लघु अजान वृक्ष - Ehretia Laevis
हल्ली माझे चालणे खूप कमी झालेय. पहिल्यासारखे नियमित जाणे होत नाही व त्यामुळे ह्या ऋतूत पारसिक हिलवर फुलणारी फुले पाहिली गेली नाही. असेच एकदा चुकून चालायला गेले होते. आदल्या दिवशी जिप्सीने अडुळश्याची फुले व्हाट्सअप्प ग्रुपवर टाकली होती. टेकडीवर अडुळसा कुठे आहे हे मला माहित आहे म्हणून विचार केला की आपणही एक फेरी मारून फोटो काढावेत. अडुळश्याचे फोटो काढून परत रस्त्यावर येत असताना एका लहान झाडाने लक्ष वेधून घेतले. झाडाची उंची साधारण सहा ते सात फूट होती व अगदीच बाळ झाड वाटत होते. लक्ष गेले ते त्याच्या फुलांमुळे. अगदी पिटुकली, माचीस काडीच्या डोक्याएव्हढी फुले बघून लगेच फोटो घ्यायला सुरुवात केली. घरी गेल्यावर थोडी शोधाशोध केली तेव्हा कळले की हा लघु अजान. बोटॅनिकल नाव इहरेटिया लेविस. Ehretia Laevis. ह्या बोटॅनिकल नावांची एक गंमत आहे. झाडाचे नाव व झाडाची पहिल्यांदा नोंद करणारी व्यक्ती या दोघांचीही गुंफण नावात घातलेली असते. जॉर्ज डायनिसिअस एऱ्हेट या बोटॅनिकल कलाकाराने पहिली नोंद केली म्...