मै भी शेतकरी अर्थात माझे शहरी शेतीचे प्रयोग.
गेली १५ वर्षे मी माझ्या छोट्याशा गच्चीत काहीनाकाही रुजवण्याचे उद्योग करत आहे. आधी कुंडीतुन सुरवात केली. एकेक करता करता शंभरेक कुंड्या जमल्या. तेव्हा शोभेच्या झाडांची जास्त हौस होती. गुलाब, जास्वंद, अबोली, शेवंती, बोगनवेल हे खास आवडीचे विषय होते. एका वेळेस तर आठ प्रकारच्या जास्वंदी माझ्या बागेत सुखाने नांदत होत्या. आपल्याला खायला काही मिळेल असे पिकवायचे डोक्यात कधी आले नाही. सगळे काही हौसेखातर होत असल्याने फक्त पैसे भरपुर जायचे. आणलेल्या रोपांमधली काही लिमिटेड आयुष्य घेऊन येत. ती बिचारी आपले आयुष्य संपले की निमुट जात. दीर्घायुष्यी रोपे जगत. माझे लक्ष असायचे पण कामात कधी वेळ मिळे न मिळे. त्यात माझा स्वभाव अतिशय लहरी. आली लहर की तासनतास खुरपे घेऊन खुरपत बसायचे. नाही तर महिनोन महिने दुर्लक्ष. एकदा पेपरात वाशीच्या गुणे कुटूंबाबद्दल वाचले. त्यांनी त्यांच्या घरी अगदी उसापासुन सगळे लावलेले. पेपरातल्या बातमीमध्ये दिलेला त्रोटक पत्ता घेऊन घर शोधुन काढले आणि त्यांना भेटले. त्यांनी गांडूळे वापरुन गच्चीत शेती केलेली. फळभाज्या, पालेभाज्या, केळी, अंजीर, चिकु, सिताफळे, कलिंगड...