द क्लिकिंग ऑफ कथबर्ट - पिजी वुडहाऊस The clicking of Cuthbert by P G Wodehouse
पिजी वुडहाऊसच्या या कथेचा मला जमला तसा अनुवाद. तुम्हाला आवडेल अशी आशा करते ******** तो तरुण क्लबहाऊस स्मोकिंगरुममध्ये आला आणि त्याने हातातली बॅग जमिनीवर फेकून दिली. खुर्चीत कोसळत त्याने बेल वाजवली. "वेटर........!" "सर?" बॅगेकडे तिरस्काराने पाहात तो म्हणाला, "हे क्लब्स लगेच माझ्या नजरेसमोरून दूर कर. तुला घेऊन टाक, तुला नको असतील तर कोणा कॅडीला दे!" खोलीच्या दुस-या कोप-यातून, पाइपातून उठणा-या धुराआडून आद्य सभासद त्याच्याकडे गंभीर नजरेने पाहात होता. त्याच्या त्या नजरेवरूनच त्याने अवघे आयुष्य गोल्फला समर्पित केले आहे हे कळत होते. "तू गोल्फ सोडतोयस?", त्याने विचारले. तो तरुण असे का करतोय याची त्याला कल्पना होती. अख्खी दुपार त्याने गच्चीमधून त्या तरुणाचा खेळ पाहात घालवली होती. पहिला होल घ्यायला सात फटके घालवल्यानंतर पुढचा होल काबीज करण्याच्या प्रयत्नात त्याने ब-याच चेंडूंना तलावात जलसमाधी दिली होती. "हो,' तरुण जवळजवळ ओरडलाच, "कायमचा सोडतोय, गेला उडत! काय फालतू खेळ आहे हा? आचरटपणाचा कळस अगदी!! वेळेचा अपव्यय नुस...