. आत मूर्ती स्थापना अजून झालेली नाही.



दोन्ही देवळे पाहून आम्ही बसने हॉटेलात गेलो. आमची खोली मिळताच दोन्ही पोरी बेडवर आडव्या झाल्या व घोरायला लागल्या.  दुसऱ्या दिवशी सकाळी 6लाच निघायचे असल्याने जोशीमठ पाहायची संधी मिळणार नव्हता. त्यामुळे आता काळोख पडायच्या आत जितके पाहायला मिळते तितके पाहून घेऊ म्हणत मी लगबगीने फ्रेश झाले व एकटीच बाहेर पडले.



थोडी पुढे आले तर सिनियर सिटीझन संजय दिसले. त्यांनी पुढे शंकराचार्य मठ आहे, चला पाहू म्हणून सुचवताच मीही मठ पहायचे ठरवले. मठाकडे जाणारा रस्ता जवळजवळ 60 अंशाच्या कोनात वर चढत होता, पण परत कधी पाहायला मिळणार म्हणत मी निमूटपणे चालायला लागले. संजय चारधाम यात्रेचे डबल पुण्य गाठीशी बांधून असल्याने त्यांना सगळ्या जागांची खडानखडा माहिती होती.



हिंदू धर्माला संगठित करणारे आदी शंकराचार्य यांनी चार दिशांना जे चार मठ स्थापन केले त्यात बद्रिकाश्रमी स्थापन केलेला मठ म्हणजे जोतिर्मठ किंवा जोशीमठ.  आठव्या वर्षी संन्यास घेऊन ते वाराणसीला आले, तिथून बद्रीकाश्रमी आले. इथे त्यांनी जिथे तपसाधना केली ती गुहा पाहायला मिळते. ज्या तुतीच्या झाडाखाली बसून त्यांनी शंकराची आराधना केली ते झाड, ती शंकर पिंडी व तिथली अखंड ज्योती आजही पाहायला मिळते. ते झाड कल्पवृक्ष म्हणून प्रसिद्ध आहे.   कल्पवृक्षाचा बुंधा प्रचंड विस्तारलाय.  10-15 लोक हातात हात घालून बुंध्या भोवती उभे राहिले तर त्यांना बुंधा कदाचित कवेत घेता येईल इतका तो पसरलेला आहे.   बुंध्याभोवती मजबूत लोखंडी जाळी बसवलीय आणि एका बाजूला ती उघडी आहे जिथून पूजा अर्चा करता येते.  अर्थात वृक्षाची पूजा अर्चा का करावी हा मुद्दा आहेच पण श्रद्धेपुढे आपण काय करणार ?



मी आधी मठाचा परिसर फिरून पाहिला. खूप छान जागा आहे. गच्चीवरून पूर्ण जोशीमठाचे दर्शन होते. तिथे गुलाबाची झाडे लावलेली ज्याला मंद सुगंधित टप्पोरे गुलाब लागलेले. मुंबईत कितीही मेहनत घेतली तरी गुलाबाची झाडे काही बहरत नाहीत अशी मनोमन टिप्पणी करत मी तिथे फिरून शंकराचार्यांची व त्यांच्या शिष्याची गुहा वगैरे सगळे पाहून घेतले.  वर गुहा पाहायला जात असताना गोड आप्पे तळल्याचा मस्त वास येत होता पण प्रसाद म्हणून कोणी आप्पे वाटताना दिसले नाहीत याचे थोडे वाईट वाटले.



तिथून खाली येत असताना परत संजय भेटले. ते पुढे चाललेले. पुढे कल्पवृक्ष आहे तोही पाहून घ्या असा त्यांनी सल्ला दिला. कल्पवृक्षाच्या बुंध्यातच श्री जोतेश्वर महादेव मंदिर आहे.























 मंदिराच्या परिसरात आम्हाला रमेस सुरेस जोडगोळीतला सुरेस भेटला. थोडा चिंताग्रस्त वाटला. आम्ही काही विचारायच्या आधीच त्याने त्याच्या मोबाईलची कॉर्ड कुठेतरी पडली, त्याने कमरेच्या पाउचमध्ये ठेवलेली पण आता ती त्यात नाहीय, बसमध्ये वगैरे सगळीकडे शोधून झाले, त्याचा फोन अमुक तमुक कंपनीचा असल्याने दुसरी कुठलीही कॉर्ड त्याला चालत नाही वगैरे दुःखद समाचार आमच्या कानावर घातला. कल्पवृक्ष मलबेरी वृक्ष आहे हे ज्ञान मला तेव्हा नसल्याने त्याची पाने वगैरे हाती लागू शकतील का म्हणजे मला हा वृक्ष कोणता हे कळेल या खटपटीत मी असल्याने त्याचे बोलणे अर्धवट ऐकत होते.



झाडाच्या पानांचे वगैरे निरीक्षण करून मी मंदिराकडे मोर्चा वळवला. श्री जोतेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन, अखंड ज्योतीचे दर्शन घेऊन मी कल्पवृक्षाचे जवळून दर्शन घेत असताना तिथला पुजारी म्हणाला की कल्पवृक्षाला हात लावून तुम्ही जी काय इच्छा मनात धराल ती पूर्ण होतेच.  मी काय इच्छा धरावी याचा विचार करत होते इतक्यात सुरेस व सोबत संजय तिथे आले.  संजयनी व मी सुरेसला कल्पवृक्षालाच साकडे घाल म्हणून सल्ला दिला. तोही बिचारा घायकुतीला आल्याने त्याने लगेच कल्पवृक्षाला धरून इच्छा प्रदर्शित केली आणि काय आश्चर्य!! पुढच्याच क्षणी त्याची कॉर्ड कमरेच्या पाऊचमध्ये सापडली.  सद्गदित होऊन तो परत जोतेश्वराच्या मंदिरात देवाचे पाय पकडायला धावला.  (हे आपले उगीच, शंकराच्या देवळात फारतर नंदीचे पाय धरता येतील).  मला आधी काय करावे सुचेना, पण लगेच स्वतःला सावरून मी हॉटेलकडे धाव घेतली. असा इच्छापूर्ती कल्पवृक्ष हाताशी सापडलाय तर याचा मुलींनाही लाभ मिळावा या इच्छेने मला भारून टाकले.





इच्छापूर्ती कल्पवृक्षाबद्दल ऐकताच ऐशु लगेच उठून बसली. रात्रीच्या जेवणात चिकन सूप मिळावे ही इच्छा मी मनात धरली तर पुरी होईल का ? तिने आशेने विचारले. माझा संताप संताप झाला.  देवभूमी उत्तराखंडात येऊन असल्या इच्छा?  तू थोडी बुद्धीच आधी माग, ती मिळाल्यावर इतर इच्छा आपोआप सुचतील म्हणत दोघींनाही ओढत देवळात नेले.  दोघीनीही कल्पवृक्षकडे कसल्या कसल्या इच्छा मागितल्या. शामलीने खरेच इच्छा पुऱ्या होणार का हे दोन दोनदा विचारून परत परत काहीबाही मागत राहिली.  तिच्या ग्रुपसाठीही म्हणे मागितले.  मुली काहीतरी अतरंगी मागणार हे मी जाणून असल्याने 'त्यांच्या योग्य इच्छाच पुऱ्या होवोत, बाकीच्या डीलिट मार रे कल्पवृक्षा' ही इच्छा करून गप्प बसले. रात्री जेवणानंतर जोशींमठमध्ये फिरताना एका रोडसाईड स्टॉलवर अकस्मात मोमोज, नूडल्स व पास्ता मिळाल्यावर  कल्पवृक्ष खरोखर लगेच इच्छापूर्ती करतो हा निर्वाळा ऐशूने दिला.   मी यांनी अजून काय इच्छा मागितल्या असतील ह्याचा विचार करणे सोडून दिले.





दुसऱ्या दिवशी पहाटेच निघून जोशींमठ ते गोविंदघाट हा 25 किमी प्रवास बसने व गोविंदघाट ते घागरिया हा 13 किमी ट्रेक पायी करायचा होता.  ट्रेक पायी करणे जरी अपेक्षित असले तरीे आम जनतेसाठी तिथे हेलीकॉप्टर, खेचर, पोर्टर व पालखीची सोय होती. स्वतःच्या खर्चाने यातले कुठलेही साधन निवडायला yhaiची आडकाठी नव्हती.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लघु अजान वृक्ष - Ehretia Laevis

गारंबीची बी

फाईकस लाइरटा Ficus lyrata

बालपणीचा काळ सुखाचा.........

अडुळसा Justicia Adhatoda

मग मी मूर्ख कसा?