भाभा अणुशक्ती केंद्रात एक दिवस.....
मध्य मुंबई मराठी विज्ञान संघाने आयोजित केलेल्या भाभा अणू संशोधन केंद्रभेटीत सहभागी व्हायची संधी श्री. तुषार देसाई यांच्यामुळे लाभली. अणुशक्तीनगरात वसलेली ही निसर्गरम्य जागा बाहेरून येता जाता कित्येकदा पाहिली होती. पण आत प्रवेश मिळत नाही हे माहीत असल्याने आतला परिसर पाहण्याची खूप उत्सुकता होती. अनासाये संधी मिळतेय म्हटल्यावर मी ऑफिसचे काम बाजूला ठेऊन आधी या संधीचा लाभ घ्यायचे ठरवले. ठरल्याप्रमाणे दिनांक १६ फेब्रुवारी २०१८ ला बीएआरसिच्या वृंदावन या इमारतीत सगळे जमले. एकूण ४८ उत्साहीजण या कार्यक्रमासाठी आले होते. नेहमीप्रमाणे काहीजण उशिरा आले, त्यांच्यामुळे वेळेत आलेल्या लोकांना खोळंबून राहावे लागले. तिथेच चहा व इडली-वड्याचा आस्वाद घेऊन सगळे निघाले. आत जाण्यासाठी व फिरण्यासाठी बीएआरसीच्य बसची सोय केली होती. नंतर फिरताना एक भगिनी म्हणाली की मुंबईत फिरणाऱ्या या बसेसमधून कधीतरी फिरायला मिळावे ही खूप इच्छा होती जी आज पूर्ण झाली. आता या बसेस कॉम्प्लेक्सबाहेर फिरत नाहीत. बीएआरसीमध्ये अतिशय कडक सुरक्षा तपासणी केली जाते. कुठलीही इलेक्ट्रॉनिक वस्तू आत नेता येत नाही. मोबाईल, लॅपटॉप, पेनड्राइव...