बोरिवली नॅशनल पार्क - एक भेट
![इमेज](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgDz-UvKK-h-dNsDQjCQbLUs074net0PDp3xSdb9KUvsAPGCiFETUTuGmMDPgQLwhFQddijPSMFW0a6IYyFjf02P5hpyVsZZf0oUZlKdEKD-yjTJcBDyTlgf13Eic1IinX5yx7GeTTRCcc/s640/IMG_20180422_145517150_HDR.jpg)
बोरिवली राष्ट्रीय उद्यानात शेवटचे गेल्याला 10 वर्षे तरी नक्कीच झाली असावीत. तिथे जायला हवे असे अधून मधून वाटत असले तरी बेलापूर ते बोरिवली अंतर लक्षात घेता ते वाटणे कायम मागे पडत गेले. यावर्षी सुट्टीत मावसबहिण राखी तिच्या कुटुंबासोबत माझ्याकडे राहायला आली. मग शनिवार रविवार मुंबई दर्शन चुकवायचे नाही असे ठरवून शनिवारी संध्याकाळी तिच्या नवऱ्याला विमानतळावर सोडायच्या निमित्ताने आम्ही पश्चिम उपनगरात आगमन करते झालो. (कसे भारी वाटते ना वाचायला? नाहीतर पहिला अर्धा तास नव्या मुंबईत झुर्रर्रर्रर्रकन व नंतरचा एक तास कुर्ल्याच्या ट्रॅफिकमध्ये क्लच ब्रेक करत गाडी चालवत, रस्त्यावरच्या लोकांना शिव्या घालत पारल्याला पोचलो हे किती बोरिंग वाटते वाचायला). दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आज नॅशनल पार्कात जायचे हे घोषित केल्यावर लग्गेच 'तिकडे कशाला एवढ्या उन्हात? त्यापेक्षा इकडे अमुक्तमुक जागी जाऊ' वगैरे काथ्याकूट सुरू झाला. आमच्याकडे असला काथ्याकूट एकदा सुरू झाला की फक्त मऊ कुटलेला काथ्या हाती लागतो, आमचे बुड घराबाहेर पडत नाही. त्यामुळे त्या काथ्याकूटाकडे दुर्लक्ष केले. भराभर ...